संगमनेर शहरात नागरिकांचा संताप शिगेला !

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि नगरपालिकेच्या उशिरा सुरू झालेल्या खड्डे बुजाव मोहिमेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. रस्त्यांवरील खड्डे, उखडलेले डांबर, आणि उडालेली खडी यामुळे शहराचा प्रवास अक्षरशः धोकादायक आणि धूळयुक्त झाला आहे. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिकांच्या त्रासात कमालीची भर पडली.
या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने अखेर जाग येत खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. डांबर, खडी आणि मुरूम टाकून रस्त्यांची डागडुजी करण्यात येत असली, तरी ही कामे केवळ तात्पुरती मलमपट्टी असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सुरू असलेल्या पावसामुळे ही कामे फार काळ टिकणार नाहीत आणि काही दिवसांतच रस्ते पुन्हा जैसे थे होतील, असा अनुभव गेल्या अनेक वर्षांपासून येतो आहे.

निकृष्ट दर्जाचे काम आणि वेळेअभावी घेतलेले निर्णय हे समस्येचे मूळ कारण असून, कायमस्वरूपी दर्जेदार डांबरीकरण हाच खरा उपाय आहे असे मत तज्ज्ञ आणि जनतेकडून जोरकसपणे मांडले जात आहे. ही मोहीम म्हणजे निव्वळ डोळ्यात धूळफेक असल्याची टीका आता उघडपणे होऊ लागली आहे. शहराच्या विकासाचे दावे करणार्या प्रशासनाला आता प्रत्यक्ष कृतीतून दाखवावे लागणार आहे की, त्यांना खरोखरच नागरी समस्यांची जाणीव आहे की केवळ पावसाळा संपेपर्यंतचा मलमपट्टी उपाय पुरेसा वाटतो आहे!
रस्त्यांचे संपूर्ण आणि दर्जेदार पुनरुज्जीवन करणे, दिर्घकाळ टिकणार्या बांधकामाला प्राधान्य देणे, जबाबदार अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करणे, नगरपालिकेच्या खड्डे बुजाव मोहिमेचा हेतू चांगला असला, तरी त्याची अंमलबजावणी दर्जाहीन राहिल्यास नागरिकांचा संताप अनावर होणार हे निश्चित! अशी भावना नागरीकांनी व्यक्त केली आहे.