दारू थांबवा नाहीतर रस्त्यावर उतरणार – हेरंब कुलकर्णी

युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले – अकोले तालुक्यात अवैध दारू विक्री विरूद्ध अनेक वेळा आंदोलन करून, मागणी करून देखील अवैध दारू विक्री सुरूच आहे. येत्या काही दिवसांत दारू हद्दपार न झाल्यास 15 ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी दिला आहे.
अकोले व राजूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पंचवीस-तीस गावांत राजरोस अवैध दारूविक्री सुरू आहे. संगमनेर, शेंडी, ठाणगाववरून दारूची वाहतूक उघडपणे होते. वीरगाव फाटा, इंदोरी फाट्यावरून दारू पाठविली जाते. तालुक्यातील ज्या गावांत दारू विकली जाते. त्या गावांची यादीच हेरंब कुलकर्णी यांनी सोमवारी तहसीलदारांसमोर ठेवली.

संगमनेर येथून रोज रात्री दारूच्या गाड्या येताना उत्पादन शुल्क विभाग त्या रोखत का नाही? ते यात सामील आहेत का? असा प्रश्न त्यांनी विचारला. तालुक्यात गुटखा पकडल्यावर गुटखा विकणार्या दुकानदारांकडून पैसे गोळा केल्याच्या अकोल्यातील प्रकाराची चौकशी व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. यावेळी तहसीलदारांनी या सर्व तक्रारी अतिशय गंभीर असून पुढील आठ दिवसांत या सर्व गावांतील दारू विक्री पूर्ण थांबली जाईल.
राजूर हे दारूबंदी असलेले गाव असूनही तेथील दारू थांबवण्याचे विशेष प्रयत्न होत नाहीत. शेंडी येथून खुलेआम दारू येताना पोलिस निरीक्षक काहीच प्रयत्न करत नाही. राजूरच्या दारूबाबत पोलिस अधीक्षक यांच्याकडे स्वतंत्र तक्रार करणार आहे. अशी माहिती हेरंब कुलकर्णी यांनी दिली.