कुरणमध्ये डॉक्टरच्या अश्लील चाळ्याने संतापाची लाट

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- तालुक्यातील कुरण येथे एका डॉक्टरकडे महिला तपासणीसाठी गेली होती. मात्र मद्यपान केलेल्या डॉक्टरने या महिलेसोबत तपासणीच्या नावाखाली अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर नशेत असल्याचे या महिलेच्या लक्षात आल्याने ती बाहेर पळून घरी गेली. तिच्या मुलाने डॉक्टरला जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देणार्या डॉक्टरला नागरीकांनी चोप दिला. ही घटना काल मंगळवार दि. 22 जुलै रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार डॉ. राहुल विश्वनाथ इंगळे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत महिला टॉन्सिल दुखण्यावर उपचारासाठी डॉ. इंगळे यांच्या क्लिनिकमध्ये गेली होती. डॉक्टरने विचारले काय झाले, त्यावर महिला म्हणाली माझे टॉन्सिल दुखत आहे. तेव्हा डॉक्टरने गळ्याभोवती हात लावला आणि टॉन्सिल चेक करु लागला. मात्र त्याचा स्पर्श वाईट प्रकारे होतोय असे पीडित महिलेला वाटत होते. त्यामुळे ती सावध झाली, दुखणे एकीकडे आणि स्पर्श भलतीकडे असे अश्लील चाळे करणार्या डॉक्टरचा प्रताप महिलेच्या लक्षात आला. तीने विरोध केला असता मी टॅन्सिल चेक करतोय असे म्हणणार्या डॉक्टरचे हात मात्र नको तेथे जाऊ लागले होते.
त्यामुळे महिला तातडीने उठली आणि बाहेर पळाली. आणि हा प्रकार उघड झाला. या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून सदर डॉक्टरवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.