१० किमी स्पर्धेत करण राजपाल प्रथम, महिलांमध्ये स्वाती विखे दुसऱ्या

संगमनेर (युवावार्ता प्रतिनिधी)- माळशेज घाटाच्या धुंद वातावरणात आणि निसर्गसंपन्न परिसरात नुकतीच ‘माळशेज घाट मान्सून हाफ मॅरेथॉन २०२५ – सातवी आवृत्ती’ पार पडली. या रोमांचकारी आणि थरारक मॅरेथॉनमध्ये संगमनेरच्या धावपटूंनी जबरदस्त कामगिरी करत संपूर्ण स्पर्धकांमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.
१० किलोमीटर हाफ मॅरेथॉन गटात संगमनेरच्या राजपाल उद्योग समूहाचे संचालक करण राजपाल याने सर्वांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला. तर महिलांच्या गटात आर्किटेक्ट स्वाती विखे यांनी दुसऱ्या क्रमांकाची शानदार कामगिरी केली. याचवेळी २१ किलोमीटर गटात आपला बझारचे संचालक अमर नाईकवाडी यांनी पहिल्या क्रमांकासह आपलं वर्चस्व सिद्ध केलं. त्याच गटात संगमनेरचे सुप्रसिद्ध डॉक्टर आणि पसायदान हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमोद कर्पे यांनी दुसरा क्रमांक मिळवत चमकदार कामगिरी केली.
५० वर्षे वयोगटातील २१ किलोमीटर स्पर्धेत डॉ. संजय विखे यांनी दुसऱ्या क्रमांकाची उल्लेखनीय कामगिरी करत ज्येष्ठ गटात संगमनेरचे नाव उजळवले. याशिवाय २१ किलोमीटर पूर्ण करणाऱ्या सहभागी धावपटूंमध्ये संदीप कानकाटे, प्रवीण जोर्वेकर, ओम मयूर ज्वेलर्सचे संचालक महेश मयूर, महेश झंवर, भावेष खांडरे, डॉ. किशोर पाटील यांचा समावेश होता. तर १० किलोमीटर धावण्यात सर्वेश ढगे यांनी सहभाग नोंदवला.
माळशेज घाटातील ही हाफ मॅरेथॉन केवळ एक धावण्याची स्पर्धा नसून ‘वृक्ष लागवडीचा सामाजिक संदेश’ देण्याचं माध्यमही ठरते. पिंपळगाव जोगा धरण व हरिश्चंद्रगडाच्या सानिध्यातून जाणाऱ्या या मार्गावरून धावणे म्हणजे निसर्गाच्या कुशीत एक आनंददायी अनुभव घेणे होय. धुके, झुळझुळणारा पाऊस, हिरवाई, नद्या, धबधबे, टेकड्या, शेतं आणि गावांची वाट – अशा निसर्गरम्य मार्गावरून धावताना प्रत्येक क्षण अविस्मरणीय वाटतो. या घाटातील प्रत्येक वळणावर असलेल्या सौंदर्यामुळे ही मॅरेथॉन एक पर्वणी ठरते.
माळशेज घाट परिसरातील जैवविविधता, पावसामुळे तयार होणारे अनेक जलप्रपात, पिंपळगाव धरणाजवळ येणारे स्थलांतरित पक्षी, तसेच घाटातील अविस्मरणीय ड्राइव्ह – या सगळ्याचा अनुभव घेत अनेक धावपटूंनी ही मॅरेथॉन खास बनवली. साहसी ट्रेकिंगप्रेमींनाही ही स्पर्धा पर्वणी ठरली.
या मॅरेथॉनमध्ये संगमनेरच्या धावपटूंनी दाखवलेल्या दमदार कामगिरीमुळे शहराचे नाव उजळले आहे. त्यांनी दाखवलेल्या चिकाटी, मेहनत आणि फिटनेसबद्दल संपूर्ण संगमनेरवासीयांना अभिमान वाटतो. माळशेज घाटात केलेली ही धावण्याची मोहीम केवळ स्पर्धा नव्हती, तर निसर्गाशी एकरूप होण्याचा व जगण्यासाठी सकारात्मक संदेश देण्याचा अनुभव होता.