
ज्ञानबा-तुकारामांच्या वारीत लाखो भाविकांचे हरिनाम
आपला महाराष्ट्र हा ग्यानबा तुकारामांचा महाराष्ट्र आहे. पंढरपूरचा विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या म्हणजे अध्यात्म, भक्ती, आणि संतपरंपरेचा अद्वितीय वारसा. त्यांनी श्रीविठ्ठलाचे महात्म्य, पंढरपूरची पुण्यता आणि भक्तीमार्गाचे श्रेष्ठत्व आपल्या ओव्यांमधून अतिशय हृदयस्पर्शी पद्धतीने व्यक्त केले आहे.
काय वर्णू पंढरीनाथा । आठविता विसरे चित्ता । वैकुंठाहुनी मोठा । पंढरीचा राणा ॥
पंढरी सी वैकुंठ । पांडुरंगु साक्षात् । सिंहासनाधिष्ठित । भक्तांच्या सेवेसि ॥
संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू संत सोपानदेवांनी ज्ञानोबांच्या समाधीनंतर १३१९ साली पालखीच्या स्वरूपात आळंदीहून पंढरपूरकडे पहिली वारी सुरू केली.अशी ऐतिहासिक नोंद आहे.
संत तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाचा झेंडा उंच उंच फडकत ठेवला होता. कर्मकांड, ढोंग, फसवणूक, लूट,जातीप्रथा, शिवाशिव, स्त्रीदास्य, अंधश्रद्धा यांच्या विरोधात त्यांनी आपल्या अभंगातून कोरडे ओढले.
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले ।
तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा ।।
हा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा सुप्रसिद्ध अभंग आहे. त्यांनी लोकांना साध्या सोप्या भाषेत देव आणि भक्ति यांचा मार्ग सांगितला होता. लोकांना तुकाराम महाराजांचे विचार पटत होते. त्यांनी वेदाचे अवडंबर , ग्रंथ प्रामाण्य नाकारले. सत्य वर्तन हीच देव भक्ती असे त्यांनी जनसामान्यांना समजावून सांगितले.
विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेद भ्रम अमंगळ ॥१॥
आईकाजी तुम्ही भक्त भागवत।
कराल ते हित सत्य करा ॥२॥
कोणाही जीवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्वर पूजनाचे ॥३॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
सुख दु:ख भोग देह पावे ॥४॥
तुकाराम महाराजांचे विचार सामान्य माणसाला पटत होते. त्या विचारांचा स्वीकार करून त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी भागवत धर्माची वारकरी मंडळी शेकडो वर्षे पंढरपूरची पायी वारी करित आहेत.
संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलभक्तीचा प्रसार करत देहू ते पंढरपूर अशी वारी चालवण्याचा प्रघात पाडला. त्यानंतर १८३० साली ह.भ.प. नारायण बाबा (तुकाराम महाराजांचे वंशज) यांनी तुकाराम महाराजांची पालखी अधिकृत स्वरूपात देहूहून पंढरपूर नेण्याची प्रथा सुरू केली.हि प्रथा शेकडो वर्षे अखंडितपणे चालू आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला सगळा वैष्णवांचा मेळा जमलेला आहे. हजारो दिंड्या चंद्रभागेच्या वाळवंटात विसावल्या आहेत. लाखो वारकरी विठ्ठलाच्या चरणस्पर्शासाठी आसुसलेले आहेत. त्यासाठी ते भूक तहान विसरून मैलोनमैल रांगेत उभे आहेत. पंढरपुरात जमलेले लोक म्हणजे आख्ख्या महाराष्ट्राचे प्रतिबिंब आहे.
खांद्यावर पताका,कपाळाला चंदनाचा टिळा त्यावर बुक्का, गळ्यात तुळशी माळ, मुखी हरिनाम हि वारकऱ्यांची ओळख मात्र सर्वत्र दिसते.
१. सत्य बोलावे. २. परस्त्रीला मातेसमान मानावे. ३. कांदालसूण आणि मांसाहार वर्ज्य करावा. ४. मद्यपान वर्ज्य करावे. ५. रोज हरिपाठ करावा, ‘रामकृष्णहरी’ ह्या मंत्राचा जप करावा. ६. प्रपंचातील कर्मे श्रीविठ्ठलस्मरण करीत पार पाडावी. हे सर्व नियम वारकऱ्यांने पाळायचे असतात.
वारकऱ्याच्या आचारधर्माचा आणखी एक भाग, म्हणजे त्याने गोपी चंदनाचा ऊर्ध्व पुंड्र लावून मुद्रा लावल्या पाहिजेत, त्याचप्रमाणे द्वादश टिळेही लावले पाहिजेत. प्रत्येक वारकरी पंढरपूरची वारी वर्षातून किमान एकदा तरी करतोच.
पंढरपूरला जे वारकरी जमले आहेत ते विठुरायाच्या दर्शनासाठी शेकडो मैल पायी चालत आले आहेत. परमेश्वर प्राप्तीसाठी ऐहिक प्रपंच त्यागाची काहीही गरज नाही अशी वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. एका बाजूला सर्वसंग परित्याग करून परमेश्वर प्राप्ती करा असे सांगणारे अन्य संप्रदाय आणि ग्रंथ पाहता वारकरी संप्रदायाचे वेगळेपण ठळकपणे जाणवते. प्रपंचातुन परमार्थ साधता येतो हि भागवत धर्माची शिकवण खूपच महत्वाची आहे. त्यामुळेच गेली शेकडो वर्षे भागवत धर्माची पताका उंचचउंच फडकत आहे. जात धर्म विसरून गोपाळांचा मेळा जमत आहे.
ज्ञानेश्वर, नामदेव, गोराकुंभार, सावतामाळी, जनाबाई, सेनान्हावी, चोखामेळा, बंका, सोयराबाई, शेख महंमद, कान्होपात्रा, तुकाराम,एकनाथ,पुंडलिक हि सगळी संतांची मांदियाळी बघितली की खात्री पटते की, वारकरी ना कोणत्या जातीत अडकून पडतो ना कोणत्या धर्मात अडकून पडतो. तो ना अस्पृश्यता पाळतो, ना वेद, उपनिषदांना प्रमाण मानतो. ना स्रियांना कमी लेखतो. संत बहिणाबाई पाठक आपल्या अभंगात म्हणतात
संत कृपा झाली। इमारत फळा आली।
ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया।
नामा तयाचा किंकर। तेणे विस्तरिले आवार।
जनी जनार्दन एकनाथ। स्तंभ दिला भागवत।
तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।
बहिणा फडकती ध्वजा। तेणे रूप केले ओजा॥
आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात जमले आहेत. ते हरिनामाचा झेंडा खांद्यावर घेऊन विठूचा गजर करताहेत. जणू ते म्हणताहेत
“बा विठ्ठला तू महाराष्ट्राचा लोकदेव आहेस. तुझ्या दर्शनाला लाखो लोक जमले आहेत. राज्यातील करोडो भाविकांनी तुझी आराधना करण्यासाठी दीड दिवसाचा उपवास धरला आहे. या सगळ्यांना सद्बुद्धी दे. जाती धर्माच्या खोट्या अस्मितेतून या लोकांना बाहेर काढ. या राज्यातील सगळ्या जातीधर्माच्या लोकांचा गोळामेळा टिकवून ठेव. काल्याच्या कीर्तनात जसा सगळ्यांचा काला होतो तसेच सर्व जातीधर्माच्या लोकांचा काला कर आणि त्यांच्यात एकोपा, बंधुभाव निर्माण कर.
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
– हिरालाल पगडाल, संगमनेर
९८५०१३०६२१




















