
रस्त्यांच्या कामामुळे वाढलाय अपघाताचा धोका
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आज (शुक्रवार) सकाळी चंदनापूरी येथील चंदनेश्वर विद्यालयाची विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस अपघातग्रस्त झाली. या अपघातात चार ते पाच विद्यार्थी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही गंभीर जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एम. एच. 14 बी. ए. 8932 क्रमांकाची बस साकूर आणि परिसरातील सुमारे 35 विद्यार्थी घेऊन शाळेकडे जात असताना चंदनापुरी घाटात एका समोरून येणार्या वाहनाने अचानक हुल दिल्याने बसचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस महामार्गावरील काँक्रिटीकरण सुरू असलेल्या भागातील साईट गटारात पलटी झाली. घाटात सध्या सुरू असलेल्या एकेरी वाहतुकीमुळे अपघाताची तीव्रता वाढली.
अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस हवालदार अमित महाजन व महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करून जखमी विद्यार्थ्यांना चंदनापुरी घाटातील गुंजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सुदैवाने जखमी सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून केवळ किरकोळ दुखापती झाल्या आहेत. घटनेनंतर पालकांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये धाव घेत आपल्या मुलांना आधार दिला.
या घटनेमुळे शालेय बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक ग्रामीण भागांतून विद्यार्थ्यांना शहरी भागातील शाळांमध्ये नेण्यासाठी खासगी शालेय बससेवा वापरण्यात येते. मात्र, या बस सुरक्षेच्या नियमांचे आणि आरटीओच्या अटींचे पालन करतात का, यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आज अनेक बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी घेतले जातात, वाहने तांत्रिक दृष्ट्या अपुरी असतात आणि चालक-वाहक वर्गाचा अनुभव किंवा शिस्त याची खातरजमा नसते. यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याचा धोका कायम राहतो. वाहतूक विभाग, आरटीओ व शाळा प्रशासनाने संयुक्तरित्या पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या सर्व बसची तपासणी करावी, चालकांची पार्श्वभूमी आणि प्रशिक्षणाची शहानिशा करावी, बसमध्ये आवश्यक सुरक्षा साधनांची उपलब्धता करावी, क्षमतेनुसार विद्यार्थी वाहतूक करावी हे निकष कठोरपणे तपासले पाहिजेत, अशी जोरदार मागणी आता होत आहे. विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास हा सर्वोच्च प्राधान्याचा विषय असायला हवा. आजची घटना इशारा देणारी आहे. त्यामुळे शासनाने आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ आवश्यक ती पावले उचलावीत, हीच वेळेची गरज आहे.
ही बातमी कळताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या यंत्रणा व कार्यकर्त्यांना तातडीने मदतीच्या सूचना दिल्या असून इंद्रजीत थोरात यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची अस्थिवायिकपणे चौकशी केली. चंदनापुरी घाटातील डॉक्टर गुंजाळ हॉस्पिटल येथे या विद्यार्थ्यांना ऍडमिट करण्यात आले असून या विद्यार्थ्यांची थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात विजय राहणे यांसह चंदनापुरी मधील विविध कार्यकर्त्यांनी भेट घेऊन चौकशी केली यावेळी मुख्याध्यापक त्याचप्रमाणे तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांसह विविध मान्यवर हजर होते. यावेळी इंद्रजीत थोरात यांनी मुख्याध्यापक सर्व विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. घटना दुर्दैवी असून जखमी झालेले विद्यार्थी यांच्यावर उपचार सुरू आहेत पालकांनी व नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले.
या अपघाताची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ. नीलमताई खताळ , शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे ,ग्रामपंचायत सदस्य अंकुश राहणे गुंजाळवाडी पठारचे किरण भागवत, किसन सरोदे जनता प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आनंदराव कढणे, सेक्रेटरी अनिल कढणे, रामदास परबत राहणे विद्यालयाचे प्राचार्य अशोक खेमनर यांनी तात्काळ चंदनापुरी घाटातील डॉ. आर एस गुंजाळ हॉस्पिटल मध्ये भेट देत जखमी विद्यार्थ्यांची विचार पूस करून त्यांना धीर दिला.