विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकाचा जीवघेणा संघर्ष

0
2455


जीव धोक्यात घालून शाळेला
जातांना संदीप गोडसे गुरूजी

युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले – अकोले तालुक्यातील फोफसंडी गावचे आदर्श शिक्षक संदीप सुखदेव गोडसे सर यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समर्पित भावनेने स्वतःला झोकून दिले आहे. निसर्गाने भरभरून दिले मात्र व्यवस्थेने नाकारलेल्या फोफसंडी येथील शाळेतील विद्यार्थी घडवतानाचा त्यांचा रोज संघर्ष सुरू आहे.
संदिप गोडसे सर हे संवेदनशील, कृतीशील, निर्व्यसनी आणि विद्यार्थ्यांबद्दल तळमळ असणारे चांगले शिक्षक आहेत. ज्ञानदानाचे पवित्र कार्य स्विकारलेले व त्यासाठी वाटेल ते कष्ट सोसणारे गोडसे सर यांच्या हाताखालून दरवर्षी अनेक विद्यार्थी शिकून बाहेर पडतात, मोठे होत आहे. मात्र या भागामध्ये हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणार्‍या शिक्षकांनाही अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत असतो. संकटांची मालिका पार करत शाळा गाठावी लागत असते. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या अतिदुर्गम फोफसंडी (ता. अकोले, जि. अहमदनगर) वर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली. मात्र रस्ता, पाणी, वीज यासारख्या भौतिक गरजा अजूनही येथील प्रत्येकाकडे नाहीत. अशा परिस्थितीत देखील येथील मुलांना शिक्षणाची गोडी लावणे, त्यांच्याकडून ते करून घेणे यासाठी जिद्द, मेहनत व तळमळीने काम करणारे शिक्षक गरजेचे असतात.


महाशक्ती, डिजीटल शिक्षण, कौशल्य विकास हे शब्द कानाला खूप छान वाटतात. मात्र आजही दुर्गम भागात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आणि त्यांना शिकवणार्‍या शिक्षकांना संघर्षच करावा लागत आहे. हे या फोफसंडीमधील कोंडारवाडीतील जिल्हा परीषद शाळेत जाणार्‍या शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडे पाहून आपल्याला जाणीव होते. काही अपवाद वगळले तर सध्या महाराष्ट्रात अनेक शिक्षक उत्तम कार्य करताना दिसत आहे. त्यात अतिदुर्गम भागातील शाळांची स्थिती अतिशय वाईट आहे. अशा गावांत विज नाही, पावसाळ्यात रस्ते बंद, मोबाईलला नेटवर्क नाही. अशी गावे शिक्षकांसाठी खरी आव्हानात्मक ठरतात. अगदी मोजकेच शिक्षक हे खडतर आव्हान स्विकारतात. त्यापैकी एक अकोले तालुक्यात आहे. त्यांचे नाव आहे संदीप सुखदेव गोडसे. रोज लहित खुर्द- कोतुळ- फोफसंडीपर्यंत दुचाकी त्यानंतर फोफसंडीपासून दोन किमीवर असणार्‍या कोंडावाडीपर्यंत पायी प्रवास करुन ते शाळा गाठतात. पावसाळ्यात फोफसंडीपर्यंत पोहोचणे कमालीचे अवघड. ओढे, नाले पुराच्या पाण्याने भरुन वाहतात. त्यातर सोसाट्याचा वारा झेलत, प्रसंगी जीवावर उदार होवून कमरेभर पाण्यातून शाळा गाठावी लागते. तसेच परतीचा प्रवासही खडतरच.. दाट झाडी, चार ते पाच फुटापर्यंत वाढलेले उंच गवत, ओढे-नाले, खाच-खळगे कसेबसे पार करुन घर गाठावे लागते. पण प्रबळ इच्छाशक्ती असलेली मंडळी कुठल्याही शाळेत शिक्षक म्हणून गेलीत तर अमुलाग्र बदल घडवितात. अनेकांनी अशा शिक्षकांकडून प्रेरणा घेवून कार्य करणे गरजेचे आहे. त्याशिवाय ग्रामीण- आदिवासी क्षेत्रातील शैक्षणिक विकास जलद गतीने होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here