
संगमनेरचे उमेश गुंजाळ आणि अर्जुन वाळके यांचा विजयी झेंडा
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्या निवडणुकीची चर्चा होती अशा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने सत्ताधारी पुरोगामी मंडळाचा सुपडा साफ केला. 22 वर्षांपासून शिक्षक सोसायटीवर सत्ता असलेल्या पुरोगामी मंडळाला ‘सेवानिवृत्ती’च्या विषयावरूनच पराभवाला सामोरे जावे लागले. सत्ताधारी पुरोगामी मंडळाला नेहमीप्रमाणे यश मिळेल असा अंदाज असताना स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने एकीच्या जोरावर प्रा. कचरे यांच्या टीमचा पराभव केला. स्वाभिमानीसाठी ही निवडणुक एकतर्फी झाली. मतमोजणीनंतर माध्यमिक शिक्षक सोसायटीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचे 21 संचालक मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.
यामुळे सोसायटीवर गेल्या 22 वर्षांपासून असलेली प्रा. भाऊसाहेब कचरे यांची सत्ता संपुष्टात आली असून खर्याअर्थाने माध्यमिक शिक्षक सभासदांनी प्रा. कचरे यांना सोसायटीच्या राजकारणातून सेवानिवृत्त केले असल्याची भावना शिक्षक सभासदांमधून व्यक्त होत आहे. संगमनेरचे उमेश गुंजाळ यांना संपूर्ण नगर जिल्ह्यात तिसर्या क्रमांकाची 4638 इतकी सर्वाधिक मते मिळाली. तर ओबीसी प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने अर्जुन वाळके यांना 4638 मते मिळाली. उमेश गुंजाळ यांच्या सुविद्य पत्नी निकिता गुंजाळ आणि अर्जुन वाळके यांच्या सुविद्य पत्नी अनिता वाळके यांनीसुध्दा या निवडणुकीमध्ये विशेष मेहनत घेतली.
एकूण 8 हजार 635 मतदानापैकी सर्वाधिक मते विद्यमान संचालक आप्पासाहेब शिंदे यांना सर्वसाधारण प्रवर्गातून 5 हजार 230 मिळालेली आहेत. त्याच्या खालोखाल संचालक बाबासाहेब बोडखे यांना एनटी मतदारसंघातून 5 हजार 120 मते मिळाली आहेत. या निवडणुकीत परिवर्तन मंडळाने सत्ताधारी मंडळाचा 500 हून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला आहे. दरम्यान, दुपारी चारपर्यंत निकाल स्पष्ट होताच परिवर्तन मंडळाच्या शिक्षक सभासद आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. यावेळी पुरोगामी मंडळाच्या विरोधात तर परिवर्तन मंडळाच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. नगर शहराजवळील कल्याण रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात मतमोजणीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी पार पडली.
गेल्या 15 ते 20 दिवसांपासून जिल्ह्यात माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीच रणधुमाळी सुरू होती. या निवडणुकीत सत्ताधारी गटासह विरोध गटाने मुक्तहस्ताने खर्च केला. यंदा पहिल्यांदाच माध्यमिक शिक्षक सोयायटीच्या राजकारणात सत्ताधारी प्रा. कचरे यांच्या विरोधात शिक्षकांच्या राजकारणातील सर्व शिक्षक संघटना आणि गट एकत्र आले होते. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत सोसायटी कचरे गटाच्या ताब्यातून हिसकावून घेण्याचा चंग बांधला होता. त्यात त्यांना यश आले आहे.
प्रा. कचरे सोसायटीच्या राजकारणातून बाद
2003 मध्ये तत्कालीन नेता सेवानिवृत्त झाल्याने त्यांनी सोसायटीच्या राजकारणातून बाजूला व्हावे, असा मुद्दा पुढे करत सहकार मंडळाच्या विरोधात बंड करत प्रा. कचरे यांनी पुरोगामी मंडळ स्थापन करत सोसायटी ताब्यात घेतली. त्यानंतर सलग 22 वर्षे ही संस्था प्रा. कचरे यांच्या ताब्यात होती. दोन वर्षापूर्वी कचरे हे स्वत: माध्यमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतरही सोसायटीच्या राजकारणात सक्रिय होते. यंदा पुरागामी मंडळाचे नेतृत्व करत त्यांनी उमेदवार उभे केले. त्यांच्या मंडळात त्यांनी दोन जुने संचालक वगळता 19 नवीन चेहर्यांना संधी दिली. मात्र, ज्या मुदद्यावर कचरे यांनी 2003 ला बंड केले होते. त्याच सेवानिवृत्तीच्या मद्द्यावरविरोधकांनी त्यांना घेरत त्यांना आता खर्याअर्थाने सोसायटीच्या राजकारणातून सेवानिवृत्त केले असल्याची भावना अनेकांनी मतमोजणीच्या निकालानंतर व्यक्त केली.
विरोधकांची वज्रमुठ ठरली वरचढ
यंदाच्या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी कचरे यांच्या विरोधात माध्यमिक शिक्षकांच्या राजकारणातील सर्वसंघटना एकटवल्या होत्या. त्यांनी सर्वांनी एकत्र येत काहीही करून कचरे यांचा पराभव करण्याचा निर्णय घेतला होता. हा मुद्दा प्रमुख्याने सभासदांसमोर लावून धरत त्याचे मतदानात रुपांतर करण्यात यशस्वी झाल्याने कचरे गटाचा निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव झाला आहे.
परिवर्तनचा पहिला चेअरमन?
माध्यमिक शिक्षक सोसायटीमध्ये दोन दशकांहून अधिक काळानंतर सत्ता परिवर्तन झाले आहे. यामुळे यंदाच्या विजयी स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचा पहिला चेअरमन कोण होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
विजयी उमेदवार
सर्वसाधारण मतदारसंघ – बाजीराव अनभुले, राजेंद्र कोतकर, अतुल कोताडे, सुधीर कानवडे, संभाजी गाडे, बाळाजी गायकवाड, उमेश गुंजाळ, आप्पासाहेब जगताप, सुनील दानवे, किशोर धुमाळ, विजय पठारे, छबू फुंदे, साहेबराव रक्टे, शिवाजी लवांडे, आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे.
महिला मतदारसंघ – वर्षा खिल्लारी, वैशाली दारकुंडे.
अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघ – सुरज घाटविसावे.
ओबीसी मतदारसंघ- अर्जुन वाळके.
विमुक्त जाती मतदारसंघ- बाबासाहेब बोडखे.