सर्वत्र संताप, विधीमंडळात आवाज, ग्रामस्थांचा रस्ता रोको

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यातील वडगावपान येथे मंगळवारी सकाळी घडलेल्या अमानुष अॅसिड हल्ल्याच्या घटनेने संगमनेरसह राज्य हादरले असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. डी.के. मोरे जनता माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सहावीतील 13 वर्षीय विद्यार्थिनी कु. ईश्वरी संजय डहाळे हिच्यावर अज्ञात तरुणाने अॅसिड फेकून भ्याड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वरी ही मूळची धांदरफळ येथील रहिवासी असून वडिलांच्या निधनानंतर ती आपल्या आईसह वडगावपान येथे मामाकडे राहत होती. मंगळवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ती घरी जात असताना महादेव मळा परिसरातील सुनसान रस्त्यावर अज्ञात माथेफिरूने या मुलीवर अॅसिड हल्ला केला. या रस्त्यावर वस्ती कमी असल्याने आणि सीसीटीव्ही कॅमेर्यांचा अभाव असल्याचा फायदा घेत अज्ञात तरुण दुचाकीवरून आला आणि त्याने अचानक ईश्वरीच्या चेहर्यावर अॅसिड फेकले. या हल्ल्यात तिच्या चेहर्यावर गंभीर जखमा झाल्या असून वैद्यकीय अहवालानुसार सुमारे 5 ते 6 टक्के भाग भाजला आहे. घटनेनंतर आरोपी तात्काळ पसार झाला. जखमी अवस्थेतील ईश्वरीला तातडीने प्रवरा रुग्णालय लोणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असली तरी डॉक्टरांकडून योग्य उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
माजी मंत्री थोरात, वडेट्टीवार, आ. तांबे यांच्याकडून निषेध –
वडगावपान येथील तेरा वर्षीय मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याच्या घटनेचा माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून, हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. सुधीर तांबे यांनी या घटनेनंतर तातडीने रुग्णालयात जाऊन जखमी मुलीची भेट घेत तिच्या कुटुंबीयांना धीर दिला. त्यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी केली. आ. सत्यजीत तांबे यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा मजबूत करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या घटनेला अत्यंत निंदनीय ठरवत, गुन्हेगार कोणत्याही जाती-धर्माचा नसून तो केवळ गुन्हेगारच असतो, असे ठामपणे सांगितले. राज्यात महिला आणि लहान बालिकांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नसून, संगमनेरमध्ये सहावीच्या वर्गात शिकणार्या एका चिमुरडीवर झालेला सिड हल्ला हा अत्यंत संतापजनक आहे. राज्यात पोलिसांचा धाक उरला आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात उपस्थित केला. वडेट्टीवार यांनी शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या घटनेचे गांभीर्य आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तातडीने चर्चा करण्याची मागणी केली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली. पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक 126/2026 नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 124(1), 126(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी दहा विशेष पथके तयार करण्यात आली असून सायबर टीम, फॉरेन्सिक तपास, तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सर्व बाजूंनी कसून तपास सुरू आहे. मात्र सायंकाळपर्यंत आरोपीचा ठावठिकाणा लागलेला नाही.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी ग्रामस्थांनी कोल्हार-घोटी रस्ता येथे रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनात शाळकरी मुली, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. संगमनेर तालुक्यात चालले काय ? असा सवाल करताना आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करताना महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी सरकारने कडक कायदे करावे अशी आग्रही मागणी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली आहे. लहानग्या चिमुकलीवर झालेला सिड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतील आरोपीला प्रशासनाने तातडीने शोधून कठोर शिक्षा केली पाहिजे. जेणेकरून पुढचा आरोपी असे गुन्हा करणार नाही. परवाच पठार भागातील एका युवतीवर चाकूने हल्ला झाला. काल सिड हल्ला झाला संगमनेर तालुक्यात चालले काय असा संतप्त सवाल त्यांनी केला.
तर डॉ.मैथिलीताई तांबे म्हणाल्या की, संगमनेर शहरामध्ये महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेसाठी रक्षक दल निर्माण केले आहे त्याच पद्धतीने आपल्याला ग्रामीण भागामध्ये सुद्धा गावांमध्ये महिलांच्या सुरक्षेतेसाठी रक्षक दल निर्माण करावी लागतील. तर शिवसेनेच्या सौ. निलम खताळ यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत पोलीसांनी आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी. या प्रकरणी आ. अमोल खताळ देखील विधान सभेत आवाज उठवत असून पिडीत मुलीला सर्वोतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
यावेळी सौ.दुर्गाताई तांबे, बाबा ओहोळ, बाळासाहेब गायकवाड, पद्माताई थोरात, विक्रम ओहोळ, निलेश थोरात, शरद नाना थोरात, अर्जुन काशीद, सरपंच श्रीनाथ थोरात, रूपाली थोरात, अरुण कुळधरण, अहिल्या ओहोळ, सविता ओहोळ, बाळासाहेब गडगे, गणेश गडगे, रवींद्र मैड, सुधीर थोरात, आबासाहेब थोरात, भाग्यश्री शिरसाट, आनंद वर्पे, रावसाहेब जंबुकर यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व वडगाव पान मधील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. विखे, आ. खताळ यांनी विधीमंडळात उठवला आवाज –
शालेय विद्यार्थीनीच्या चेहर्यावर अॅसिड फेकण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर असून पोलीसांना याबाबत तपासाच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. वडगावपान येथे शालेय विद्यार्थ्यानीवर अॅसिड फेकल्याच्या घटनेची दखल घेवून पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण रूग्णालयात विद्यार्थीनीला सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत. सदर विद्यार्थीनी आपल्या नातेवाईकांकडे राहात होती. घटना ज्या भागात घडली तिथे सीसीटिव्ही कोणतीच व्यवस्था नाही. तरीही पोलीसांनी विशेष पथक नेमून आरोपीचा तपास करावा असे निर्देश आपण दिले असून शासनाच्यावतीने विद्यादर्थीनीला मदत मिळवून देण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली. दरम्यान आ. अमोल खताळ यांनी विधानसभेत या घटनेचा विषय उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.यावर महीला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी घटनेची माहीती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घेतली असून या विद्यार्थीनीला सर्व मदत करण्याची ग्वाही सभागृहात दिली.

यावेळी डॉ. जयश्री थोरात, सौ. निलमताई खताळ, छोट्या मुलींच्या हस्ते तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी निवेदन स्वीकारले. याचबरोबर आरोपीचा लवकरात लवकर शोध लावण्यासाठी पोलीस प्रशासन काम करत असल्याचे ते म्हणाले यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
13 वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या सिड हल्ल्याचा महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात,मा. आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह विविध मान्यवरांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. याचबरोबर घटना घडल्यानंतर डॉ.जयश्रीताई थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांनी प्रवरा हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलीची चौकशी केली. याचबरोबर नातेवाईकांना धीर दिला या मुलीच्या दवाखान्याचा उपचाराचा सर्व खर्च एसएमबीटी संस्था करणार असून अत्याधुनिक टेक्नॉलॉजी द्वारे सर्जरी किंवा डोळ्याच्या आरोग्याबाबत डॉ.जयश्रीताई थोरात यांनी मुंबई येथील प्रतीथयश डॉ. रानडे विविध डॉक्टरांशी संपर्क केला आहे. या भ्याड हल्ल्याचा संगमनेर तालुक्यातून सर्व क्षेत्रातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांत महिला व मुलींवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने घडत आहेत. रणखांब येथे दोन दिवसांपूर्वी एकतर्फी प्रेमातून तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला झाला होता, तर काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली होती. या सलग घटनांमुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
संगमनेर तालुका महिलांसाठी असुरक्षित होत चालला आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अवैध धंदे, अमली पदार्थांचा वाढता प्रभाव आणि वाढती गुन्हेगारी यामुळे सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. समाजातील प्रत्येक मुलगी ही घराची लक्ष्मी असून तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे. अशा अमानुष कृत्यांना आळा घालण्यासाठी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देणे अत्यावश्यक आहे. या घटनेतील पीडित मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरत आहे.





















