डॉ. धामणेंचा अवमान, पोलीस प्रमुख काय कारवाई करणार ?

0
645

’सद्रक्षणाय खलनिग्रहणाय‘ हे ब्रीद घेऊन समाजाची आणि देशाची सेवा, सुरक्षा करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. अनेक अधिकारी व कर्मचारी ती करतात देखील, परंतु काही जण स्वतःच कायदा हातात घेतात. गुंड, अपप्रवृत्तींचा नाश करता करता त्यांच्यातच अपप्रवृत्ती घुसली आहे. राजकारणी, पुढारी, धनदांडगे, दबंग यांच्यापुढे नतमस्तक होणारे हे कायद्याचे रखवालदार सर्वसामान्यांना मात्र कस्पटासमान वागणूक देतात. कोणतीही माहिती न घेता, जाणून न घेता ज्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आणि समाजाला दिशादर्शक आहे, ज्यांनी सीमेवर उभे राहून आपले रक्षण केले, समाज शिक्षित केला आशा प्रतिष्ठीत आणि सामान्य लोकांवरच हे वर्दीतील ‘भाई‘आपला धाक दाखवतात. एखादा साधा पोलिस ठाण्यातील शिपाई, कॉन्स्टेबल दादागिरी, भाईगिरी करतांना दिसतो. अनेक असे वादग्रस्त कर्मचारी पोलिस ठाण्यात असतात मात्र त्यांच्यावर कुणाचाही धाक नसतो. फुकटचा पैसा खाताना कशाचीही तमा बाळगली जात नाही. असाच एक विचित्र आणि धक्कादायक अनुभव मनगाव प्रकल्पाचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते आणि ज्यांचे काम समाजाने डोक्यावर घेतलेले डॉ. राजेंद्र धामणे यांना आला. त्यांनी तो अनुभव जनते पर्यंत पोहचवला आणि समाजात एकच संतापाची लाट उसळली. डॉ. धामणे सारख्या व्यक्तीला असा त्रास होत असेल तर सर्वसामान्यांचे काय? जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या घटनेची दखल घेऊन सदर कर्मचार्‍यावर कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ समाजातून होत आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक काय कारवाई करता याकडे जनतेचे लक्ष आहे. ”

डॉ. धामणे मनोगत (मनगाव प्रकल्प संचालक

मुर्दाडांची मुर्दुमकी
आपण बहुतेक सामान्य माणस इथे आपला जन्म झाला आणि इथल्या असल्या नसल्या विविध परंपरांचा पाईक होवून जगण्यात धन्यता माननांरे आपण सगळी सामान्य माणसे. इथे सरकारी यंत्रणा पोसते आपल्या जीवावर. आपण प्रामाणिकपणे भरत असलेल्या आयकरावर सामान्य माणूस पापभीरू आणि सरळ असतो.
पण इथे काही अपवाद असे आहेत की आपण काहीतरी असामान्य आहोत असं भासवत अगदी तृतीय श्रेणी कर्मचारी असले तरी सरकारी आहोत म्हणून मुर्दाडपणाची मर्दुमकी दाखवून सामान्याना पिळणारे, नडणारे पोलीस यंत्रणेतील कर्मचारी किती अरेरावी आणि दादागिरी करतात याचा एक अनुभव आज आला. मला असा अनुभव आजपर्यंत कधी आला नाही. त्यामुळे मी असा अनुभव सांगणार्‍या लोकांकडे पूर्वी शंकेने बघायचो. कदाचित मी माझ्या पूर्वायुष्यात पत्रकारिता केली, एका वर्तमानपत्रासाठी क्राइम रिपोर्टिंग केलं त्यावेळी कदाचित पोलीस कर्मचारी जरा बरे असावेत !

वेळ साधारण दुआपरची एक वाजण्याच्या आसपास. मी एका कामनिमित्त मनगाव वरून अहिल्यानगरला चाललो होतो. सावेडी नाक्यावर माझ्या डाव्या बाजून एक काळी काच असणारी काळी क्रेटा गाडी भरकन मला पुढच्या बाजूला घासून गेली. माझ्या डाव्या बाजूच्या आरशाखाली चांगलेच घासले गेले. मी या अचानक प्रसंगाने भांबावून गेलो.
इतक्यात ती काळ्या रंगांची कार पुढे जावून थांबली. त्यातून फिल्मी स्टाईल रेबनचा गॉगल लावलेला अडदंड माणूस आणि त्याचा सहकारी उतरले. तो फिल्मी स्टाईलने माझ्या बाजूला आला अस्सल शिवी हासडून खाली उतर म्हणाला. आता ऐन रस्त्यावर कसे उतरणार मी गाडी बाजूला घेवू लागलो तर आमच्या अंगावर गाडी घालतो काय म्हणत तो धावून आला. अतिशय उर्मट पणे बोलणारा हा कुणी तरी लोकल गुंड असावा असे वाटत होते. काय करावे हे सुचत नव्हते.

आमच्या गाडीच नुकसान भरून दे नाहीतर बघतो तुझ्याकडे म्हणत त्याने आक्रमक पवित्रा घेतला. वास्तविक गाडीला फार काही झाले नव्हते. पण त्याचा आविर्भाव भयंकर होता. हा लोकल गुंड असावा असे वाटल्याने त्या परिसरातील मोठे नाव असणार्‍या आमच्या एका मित्राला फोन लावला. तोही गडबडीत यायला निघाला, तर हा रेबन गॉगलवाला म्हणाला, मी पोलीस आहे. चल पोलिस स्टेशनला, तुझ्यावर गुन्हाच दाखल करतो. आत्ता इतक्या किरकोळ गोष्टीसाठी गुन्हा? मग म्हणाला, चल, शो. रुमाल आमच्या गाडीचं झालेलं नुकसान भरून तितकी रक्कम दे. त्याची नियत आत्ता लक्षात आली होती.

मी माझी बहीण वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे, तिला फोन लावला. तिनंही याला समजावलं, पण हा म्हणजे श्रीरामपूरचा डीबीचा पोलीस शिपाई. तो ऐकतोय होय? कसंतरी बराच वेळानं ऐकला, पण फोन ठेवून झाल्यावर पुन्हा गुर्मीत आला. मला चूक मान्य कर, सांगू लागला. शेवटी ‘गाढवापुढं शहाणपण दाखवायचं नसतं’ असं म्हणतात, त्याप्रमाणे मी हो, मी रस्त्यावर गाडी घेऊन आलो, ही माझीच चूक समजून पुन्हा मार्गस्थ झालो.

यानिमित्ताने काही प्रश्न निर्माण झाले – पोलीस खात्यात साधा डीबी कर्मचारी असणारी व्यक्ती काळ्या काचा, काळी गाडी, महागडा रेबन आणि आयफोन 16 प्रो बाळगू शकतो, म्हणजे पोलीस खाते किती अफाट काम करते? पोलीस गुंडगिरी करतात की सामान्याच्या भल्यासाठी काम करतात रस्त्यावर कुणाचाही मुल्हीजा न बाळगता कुणालाही दादागिरी करण्याचे यांना अधिकार कुणी दिले? त्या-त्या पोलिस स्टेशनच्या प्रभारींचं याकडे लक्ष असतं की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं? माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यालाही हे असं भोगावं लागत असेल, तर सामान्य माणूस काय डेंजर घाबरत असेल आणि ते जे म्हणतील, मागतील ते करत असतील? शेवटी तो एक वाक्य मात्र म्हणाला, तुझी बहीण पोलीस खात्यात आहे म्हणून सोडलं, नाहीतर बघितलंच असतं.

मी तर फार घाबरलो बाबा! हेच पोलीस रात्री बेरात्री, त्यांना कुणी बेवारस सापडले म्हणजे, कुणा कार्यकर्त्याने आग्रह धरला तर, त्यांना मिळून आलेल्या महिलेला रात्री पोलिस स्टेशनमध्ये ठेवता येत नाही. तेव्हा रात्र-रात्र आमची झोप खराब करतात. अर्थात रस्त्यावरच्या माय-माऊलींना सांभाळणं, त्यांना कायमचं घर देणं, त्यांची रस्त्यावरच्या अत्याचारातून झालेली बाळंतपणं करणं, हे आम्ही स्वीकारलेलं काम, कधी कोणतीच सबब सांगून टाळत नाही. आज 477 माता भगिनी आणि 42 मुलं मनगावी सुखाने राहतात. पण हे असे पोलिसांच्या मुर्दुमकीचे अनुभव आले की अस्वस्थता येते. या सन्माननीय पोलीस कर्मचार्याचे नाव आहे – पो. कॉ. शरद (भाई) अहिरे, श्रीरामपूर पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here