बिबट्याच्या हल्ल्यात ५ मेंढ्या ठार तर २० कोंबड्यांचा फडशा

संगमनेर(प्रतिनिधी)-
उंबरी बाळापूर (ता. संगमनेर) येथे शुक्रवारी पहाटे बिबट्याने पशुधनावर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात पाच मेंढ्यांचा मृत्यू झाला असून, 7 ते 8 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच, बिबट्याने या ठिकाणी असलेल्या 5 ते 20 कोंबड्यांचा फडशा पाडल्याने शेतकर्यांचे दोन ते अडीच लाखांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवेला जात आहे.

उंबरी बाळापूर शिवारातील लेंडी पुलाजवळ असलेल्या जनगर येथे खंडू कारभारी होडगर यांची गट नंबर 476 मध्ये शेती आणि मेंढ्या व कोंबड्यांसाठी शेड (गोठा) बांधले आहे. त्यात 45 मेंढ्या व 25 ते 30 गावरान कोंबड्या होत्या. गुरुवारी कार्यक्रमानिमित्त बाहेर गेल्याने संदीप होडगर हे नेहमीप्रमाणे गोठ्यात झोपण्यासाठी गेले नाही. शुक्रवारी सकाळी मेंढ्याना चारापाणी करण्यास्राठी गेले असता, त्या ठिकाणी 4 ते 5 मेंढ्या रक्ताच्या थारोळ्यात मृत पडलेल्या दिसल्या. त्यात लहान कोकरांचादेखील समावेश आहे. तसेच, 7 ते 8 मेंढ्या गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या. संदीप यांनी या घटनेची माहिती कुटुंबाला सांगितले. सुरेश होडगर यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनपाल रमेश पवार, वनरक्षक एस. बी. सोनवणे, वनमजूर बाळासाहेब डेंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकर्यांला सर्वोतोपरी मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. 9 ते 10 महिन्यांपूर्वी संदीप होडगर याने कर्ज काढून मेंढ्या खरेदी केल्या होत्या. रासपचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र खेमनर (जानकर), संदीप होडगर, सुरेश होडगर, लक्ष्मण जुधारें, बापू कुदनर, राहुल जुधारें, नानासाहेब होडगर, रवींद्र खेमनर यांनी परिसरात बिबट्यासह रानडुक्कराचीही दहशत असून, वन विभागाने पिंजरा लावुन बिबट्याचा जेरबंद करण्याची मागणी केली.