संगमनेरवासियांसाठी उद्योजकांचा दिशादर्शक सहभाग
युवावार्ता (प्रतिनिधी)
नुकतीच कोल्हापूर येथे डेक्कन स्पोर्टस् क्लब आयोजित बर्गमन ११२ ही हाफ आयर्नमन व ऑलिम्पिक ट्रायथलॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संगमनेर येथील प्रतिशय उद्योजक कपिल चांडक, सौरभ आसावा व प्रतिथयश सीए आदित्य राठी यांनी दैदिप्यमान यश मिळविले.या स्पर्धेमध्ये पोहणे, सायकल चालविणे व पळणे या प्रकारचे क्रिडा प्रकारांचा सहभाग असतो. यामध्ये ठराविक अंतर हे निर्धारीत वेळेत पार करावे लागते. हाफ आयर्नमन स्पर्धेत १.९० किमी पोहणे, ९० किमी सायकल चालविणे, २१.१ किमी पळणे अशी आव्हाने असतात. तर ऑलिम्पिक ट्रायथलॉन मध्ये १.५० किमी पोहणे, ४० किमी सायकल चालविणे, १० किमी पळणे अशी आव्हाने असतात. यामध्ये कपिल चांडक व सौरभ असावा यांनी हाफ आयर्नमन तर आदित्य राठी यांनी ऑलिम्पिक ट्रायथलॉन स्पर्धा पुर्ण केली.
उद्योजक कपिल चांडक यांना १.९० किमी पोहणे १ तास १२ मिनिटे, ९० किमी सायकल चालविणे ३ तास ४९ मिनीटे, २१.१ किमी पळणे २.५० मिनीटे असा वेळ लागला, एकूण ८ तास ५ मिनीटे ते या स्पर्धेत सहभागी होते. सौरभ आसावा हे १.९० किमी पोहणे ५६ मिनिटे, ९० किमी सायकल चालविणे ३ तास २४ मिनीटे, २१.१ किमी पळणे २.४५ मिनीटे असा वेळ लागला, एकूण ७ तास १५ मिनीटे ते या स्पर्धेत सहभागी होते. आदित्य राठी हे १.५० किमी पोहणे ४७ मिनिटे, ४० किमी सायकल चालविणे १ तास ३८ मिनीटे, १० किमी पळणे १.१५ मिनीटे असा वेळ लागला, एकूण ३ तास ४० मिनीटे ते या स्पर्धेत सहभागी होते.
आम्ही आपापल्या कामात अतिशय व्यस्त असूनही आरोग्याला प्रथम प्राधान्य देऊन या प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत. यामुळे आम्हाला शारीरीक फायदा तर होतोच परंतु दैनंदिन कामकाजात सुद्धा अतिशय प्रसन्न राहण्यास मदत होते असे स्पर्धकांनी यावेळी सांगितले व सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्यासाठी रोज थोडा वेळ काढावा असे आवाहन त्यांनी केले.