Friday, August 19, 2022

काट्याच्या अणीवर वसलेले विश्व : अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांना विनम्र आदरांजली

जिच्या शब्दात होती ताकद दगडाला पाझर फोडण्याची, जिच्या डोईवरचा पदर कधी धरला नाही आणि पसरलेला पदर कधीही रिकामा राहिला नाही; जिनं अनाथांना पोरकं कधी होऊ दिलं नाही आणि आप-पर भावात परक्यांना आपलं केलं. मायपणाला बट्टा लागू नये म्हणून जिने पोटाच्या लेकरावरली आईची साय दूर केली. ती अनाथांची आई सिंधुताई. तिच्या जाण्याने सर्वार्थाने अनेक अनाथांच्या पोटात पोकळी निर्माण झाली आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्रा उद्धारी ही पारंपरिक म्हण बदलून ’जी अनाथांस सावरी तीच राष्ट्रा उद्धारी’ अशी म्हण नव्याने रूढ करण्यास भाग पाडणाऱ्या, मानवेतेचे महान कार्य करणार्‍या सिंधूताईसारख्या मातांची आज भारताला खर्या अर्थाने गरज आहे.


माणसाच्या भावना अनावर होतात तेव्हा एकतर त्याच्या डोळ्यांना बांध फुटतो, नाही तर त्याच्या मुठी वळतात. सिंधुताईंच्या शब्दात अलौकिक समन्वय होता, अन्वय होता. आशय होता. काव्य होतं. हे काव्य कारुण्याचं होतं. त्यांनं अश्रुंचे बांध थोपवले. वळलेल्या मुठी सैल केल्या. बहिणाबाई चौधरी लक्ष्मीबाई टिळक आणि सिंधुताई तिघींचं कुळ एकच, माय. मूळ बेंबीचा देठ. म्हणूनच त्यांचे शब्द आईच्या नाळेशी नातं सांगतात, जोडतात. यांची जात केव्हाच निघून गेलेली. त्याचं गोत्र, ’प्रांजला’. बहिणाबाई आणि लक्ष्मीबाई लिहित्या झाल्या, सिंधुताई बोलक्या झाल्या. त्या बोलत राहिल्या. शब्द हेच तिघींचं माध्यम. काट्याच्या अणीवरली ही तीन गावं; गावं कसली विश्‍वच! दोघींनी निर्मिती केली. एकीनं घडवल. संस्कृती हाच तिघींचा दुवा. स्वत्व हीच त्यांची शक्ती. मानवता हिचा भक्ती. दोघींनी शब्दांतून साहित्य रचले. एकीने शब्दांतून जीवन उभे केले. सिंधुताईनी उच्चारलेला प्रेत्येक शब्द साहित्य सरिताच होता – सिंदू सरीता.


सिंधुताई महानुभव जगल्या. जगता जगता त्यांनी जगाला महानुभव दिला. तोच महानुभव बहिणाबाई आणि लक्ष्मीबाई यांनीही दिला होता. अक्षर ओळख तिघीनही होती. शाळा मात्र एकच, वेदनेची. सिंधुताई लिहित्या झाल्या असत्या तर… हा प्रश्‍नच बेफिजूल, निरर्थक. त्यांनी वांड़मय रचलं. वाणीमय ते वांड़मय. जे कागद वाचण्यासाठी त्या खड्ड्यात दडवून ठेवत तेच चुलीत जाळले गेले. त्या म्हणतात, कागद जळाले काळीज पेटले वेदनेचे, करुणेचे हेच ते महाकाव्य. अनाथांच्या डोईवर पदर एक वेळ धरायचा आणि दुसर्‍या वेळी त्यांना जगविण्यासाठी तोच पदर लोकांसमोर पसरायचा. तेवढाच त्यांच्या माथ्यावरून तो ढळायचा.


त्यांनी भीक मागितली जगण्यासाठी. रेल्वेत भीक मागणारी हीच आपली ओळख असं त्या सांगतात; पण जगाला आज त्यांची ओळख पटली आहे ती दुसर्यांना जगविण्यासाठी भीक मागणारी ’माय’ अशी. त्या म्हणायच्या, फुलांच्या पायघड्यावरून चालणार्‍याने काटे सहन करायला शिकावं. काट्यांना बोचणेच माहीत असते. त्यांना वेदना नसते. काट्यावरून चालणारा मजबूत होतो म्हणून काट्यांशी दोस्ती करावी. काटे फुलांसह स्वीकारावेत. आपल्या हयातीत आपला जीवनपट साकारलेला बघताना डोळे डबडबले पण सारे रडत आहेत हे बघून त्यांना आपले आसू आवरले. रडनार्यांचे आसू त्यांनी पुसले. कोणाला कोणी जन्म दिला हे त्यांनी कधीही विचारलं नाही. ज्याला कोणी नाही त्याला जगवणारी ती यशोदा होती. ’जगणं म्हणजे आतून पेटणं’ अस त्या म्हणत. अंतरीची ऊर्जा जी आहे ना ती पेटायला हवी. पेटवायला हवी तरच ते खरे जीवन… जगणे. आलं लेकरू त्यांनी आपल्या मांडीवर घेतलं. त्याचं मायेचं छत्र हीरावू दिलं नाही.


एका मोठ्या समाजातला दुर्लक्षित तुकडा त्यांनी आपला केला. त्याला भाकरतुकडा दिला. ज्या समाजाचा तो अविभाज्य घटक होता त्याला मग समाजानेही जगवायचं ठरवलं, पण माईंनी पदर पसरल्यावर. तो पदर कधीही रिकाम्या राहिला नाही. दान, अनुदान हे शब्द त्यांच्या ओठी नसायचे. त्यांच्या ओठावर शब्द होते नुकतीच नाळ कापलेल्या मातेच्या मायेचे. त्यांनी नाळ कधी तोडली नाही.


शेजारच्या वर प्रेम करायला शिकवणार्‍या ख्रिस्ताने शेजार्‍याची जी ओळख सांगितली ती ओळख सिंधुताईंच्या प्रतिमेत सर्वांच्या मनात कायम राहील. मरणासन्न अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या कुणा एका माणसाला पाहून धर्ममार्तंड निघून गेले, धनिक पळून गेले. त्याला ज्याने उचलून घेतले तो कंगाल होता. त्याचं याचं नातं वेदनेचं होतं, प्रेमाचं होतं. प्रेम क्षमाशील आहे ते कधी आढ्यता मिरवत नाही. ते कर्तव्य जाणतं. कोणाला आपली गरज आहे हे ते जाणतं. सिंधुताई गरजवंतांपर्यंत पोहोचल्या. गरजवंतांपर्यंत पोचतो तोच खरा संत. कुष्ठरोग्यांना आपली गरज आहे कारण अन्य कोणी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहचणार नाही म्हणून मदर तेरेसानी त्यांच्या जखमा पुसल्या. त्यांच्या पावन स्पर्शाने महारोगी बरे झाले. तेरेसा ’मदर’ झाल्या. मरणासन्न अवस्थेत पाणी मागणार्‍याला सिंधुताईंनी भाकरी दिली. तो जगला. आपलं जीवन संपवण्याचा विचार करणार्‍या सिंधुताईंना जगण्याचा विचार मिळाला. त्या जगत गेल्या, जगताना तेवत राहील्या. इतरांना जगवत राहिल्या. आता त्यांनी पेटवलेली दीपमाळा तेवत आहे. ती तेवत ठेवण्यास आपल्या अंतःकरणातील या ज्योतीला आता आपणच सांगायला हवं!
– सुधीर शालिनी ब्रह्मे, संगमनेर

sudhir brahme

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

डोक्याला पिस्तुल लावत जीवे मारण्याची धमकी

काँग्रेस नेते सुरेश थोरात यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखलसंगमनेर (प्रतिनिधी)सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकूर टाकून बदनामी करतो म्हणून...

नैसर्गिक संकटाशी दोन हात करत निर्माण केला आदर्श

खांडगावच्या युवा शेतकर्‍याने एकाच बेडवर तीन पिके घेऊन घेतले लाखोंचे उत्पन्नसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातून वाहणार्‍या मुळा, प्रवरा, म्हाळुंगी,...

जोर्वे दुर्घटनेतील बेपत्ता इसमाचा ड्रोनद्वारे शोधला मृतदेह

संगमनेर (प्रतिनिधी)सोमवारी (दि, 15) रात्री जोर्वे शिवारात पुलाचे कठडे तोडून पिकअप प्रवरेत वाहून गेली होती. यात एकजण...

अपघातग्रस्त वाहन बाहेर काढण्यात यश – एक मृतदेह हाती, एक बेपत्ता, शोध मोहिम सुरू

संगमनेर (प्रतिनिधी)सोमवार (15) रात्री तालुक्यातील ओझर येथून पिंपरणे मार्गे निघालेला मालवाहतूक टेम्पो चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने...

डिजीटल जमान्यात कलात्मक छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ

जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त काशिनाथ गोसावी यांची खंतसंगमनेर(प्रतिनिधी)पूर्वीच्या काळी काढलेले ब्लॅक व्हाईट फोटो जपून ठेवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत...