जिल्ह्यातून मोनिका राजळे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता

संगमनेर (प्रतिनिधी) : शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार तब्बल 40 दिवसांनी आज होत आहे. या मंत्रिमंढलात 15-16 जणांची वर्णी लागणार असून यात भाजपाच्या 10 तर शिंदे गटाच्या 6 जणांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
या यादीत भाजपाच्या दिग्गज नेत्यांचा समावेश असून नगर जिल्ह्यातून जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव पहिल्या यादीत नक्की झाले आहे. त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात येणार असून महत्वाच्या जलसंधारण खात्याची जबाबदारी त्यांना देण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. तसेच या मंत्रीमंडळात नगर जिल्ह्यातून पाथर्डीच्या भाजपा आमदार मोनिका राजळे यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. या दोन नेत्यांच्या समावेशामुळे पहिल्याच विस्तारात नगर जिल्ह्याला मोठे स्थान मिळणार आहे.

शिंदे-भाजप सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे गेल्या अनेक दिवसापासून लक्ष लागले होते. शिंदे-फडणवीस हे दोघेच राज्याचा संपूर्ण कारभार पाहत असल्याने त्यांच्यावर टीका होत होती. मंत्रीमंडळ विस्तारासाठी अनेक दिल्ली वाऱ्या केल्यानंतर आज मंगळवारी अखेर पहिल्या मंत्रीमंडळ विस्ताराला मूहुर्त मिळाला. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता राजभवनावर छोटेखानी समारंभात हा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे.

अपेक्षेप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील यांना पहिल्याच विस्तारात मोठी संधी मिळत आहे तर मोनिका राजळे या पहिल्यांदाच मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. या मंत्रीमंडळात भाजपाकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, गणेश नाईक, संभाजी पाटील निलंगेकर, मंगलप्रभात लोढा, सुभाष देशमुख, मदन येरावार या दिग्गजांचा तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, संदीपान भुमरे, शंभुराज देसाई, दिपक केसरकर, तान्हाजी सावंत, बच्चू कडू यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
