गॅस टँकरच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू
सिन्नर (शामसुंदर झळके)
सध्या सुरू असलेल्या दहावीची परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या दोघा विद्यार्थी मित्रांवर काळाने झडप घातली. भरधाव वेगाने आलेल्या गॅस टँकरने या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन विद्यार्थी मित्र जागीच ठार झाले. या बाबतीत समजलेली माहिती अशी, शुभम रामनाथ बरकले आणि दर्शन शांताराम आरोटे दोघेही (वय १४) आगासखिंड (सिन्नर) येथील शताब्दी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होते.
दहावीची परीक्षा देण्यासाठी ते पांढूर्ली परीक्षा केंद्रावर ते आपल्या लाल रंगाच्या एक्टीवा (MH 15..GQ,2405) या दुचाकीने जात असताना डीएड कॉलेजच्या जवळ समोरून येणाऱ्या एचपी गॅस टँकरने ( MH 48 AG 8104) त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोघांना गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल केले व वाहतूक सुरळीत करत घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश परदेशी करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची खबर सुनील पांडुरंग शिंदे, अविनाश विनायक बर्कले, दत्तू उत्तम आरोटे यांनी देऊन पोलिसांना सहकार्य केले.