डिक्कीतून पैसे काढणारे चोर कॅमेऱ्यात कैद
युवावर्ता (प्रतिनिधी)
संगमनेर औद्योगिक वसाहतीमधील साई आशिर्वाद इंडस्ट्रीज या कंपनीमधील कर्मचारी घुलेवाडी येथील युनियन बँकेत पैसे भरण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी या पैशांवर डल्ला मारला. ही घटना काल बुधवारी दुपारी १ ते १.३० च्या दरम्यान घडली. सुमारे दोन लाख १३ हजारांची रोकड लंपास करणारे चोरटे बॅंकेतील असलेल्या सिसिटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे. संगमनेर औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक संदीप फटांगरे व ऋषीकेश मोंढे यांचा साई आशिर्वाद इंडस्ट्रिज नावाचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे नोकरीस असलेले अकौंटंट शरद रमेश गुजराथी हे युनियन बँक घुलेवाडी शाखा येथे कामानिमित्त आले होते.
त्यांच्याकडे मोपेड एम एच 17 बीव्ही 8755 क्रमांकाचे वाहन होते. त्यांनी या गाडीच्या डिकीमध्ये व्यवसायाची 2 लाख 13 हजार किमतीची कॅश रक्कम ठेवलेली होती. शरद गुजराथी बँकेमध्ये स्लीप भरण्यासाठी गेले असता बँकेच्या आवारात असलेल्या त्यांच्या गाडीची डिकी उघडून 2 लाख 13 हजाराची कॅश रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
बँकेतून बाहेर आल्यानंतर कर्मचारी गुजराथी यांना गाडीबरोबर छेडछाड झाल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांना डिकीत रक्कम नसल्याचे आढळून आले. त्यांनी त्वरीत मालक संदीप फटांगरे व ऋषीकेश मोंढे यांना फोन करून कल्पना दिली.
संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये नव्यानेच पदभार घेतलेले पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांना या घटनेची माहिती दिली असता त्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. पो. नि. मथुरे यांनी घटनास्थळी पाहणी केली. युनियन बँकेतील व्यवस्थापक, कर्मचारी तसेच आजूबाजूला असलेल्या व्यावसायिकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. घुलेवाडी येथील युनियन बँक शाखेमध्ये सुरक्षा कर्मचारीच नसल्याचे कळताच त्यांनी मनस्ताप व्यक्त केला. अमृतनगर परिसरातील उद्योजक आणि असंख्य कर्मचाऱ्यांच्या बँक खाती आणि व्यवहार या बँकेत आहेत. शेजारी बँकेचे एटीएम सुध्दा आहे. असे असूनही बँकेला सुरक्षा कर्मचारी नसणे ही गोष्ट धक्कादायक बाब आहे.
पो.नि. मथुरे यांनी तपासाला वेग दिला असून सी.सी.टी.व्ही. फुटेजमधून काही सुगावा लागतोय का याचाही प्रयत्न सुरू आहे. संगमनेर शहर आणि ग्रामिण भागामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पोलिसांसमोर तपास पूर्ण करण्याचे आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान आहे. दोन लाख रक्कम छोटी नसून याचा तपास लवकर लागावा आणि सदर रक्कम पुन्हा मिळावी अशी मागणी उद्योजक संदीप फटांगरे व ऋषीकेश मोंढे यांनी केली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात 379 प्रमाणे गुन्हा दाखल असून स. पो. नि. पवार पुढील तपास करत आहेत.