मला भाजपमध्ये लोटण्याचा प्रयत्न मात्र मी काँग्रेसचाच – आ. थोरात

आ. थोरात

झालेले राजकारण व्यथित करणारे

युवावार्ता (प्रतिनिधी)
माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन मधल्या काळात अत्यंत विचित्र पद्धतीने राजकारण झाले. मला थेट भाजपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न झाला, परंतु आपली विचारधारा काॅंग्रेस ची असून त्यावर आपण ठाम आहोत. झालेल्या पक्षीय राजकारणाने आपण व्यथित झालो असून याबाबत आपल्या भावना पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून पाठविल्या आहेत. पक्ष त्यावर योग्य निर्णय घेईल असे प्रतिपादन काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.


आपल्या वाढदिवसानिमित्त संगमनेरात आयोजित केलेल्या “शिंदेशाही बाणा” या कार्यक्रमात ते मुंबईहून ऑनलाईन सहभागी झाले होते. तब्बल एक महिन्यानंतर त्यांनी संगमनेकरांशी व माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नामोल्लेख न करता सत्ता बदलानंतर सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केले. ते म्हणाले, संगमनेर मधील विकासाची कामे बंद पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. संगमनेर मधील व्यवसायिकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. त्यांच्या व्यवसायात अडचणी निर्माण केल्या जात आहे. विकास कामांना खिळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सगळे चाललेले राजकारण दुर्दैवी आहे. सत्तेमध्ये आपणही राहिलो आहोत, सत्ता बदलानंतर दुर्दैवाने हा अनुभव आपण घेत आहोत. संघर्ष संगमनेर तालुक्याने कायम केलेला आहे. यातूनच आपण मोठे झालो आहोत. नदीचे पाणी किंवा निळवंडे धरणासाठी केलेला संघर्ष आपण पाहिला आहे. प्रत्येक गोष्टीत संघर्षातून आपण यश मिळवले आहे. या संघर्षातून बाहेर येऊन आपण नव्या उमेदीने उभे राहू याची खात्री मला आहे.


मधल्या काळात विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यात खूप राजकारण झाले. सत्यजित खूप चांगल्या मताने विजयी झाला त्याचे अभिनंदन. मात्र या निमित्ताने झालेले राजकारण व्यथीत करणारे आहे. याबाबतच्या माझ्या भावना मी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे, याबाबत बाहेर बोलण्याचे कारण नाही, या मताचा मी आहे. म्हणून याबाबतची माझी मते मी पक्षश्रेष्ठींना कळवली आहेत. आम्ही याबाबत आमच्या पातळीवर योग्य ते निर्णय करू. काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. मधल्या काळामध्ये मला भाजपामध्ये लोटण्याचा प्रयत्न झाला. एवढेच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या तिकिटाचे वाटप सुद्धा करून टाकले. काही लोक अशा पद्धतीने गैरसमज पसरवण्याचे काम करीत आहेत. त्यांनी कितीही चर्चा केल्या तरी काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे, तोच पुढे न्यायचा आहे. याच विचारांनीच पुढील वाटचाल करणार आहोत. याची ग्वाही मी आपणास देतो. मी काय बोलणार आहे, याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती. आजचा हा आनंदाचा दिवस आहे त्यामुळे मी आपणांसमोर माझ्या भावनांना वाट करून दिली असे यावेळी आ. थोरात म्हणाले.


महाराष्ट्रातील लोककलावंत आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांच्या “शिंदेशाही बाणा” या रंगतदार कार्यक्रमाने संगमनेरकरांची मने जिंकली असतानाच गंभीर दुखापतीमुळे एक महिन्यापेक्षा जास्त काळ संगमनेरकरांपासून दूर रहावे लागल्याची खंत थोरातांनी बोलून दाखवताच उपस्थित नागरीकांच्या भावना दाटून आल्या होत्या.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत उमेदवारी वरून थोरात, तांबे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. यामागे पक्षातीलच एक गट सक्रिय आहे. मात्र थोरातांच्या पक्षनिष्ठेवर विरोधकही बोट ठेऊ शकत नाही. पक्षात मोठे योगदान थोरातांनी दिले आहे, त्यामुळे त्यांच्या पत्राची नक्कीच पक्षश्रेष्ठी गंभीरतेने दखल घेतील आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा करेक्ट कार्यक्रम होईल असे पक्षातील निष्ठावंताचे मत आहे.

थोरात भाजपच्या जवळ गेले या आरोपांना उत्तर देताना त्यांनी भाजपच्या व प्रामुख्याने महसूल मंत्री विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत विखे हे सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप पुराव्यासह केला. विखे जाणीवपूर्वक संगमनेरवर अन्याय करत असून येथील विकासाला व शांततेला गालबोट लावत आहेत. थोरातांच्या या भुमिकेमुळे ते कधीही भाजपात जाणार नसल्याचे सिद्ध होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख