शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर १६४ आमदारांचा विश्वास ; शिवसेनेच्या आणखी एका आमदाराचा पाठींबा

एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. तर ठरावाच्या विरोधात ९९ मतं पडली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली. रविवारी भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर सभापती झाल्यामुळे शिंदे सरकारने पहिला अडथळा दूर केला आहे. गेले १० दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्याचवेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत.

शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळी बांगर यांनी शिवसेनेचे राजन साळवी यांच्या बाजूनं मतदान केले होते. आज त्यांनी गट बदलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी भावनिक भाषण केले होते, ठाकरेंसाठी ढसाढसा रडले होते.
आज तेच बांगर बंडखोर आमदारांसह बसमधून विधिमंडळाकडे रवाना झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या बंडखोर आमदारांची संख्या ४० वर जाऊन पोहोचली आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपच्या रेट्यापुढे कसेबसे १६ आमदार थोपवून धरलेल्या शिवसेनेला सोमवारी सकाळी आणखी एक धक्का बसला आहे.

दरम्यान, रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली होती. बहुमत सिद्ध करण्याच्या रणनीतीबाबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत शिंदे गट आणि भाजपाचे आमदार उपस्थित होते. आपल्याला ४० बंडखोर शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा शिंदेंचा दावा आहे. तर १६६ मतांनी सरकार बहुमत सिद्ध करेल, असा दावा फडणवीस यांनी केला होता.

बहुमत प्रस्तावावर मतदान झाले तेव्हा सभागृहाच्या प्रथेप्रमाणे सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार उशीरा आल्याने त्यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला. यापैकी काही आमदारांना दरवाजे बंद असल्याने सभागृहाबाहेर ताटकळत उभे राहावे लागले. यामध्ये अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, संग्राम जगताप, अण्णा बनसोडे, निलेश लंके, शिरीष चौधरी, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी यांचा समावेश होता. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव हेदेखील अगदी शेवटच्या क्षणी धावतधावत सभागृहात दाखल झाले. अनेक आमदार बहुमत प्रस्तावावरील मतदानाला गैरहजर असल्याने सभागृहातील महाविकास आघाडीच्या मतांची संख्याही कमी झाली. काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने १०७ मते होती. मात्र, आज बहुमत प्रस्तावाविरोधात मतदान करणाऱ्या महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या ९९ इतकीच होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख