आंदोलकांचा सरकारला इशारा
पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची काढली समजूत
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – मराठा आंदोलनाला राज्यात हिंसक वळण लागले असतांना संगमनेरात मात्र शांततेत आंदोलन सुरू होते. बसस्थानकासमोर समाजाच्यावतीने मागील आठ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू असतांना काल मंगळवारी मात्र पुणे-नाशिक महामार्गाच्या खाली अकोले बायपास रोडवर रस्त्यात टायर झाळून व रास्तारोको करून आंदोलकांनी मराठा आरक्षणाची मागणी केली. यामुळे बराचवेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
संगमनेरात सकल मराठा समाजाच्यावतीने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे. आरक्षण या विषयावर समाजाकडून आता पर्यंत शांंंततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते. मात्र दोन दिवसांपूर्वी पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या आंदोलकांची भेट घेण्यासाठी आले असता ‘विखे पाटील वापस जाओ’ अशा घोषणा देत आंदोलन तीव्र केले होते.
दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ, रास्तारोको होत असतांना संगमनेरात मात्र शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला काल काहीसे हिंसक वळण लागले. अकोले रोड येथे रस्त्यावर टायर पेटवून आंदोलकांनी रस्ताबंद आंदोलन करत सरकारला इशारा दिला. यावेळी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची समजूत काढली. त्यानंतर हे आंदोलक साखळी उपोषण या ठिकाणी येऊन आंदोलनात सहभागी झाले.