Tuesday, January 18, 2022

एसटी कर्मचाऱ्यांनो, गिरणी कामगार होऊ नका! तुटे पर्यंत ताणू नका, कर्मचार्‍यांना नागरीकांचे आवाहन

संगमनेर (संजय आहिरे)
केवळ कामगार क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण मुंबई व महाराष्ट्रावर अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे 1982 साली डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली झालेला गिरणी कामगारांचा संप होय. सुरवातीला म्हणजे 1974 कामगार नेते भाई डांगे यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनांनी 42 दिवस आंदोलन करू चार रूपयांची पगारवाढ पदरात पाडून घेतली होती. भाई डांगे यांचे एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे कामगारांची ताकद ढासळली किंवा संपली की ते संप मागे घेत होते. परंतु कामगार नेते दत्ता सामंत यांनी 1982 साली गिरणी कामगारांचे नेतृत्व केले मात्र त्यांचे त्यावेळच्या परिस्थितीचे अकलन कमी पडले की काय त्यांना संप किती ताणावा हे नेमके समजले नाही आणि संपूर्ण गिरणी कामगार व गिरणी व्यवसाय उध्वस्त झाला.

हे सर्व मांडण्याचा खटाटोप म्हणजे सध्या सुरू असलेला एसटी कामगारांचा संप. सुरवातीला विरोधी पक्षांनी या संपाचे नेतृत्व केले मात्र जेव्हा जनमत संपकर्‍यांच्या विरोधात जाऊ लागले तसे त्यांनी यातून अंग काढून घेतले. त्यानंतर प्रसिद्धीची हवा डोक्यात गेलेल्या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या लढ्याचे नेतृत्व करायला सुरवात केली. सरकारने चाळीस टक्के पगारवाढ देऊनही एसटी कर्मचारी समाधानी नाही. त्यामुळे गिरणी मालकांप्रमाणेच सरकारने दुसरा पर्याय अवलंबविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांनो वेळीच सावध व्हा, अन्यथा तुमचाही गिरणी कामगार होण्याची दाट शक्यता आहे.


1980 च्या आधी गिरणी कामगारांच्या संघटना जोमात काम करत होत्या. कामगार नेते भाई डांगे हे खुल्या विचाराचे आणि मोकळ्या मनाचे होते. कामगारांच्या हितासाठी लढत होते, प्रसंगी ते कामगार काँग्रेस नेते गं. दी. आंबेकर यांचीही मदत घेऊन कामगारांचे प्रश्‍न सोडवित होते. त्यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी अनेक वेळा संप व आंदोलन केले. परंतु कुठे ताणायचे व कुठे थांबायचे याची जाणीव त्यांना होती. त्यांनी लढा देऊन चार रूपयांची पगारवाढ काही कामगारांना मान्य नव्हती. दरम्यान 1981 मध्ये डॉ. दत्ता सामंत या लढावू कामगार नेत्याने इंजिनीरिंग व इतर उद्योगातील शेकडो कामगारांना शेकडो रूपयांची पगारवाढ मिळवून दिली होती. त्यामुळे गिरणी कामगारांनी डांगे यांचे नेतृत्व झुगारून सामंत यांचे नेतृत्व स्विकारण्याचा निर्णय घेतला. सँडर्ड मिलचे कामगार मोर्चा काढून दत्ता सामंत यांच्याकडे गेले आणि नेतृत्व करण्याची गळ घातली. सामंत यांनी मला या उद्योगातील काहीही माहिती नाही असे म्हणून नकार दिला परंतु कामगारांनी हट्ट धरला आणि शेवटी दत्ता सामंत तयार झाले. ( ज्यांना ज्या क्षेत्रातील कळत नाही त्यांनी त्यात डोके घालू नये हे इथे महत्त्वाचे) सामंत यांनी महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनची स्थापना केली. चर्चेचे गुर्‍हाळ झाले, पण मार्ग निघेना. कामगारांच्या दडपणामुळे शेवटी 18 जानेवारी 1982 पासून गिरणी कामगारांचा संप सुरू झाला. आणि हा संप अजूनही सुरूच आहे कारण आजही तो अधिकृतपणे मागे घेतला नाही.


गिरणी कामगारांचे दुर्दैव असे की, त्यांनी मुळातच संप करण्यातच मोठी चुक केली. आपण संप ज्या पद्धतीने ताणत आहोत त्यातून गिरणी मालक व सरकारचाच फायदा होत आहे हे ना दत्ता सामंत यांना समजले ना कामगारांना. यंत्रमागाचे वाढते प्रमाण, गिरण्यांची आर्थिक स्थिती, कामगारांची गरज याची कुठलीही माहिती न ठेवता फक्त पगारवाढ आणि सवलती यावरच हे कामगार आडून बसले. तरीही तत्कालीन सरकारने मध्यस्थी करून वीस रूपयांची पगारवाढ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु कामगारांनी त्यालाही विरोध केला. आम्हाला रूपयात नको तर शेकड्यांनी पगारवाढ पाहिजे. या हट्टाला कामगार पेटले आणि तिथेच घात झाला. या संपात एक, दोन नव्हे तर तब्बल अडीच लाख कामगारांचे संसार उध्वस्त झाले. अनेक कामगार देशोधडीला लागले, अनेकांनी आत्महत्या केल्या, मुंबई सोडून गावावर बेकारीचे जीवन जगले, संसाराचे मातेरे झाले. तिकडे दत्ता सामंत यांची हत्या झाली आणि गिरणी कामगारांच्या काळाकुट्ट इतिहासाची केवळ नोंद शिल्लक राहिली.


दरम्यान पगारातील अनियमितता सोडवणे आणि योग्य पगार मिळावे यासाठी तसेच एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांनी ‘करो या मरो’ ही भूमिका घेत चार नोव्हेंबर पासून अनिश्‍चित काळासाठी संपाची हाक दिली आहे. या संपात एकाच वेळी सर्व कर्मचारी सहभागी झालेले नाहीत. टप्याटप्याने आगारातील कर्मचार्‍यांनी काम बंद केले. एसटी महामंडळात एकूण 92,266 कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी कायमस्वरूपी कर्मचार्‍यांची संख्या 89,682 इतकी आहे. 2584 कर्मचारी रोजंदारीवर आहेत. राज्यातील विविध आगारामध्ये अंदाजे अडीच हजार कर्मचारी प्रशिक्षणार्थी आहे. अशा या एसटी कर्मचार्‍यांच्या अनेक संघटना आहे. मात्र त्यात एकही प्रभावी नेता नाही तसेच त्यांच्यात एकवाक्यता पण नाही.

या संघटननी ऐन दिवाळीत सरकारसह प्रवाशांना वेठीस धरत आंदोलन सुरू केले. हे आंदोलन म्हणजे सरकारला अडचणीत आणण्यासाठी आयते कोलीत म्हणून विरोधी भाजपने (मुळ भाजपचे नसलेले हे विशेष) सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांना पुढे करून एसटीचे आंदोलन पेटवले. त्यामुळे नेतृत्वहीन कर्मचार्‍यांना आयतेच स्फुरण आले. सरकारने सुध्दा सकारात्मक पावले उचलत प्रवाशांचे व कर्मचार्‍यांचे हित लक्षात घेता 28 बैठका घेऊन कर्मचार्‍यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या. शेवटी आतापर्यंत सर्वात मोठी पगारवाढ जाहिर केल्यानंतर विरोधकांनी माघार घेत मैदान सोडले. दरम्यान चांगली पगारवाढ व नियमित वेतन या निर्णयानंतर काही कर्मचारी संघटनांनी या संपातून माघार घेतली परंतु इतर संघटनांनी विलिनीकरणाचा प्रश्‍न लावून धरत त्याना काम करू देण्यात मज्जाव केला. दरम्यान हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला व विलिनीकरणाच्या प्रश्‍नावर समिती नेमली. सरकारनेही या समितीचा निर्णय मान्य राहिल असे आश्‍वासन दिले. परंतु संपकर्‍यांचे समाधान झाले नाही.


भाजप नेत्यांनी पळ काढल्यानंतर मराठा आरक्षण घालविल्याने प्रसिद्धी झोतात आलेले ड. गुणरत्न सदावर्ते यांनी हा संप हातात घेतला. आणि तेथूनच या संपाला घरघर लागली. सरकार विलिनीकरणाचा निर्णय घेत नाही, संपही मिटत नाही, पगारही मिळत नाही. त्यामुळे अनेक कर्मचार्‍यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. आत्महत्या हा एसटी संपावरचा तोडगा नाही. कामगारांना दोन महिन्यांचा पगार मिळाला नाही तर त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होईल याचीही सरकारला कल्पना आहे, म्हणूनच सरकार वारंवार विनंती करत आहे कामावर परत या. पण काही कामगार दुसर्‍या कामगारांना कामावर येऊ देत नाहीत. त्यामुळं कर्मचारी आणि एसटी दोघांचंही नुकसान होतं आहे. एसटी कामगारांचं आंदोलन भरकटत चाललं आहे. ‘पगारवाढ, महागाई भत्ता,घरभाडे वाढ दिलेली आहे. विविध संघटनांशी आम्ही वारंवार चर्चा केली आहे. मात्र, जो विषय न्यायालयात आहे, त्यावर निर्णय घ्यायचा आम्हाला अधिकार नाही. त्या समितीचा निर्णय जेव्हा येईल, तेव्हाच विलिनीकरणावर अंतिम निर्णय होईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.


ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दत्ता सामंत यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईत झालेला गिरणी कामगारांचा संप बघितला आहे. हा गिरणी संप संपल्याचे आजवर कोणीही जाहीर केलेले नाही. त्यामुळे गिरण्यांमधील कामगार देशोधडीला लागले. एवढा अट्टाहास करता कामा नये. एसटी कामगारांना समजावण्याचा आणि राज्यकर्ते चुकत असतील त्या त्रुटींवर बोट ठेवण्याचा हक्कही शरद पवार यांना आहे. परंतु विरोधक त्यांच्या पुढाकाराकडे सकारात्मक नजरेने पाहण्याऐवजी आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ व अनुभवी नेत्याने समजावून सांगून व काही कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतल्याची घोषणा करूनही अपवाद वगळता हजारो कर्मचारी कामावर हजर होत नाही. हा येवढा अट्टाहास का असा प्रश्‍न आता सर्वसामान्य जनता विचारू लागली आहे.

सुरवातीला सर्वसामान्य जनता एसटी कर्मचार्‍यांच्या पाठीशी होती. त्यांना चांगला पगार व सवलती मिळाल्या पाहिजे त्यासाठी सरकारने विचार करावा अशी मागणी होती. सरकारनेही ही मागणी मान्य केली परंतु तरीही कर्मचारी अडून बसले. त्यामुळे प्रवाशांनीही आपआपल्या पध्दतीने पर्याय शोधले. प्रसंगी जास्त आर्थिक झळ सोसली पण प्रवास केलाच. जसे गिरणी मालकांनी कामगारांची वाट न पाहता बाहेरून कापड तयार करून आपल्या ब्रँडखाली विकलेच. नंतर गिरण्यांच्या जागाही करोडोच्या भावात विकल्या. संपकरी विलिनीकरणाच्या हट्टाला पेटल्याने सरकारनेही आता कठोर पावले उचलायला सुरूवात केली आहे. पहिले कारवाईची धमकी दिली, नंतर नोटीसा पाठविल्या व आता तर थेट बडतर्फ आणि निलंबन सुरू केले आहे. त्यानंतर लगेचच भरती प्रक्रिया सुध्दा सुरू केली आहे. कर्मचारी तरीही नाही ऐकले तर एसटीचा प्रवास शेवटी खाजगीकरणाकडे जाणार हे निश्‍चित.

ग्रामीण भागाशी नाळ जुळलेल्या एसटी कर्मचारी बंधू भगिनींनो अवघा महाराष्ट्र तुमच्यावर व एसटीवर प्रेम करतो. तुमच्या पगारवाढीच्या मागणीलाही सर्वांचा पाठींबा आहे. पण केवळ विलीनीकरण या एका गोष्टीसाठी तुम्ही जे ताणून धरले आहे त्याचा आपण फेरविचार केला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता, ज्यांच्या बळावर एसटीचे चक्र फिरते त्यांचाही तुम्ही विचार केला पाहिजे. तुमची ताकद आता सरकारच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे तुमची यापुढील पगारवाढ, सुविधा याकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही सरकारला परवडणारे नाही. यासाठी अवघा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे. आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलंय, तुटेपर्यंत ताणू नये… ही गोष्ट चिरकाल सत्य आहे. तुमच्याबद्दल आजही महाराष्ट्राला सहानुभूती आहे ही सहानुभूती तुम्ही गमावू नये हीच अपेक्षा.

बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते – घुले

गेल्या दोन महिन्यापासून बसचा संप सुरू आहे. बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कित्येक विद्यार्थी दोन दोन महिने महाविद्यालयात गेलीच नाही. अगोदरच कोरोनाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे. जे कधीही भरून निघणार नाही व बस बंद असल्याने त्यात अजून भर पडली आहे. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात संभ्रमात आहे. सरकारने व बस कर्मचारी या दोघांनाही आता या गोष्टीचा गंभीर विचार करायला हवा व तोडगा काढायला हवा. कर्मचार्‍यांची लढाई रास्त जरी असली तरी ती किती ताणवायची याचा विचार करायला हवा. सरकारनेही त्याकडे गांभीर्याने पहावे.
अनिकेत घुले
राज्य संघटक, छात्रभारती

जोपर्यंत पुर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार नाहीकानकाटे

सरकार बरोबरच एस.टी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर एस.टी कर्मचार्‍यांवर अन्याय झालेला आहे. 22 संघटनांपैकी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली संघटनेने कर्मचार्‍यांना कधीही न्याय मिळवून दिला नाही. अनेक अश्‍वासन देऊनही त्यांची पुर्तता केली नाही. कधीही मनसोक्त पगारवाढ मिळालेली नाही. आजची पगारवाढही फसवी आहे. आज जर कर्मचार्‍यांनी माघार घेतली तर पुढे कर्मचार्‍यांना भविष्य राहणार नाही. त्यामुळे जोपर्यंत पुर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार नाही. विलीनीकरणातून सर्व सामान्य जनतेचाही फायदा होणार आहे.
नंदू कानकाटे
एस. टी. वाहक, संगमनेर आगार

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कामावर हजर होण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे भले आहे – संगमनेर आगार प्रमुख निलेश करंजकर

संगमनेर (प्रतिनिधी)मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपाचा...

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच : निवृत्तीमहाराज इंदोरीकर ; तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप

‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांना कीर्तनातून...

बॅडमिंटन : ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला नागपूरकर मालविकाने केले पराभूत ; सायना नेहवालला पराभूत करणारी ठरली दुसरी भारतीय महिला

इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर (YonexSunriseIndiaOpen2022) फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (Saina...

एसटी कर्मचाऱ्यांनो, गिरणी कामगार होऊ नका! तुटे पर्यंत ताणू नका, कर्मचार्‍यांना नागरीकांचे आवाहन

संगमनेर (संजय आहिरे)केवळ कामगार क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण मुंबई व महाराष्ट्रावर अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे...
web counter