महिला , विद्यार्थी, नागरीकांचा जनआक्राेश
एक महिन्यात दुरूस्तीचे पालिकेचे आश्वासन
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरतील गंगामाई घाट व साई नगर, शाळा तसेच अनेक महत्वाच्या मंदिरांचा जोडणारा पुल पडल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळकरी मुले, छोटे मोठे व्यवसायिक यांची गेली काही महिनेपासून चांगली गैरसोय होत आहे. या पुलाच्या दुरूस्तीसाठी अनेक निवेदने, मंत्री, पुढारी, अधिकारी यांच्या भेटी व निवेदन देऊनही कुठलिही कार्यवाही होत नसल्याने अखेर आज संतप्त नागरिकांनी आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारत सदर पुल दुरूस्तीची मागणी केली.
शहरातील म्हाळुंगी नदीवरील श्री स्वामी समर्थ मंदिरापासून ते संतोषी माता मंदिरापर्यंत असलेला पूल खचून सहा महिने झाले. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सदर पूल धोकादायक झाल्याने त्यावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. म्हाळुंगी नदीच्या पलीकडे साईनगर, संतोषी माता मंदिर, गंगामाई घाट, पंपिंग स्टेशन, घोडेकर आणि म्हाळस मळा परिसर आहे. तसेच साई मंदिराशेजारी देवेंद्र अमृतलाल ओहरा कनिष्ठ महाविद्यालय आहे. या विद्यालयातील विद्यार्थ्यांना पर्यायी मार्गाने किंवा या पुलावरून धोकादायकपणे प्रवास करावा लागतो. त्यामुळे पुलाच्या पलीकडे राहणार्या नागरिकांना अकोले नाक्याकडून जावे लागत असल्याने मोठे अंतर वाढले आहे. तसेच शेजारीच असणार्या छोट्या पुलावरून मोठी वाहणे जाऊ शकत नाही, तसेच दुचाकीला देखील चांगला रस्ता नाही. तसेच ज्येष्ठ नागरिक, येथील रहिवासी यानांही पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागतो आहे. म्हाळुंगी नदीवरील खचलेला पूल नवीन बांधा किंवा तातडीने तात्पुरती दुरुस्ती करून तो वाहतुकीसाठी खुला करावा. अशी मागणी वारंवार करण्यात आली होती. त्याची दखल न घेतल्या अखेर आज येथील माजी नगरसेविका अल्पना तांबे यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणफुले, माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे यांच्यासह परिसरातील नागरीक, विद्यार्थ्यांनी आंदोलन करत तातडीने पुल दुरूस्तीची मागणी केली.