आता प्रतिक्षा केवळ मताधिक्याची
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तांत्रिक अडचणीमुळे अपक्ष उमेदवारी करावी लागली तरी पहिल्या दिवसापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विविध राजकीय पक्ष, संघटना यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे सत्यजित तांबे यांचा विजय सुकर नाही तर निश्चित झाला आहे. मतदान पार पडले असून आता निकालाची नाही तर फक्त मताधिक्य किती मिळणार याकडेच सत्यजित तांबे यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे. परंतु त्यासाठी गुरूवार 2 फेब्रुवारीची वाट पहावी लागणार आहे.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी हा नाशिक पदवीधर मतदार संघ केवळ जिंकला नाही तर तो बांधून ठेवला आहे.0:37 िा, सलग तीन टर्म त्यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी शिक्षकांच्या अनेक प्रश्नांना विधानपरिषदेत वाचा फोडली. पदवीधर असणारे डॉक्टर, इंजीनियर, शिक्षक, विविध शासकीय कर्मचारी व बेरोजगार यांच्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेत अनेक निर्णय घेण्यास शासनाला भाग पाडले. एक लोकप्रिय आमदार म्हणून त्यांची ओळख राहिली. परंतु काही अडचणीमुळे त्यांनी यावेळी थांबून घेत काँग्रेस पक्षाचे युवा नेते, अभ्यासू व्यक्तीमत्व असणारे सत्यजित तांबे या मतदारसंघात उमेदवारी करून देत पाठबळ दिले.
काँग्रेस कारवाई केली तरी वडीलांचे काम, त्यांचा जनसंपर्क याबरोबरच स्वतः ची असणारी वेगळी ओळख, सर्व पक्षीय संबंध, जीवलग कार्यकर्ते व मतदारांचा विश्वास या बळावर सत्यजित तांबे यांनी सुरवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली. पक्ष दूर गेला मात्र कार्यकर्ते सोबत होते, हळूहळू एक एक संघटनांचा पाठिंबा मिळत गेला, सर्वात प्रभावी टिडीएफ या शिक्षक संघटनेने पाठिंबा दिला, कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीने साथ दिली व विविध पक्षांसह भारतीय जनता पक्षाने देखील शेवटी पाठिंबा दिल्याने निकालाआधीच सत्यजित तांबे यांचा विजय नक्की झाला. सर्वाधिक मतदार असलेल्या नगर जिल्ह्यात विखेंची यंत्रणा सत्यजित तांबे यांच्यासाठी सक्रिय झाल्याने राज्यात वेगळी चर्चा झाली असली तरी सत्यजित तांबे यांनी संयमी प्रतिक्रिया देत त्यांचे आभार मानले. प्रचंड गोंधाळानंतर सत्यजीत तांबे संयमी प्रचार करत सर्वांचा पाठिंबा मिळविला आहे. परंतू आता केवळ मताधिक्याचीच चर्चा होत आहे.
जर सत्यजित तांबे भाजपमध्ये आले तर स्वागत आहे. आमची त्यांना भाजपात घेण्याची तयारी आहे. सत्यजित तांबे यांनी निर्णय घ्यावा, ते आले तर आम्ही कधीही तयार आहोत. पक्षात अनेक लोक आले आहेत. सत्यजित तांबे आले किंवा इतर कुणी आले. पक्षात यायला अडचण नाही. जर सत्यजित तांबे आले तर आम्ही स्वागत करु, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी तांबेंना खुली ऑफर दिली आहे.