
संगमनेर (प्रतिनिधी) –
गेली ४ वर्षांपासून व्यवसाय वृद्धीसाठी उद्योजकांना प्रोत्साहन देत असलेल्या संगमनेर येथील सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त नगर व नाशिक जिल्ह्यातून १०० हून अधिक व्यावसायिक उद्योजकांसाठी बिझनेस नेटवर्किंग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार दि. १० मे रोजी शहरातील हॉटेल मयुर एक्सप्रेस येथे सायं. ६.३० वाजता पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक-अहमदनगर रिजन हेड अमोल कासार, नाशिक प्रसिद्ध उद्योजक मारुती कुलकर्णी, सिन्नर चॅप्टरचे चेअरमन जयदेव काळे, संगमनेरच चॅप्टरचे अध्यक्ष कर सल्लागार सागर हासे आदि मान्यवर उपस्थित होते.

या व्यावसायिक मिटींगमध्ये विविध क्षेत्रातील ७२ उद्योजक सामील झाले होते. नाशिक, सिन्नर, संगमनेर व अकोले तालुक्यातील प्रतिथयश व्यावसायिकांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले होते. या बिझनेस नेटवर्किंग दिनानिमित्ताने आलेल्या सर्व व्यावसायिकांना एकमेकांचे उद्योग समजावून घेऊन त्याद्वारे व्यवसायवृद्धी कशी करता येईल याचे मार्गदर्शन लाभले.यावेळी १२ नवीन उद्योजकांनी संघटनेचे सभासदत्व स्विकारले. यावेळी ५४ देशांमध्ये आपला व्यवसाय करीत असलेल्या उद्योजक मारुती कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत अतुल कोतकर यांनी घेतली. उद्योजकांमध्ये कुठले गुण असावेत, उद्योग मोठा करणे म्हणजे नेमके काय, उद्योग करतांना येत असलेल्या अडचणी व त्यावर कशी मात करावी, आर्थिक नियोजन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले.

संगमनेर चॅप्टरचे सदस्य महेश ढोले यांच्या क्रिस्पिको टेस्टी भेळ या उत्पादनाचे अनावरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुरकुरीत भेळ आणि आकर्षक पॅकेजिंग यामुळे हे प्रॉडक्ट संपूर्ण जगात आपले नाव गाजवेल असे गौरवोद्गार अमोलजी कासार यांनी यावेळी काढले.
संपूर्ण महाराष्ट्रात ७५ ठिकाणी ही संघटना कार्यरत आहे तसेच संघटनेचे २७०० हून अधिक सदस्य आहेत. संघटनेतील सदस्यांमध्ये आजपर्यंत एक हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या व्यवसायाची देवाणघेवाण झालेली आहे. महाराष्ट्रातील ७५ शहरांमध्ये थेट आपला व्यवसाय करण्याची संधी संघटनेतर्फे उपलब्ध करुन दिली जात आहे. या संघटनेद्वारे अनेक व्यावसायिकांनी एकत्र येऊन व्यवसाय सुरु केले आहेत. तरी अधिकाधिक उद्योजकांनी संघटनेमध्ये सहभागी होऊन आपली व्यवसायवृद्धी करावी असे आवाहन संघटनेचे सचिव डॉ. सागर गोपाळे, खजिनदार मयूर पवार यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संगमनेर चॅप्टरच्या सर्व सभासदांनी प्रयत्न केले.
