संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील समनापूरच्या प्राचीनकालीन असणार्या अहिल्याबाई होळकर यांच्या बारवेवर बांधकाम करणार्यांनी बांधकाम विभागाची व पुरातत्त्व खात्याची कुठलीच परवानगी घेतली नसल्याने प्रांताधिकार्यांच्या आदेशाने सोमवार दि 16 मे 2022 रोजी येथील अतिक्रमण पाडण्यात आले होते. दरम्यान अजूनही या बारवेलगत इतर अतिक्रमण असल्याने हे अतिक्रण तत्काळ पाडण्याचे आदेश सहाय्यक संचालक पुरातत्त्व विभाग नाशिक यांनी उपविभागीय अधिकार्यांना दिले आहे.
संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे प्राचीनकालीन अहिल्याबाई होळकर यांची बारव आहे. या बारवेवर कुठलीच परवानगी न घेता गावातील राजू रोकडे यांनी अनाधिकृत बांधकाम केले होते. त्यामुळे अहिल्याबाई होळकर विचार मंचचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले होते. त्यांनी ग्रामविकास अधिकार्यांना घेराव घालून रोकडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. जर कारवाई झाली नाही तर रस्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान ऐतिहासिक बारवेवर अनाधिकृत होत असलेल्या बांधकामामुळे प्राचीन बारवेच्या सौंदर्यास धोका निर्माण झाला असून ती बारव नष्ट होण्याच्या मार्गावर आली असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य पुरात्व विभागाच्या नाशिक येथील कार्यालयाकडे ई-मेल द्वारे केली होती.
महाराष्ट्र प्राचीन स्मारके पुराण वास्तुशास्त्र अवशेष अधिनियम 1960 अन्वये आशा ऐतिहासिक वास्तुच्या परिसरात अगर स्मारकात कुठलेही नविन बांधकाम करावयाचे असल्यास पुरात्व विभागाची परवानगी घेणे बंधनकार आहे. त्यांच्या परवानगी शिवाय कोणतेही बांधकाम करता येणार नाही असे स्पष्ट निर्देश असतानासुद्धा कुठलीही बांधकाम परवानगी न घेता अनाधिकृत बांधकाम केले असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सदरचे बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे अन्यथा अनाधिकृत बांधकाम करणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालिका आरती आळे यांनी लेखी पत्राद्वारे कळविले होते. त्यानुसार प्रांताधिकारी मंगरूळे यांनी समनापूर येथील स. नं. 1/2 मधील पुरातन दगडी बारव लगतचे झालेले बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने जमिनदोस्त केले होते.
दरम्यान दि. 16 जून 2022 रोजी पुरातत्व विभागाने या जागेची पुन्हा पहाणी केली. त्यात असे निदर्शनास आले की, या बारवेला पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायर्या होत्या त्या विटा आणि सिमेंटचा वापर करून बुजविण्यात आल्या आहे. सदर बारवेचे बांधकाम हे स्थापत्यशैली दृष्ट्या साधरणत: 17 व्या व 18 व्या शतकातील आहे. त्यामुळे सदर बारवेचे ऐतिहासीक महत्त्व नाकारता येत नाही सदर बारव ही राज्य संरक्षित स्मारक नसले तरी सदर बारवेचे बांधकाम व काळ लक्षात घेता या बारवेचे ऐतिहासीक महत्त्व मोठे आहे. प्रशासनाने येथील बांधकाम पाडले असले तरी अजूनही बारवेच्या दोन्ही बाजूचे बांधकाम हे बारवेवरच असल्यामुळे ते काढण्यात आलेले नाही असे अढळून आले आहे. सदर बांधकाम काढून टाकून बारवेला चारही बाजूंनी ठरावीक अंतर सोडून बारवेचे सौंदर्य टिकवणे गरजेचे आहे. असे पुरातत्त्व विभागाचे म्हणने आहे. त्यामुळे या ऐतिहासीक बारवेवर झालेले अनाधिकृत बांधकाम काढून टाकून ही बारव मोकळी करण्याचे आदेश आरती काळे सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग नाशिक यांनी दिले आहे.