डॉ. सुधीर तांबेच भरणार उमेदवारी अर्ज
भाजपाला मिळेना उमेदवार
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांच्याबाबत केलेले भाष्य आणि नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप आणि काँग्रेस कडून होणारा विलंब यामुळे संगमनेरात राजकीय भुकंप होतो की काय? अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु आज काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे हेच आपले अधिकृत उमेदवार असून उद्या गुरूवारी शेवटच्या दिवशी सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे गेले काही दिवस ज्या राजकीय वावड्या उठविल्या जात होत्या त्यांना आता पूर्णविराम मिळणार आहे. आणि सत्यजित तांबे हे काँग्रेस उमेदवार व आपले वडील डॉ. सुधीर तांबे यांचाच प्रचार करणार आहे असे सत्यजित तांबे व डॉ. सुधीर तांबे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.
युवा नेते सत्यजित तांबे हे एक अभ्यासू नेते आहेत. त्यांनी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. तसेच सर्व राजकीय पक्षात त्यांना मानणारा वर्ग आहे. त्यातच एका जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कामाची व नेतृत्वगुणाचे कौतुक करत अप्रत्यक्षपणे भाजपात येण्याचे निमंत्रण दिले होते. तसेच सभागृहात आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना देखील त्यांनी सत्यजितला आता विधीमंडळात संधी देण्याची वेळ आली असल्याचे सांगत आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या आ. डॉ. तांबे यांच्या उमेदवारीवर काँग्रेसने लवकर शिक्कामोर्तब केले नाही, तसेच भाजपाने देखील आपले पत्ते उघडे केले नसल्याने संगमनेरसह जिल्ह्यात आणि काँग्रेस पक्षात देखील संभ्रमावस्था निर्माण झाली होती.
भाजप कडून ऐनवेळी सत्यजित तांबेंचे नाव पुढे करण्याची शक्यता व मुलासाठी वडीलांची माघार अशा शक्यतेने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. कारण गेल्या काही दिवसांपासून बदलेले राजकीय समीकरणे, सत्तासंघर्ष व राजकीय परिस्थिती यामुळे ऐनवेळी काय होईल याचा कुणालाही अंदाज लागत नाही. सोशल माध्यमांवर याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. भाजपकडून सत्यजितसाठी गळ घातला जात असताना पक्षातून मात्र काहिसा विरोधही होत होता. दुसरीकडे डॉ. तांबे यांनी हा संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत निवडणूक पुर्व तयारी पुर्ण केली आहे. तर दुसरीकडे भाजपला या मतदार संघात प्रभावी उमेदवार नसल्याने त्यांची मोठी अडचण होते. त्यामुळे आयता उमेदवार मिळत असेल तर भाजप संधी सोडणार नाही अशी त्यांची ओळख आहे. मात्र थोरात-तांबे या राजकिय घराण्यांना विचाराचा वारसा असल्याने ते असा घातकी निर्णय घेतील अशी शक्यता कमी होती.
आता सत्यजित तांबेंनी नकार दिल्याने उमेदवारी बाबत तळ्यात-मळ्यात असणारा भाजप कुणाला उमेदवारी देतो याकडे संपूर्ण नाशिक पदवीधर मतदार संघाचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकिय गुगलीने गेल्या काही दिवसांपासून सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाबाबत शक्यता वर्तवली जात होती. सत्यजित हेच भाजपचे पुढचे उमेदवार असतील अशी शक्यता अनेक पातळीवर उपस्थित केली जात असताना सत्यजित किंवा आ. डॉ. तांबे यांनी याबाबत कधिही सविस्तर खुलासा केला नाही. राजकारणात काहिहि होऊ शकते या सत्यजित तांबेंच्या विधानाने या संभ्रमात आणखी भर पडली होती. मात्र आता तुर्तास तरी डॉ. सुधीर तांबे हेच पदवीधरचे उमेदवार असल्याने सध्यातरी या राजकिय चर्चांना पुर्ण विराम मिळणार आहे.