Saturday, July 10, 2021

अभिमानास्पद : छत्रपती शिवाजी महाराजांची परदेशातील १७ व्या शतकातील तीन लघुचित्रे प्रकाशात

पुणे :परदेशातील संग्रहालयांमध्ये जपून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन तीन चित्रांचा शोध लागला आहे. जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिकेतील संग्रहालयांमध्ये सुरक्षित असलेली ही चित्रे शिवछत्रपतींची चित्रे पुण्यातील इतिहास संशोधक प्रसाद तारे यांनी प्रकाशात आणली आहेत. दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीतील ही चित्रे १७ व्या शतकातील असून ती लघुचित्रे (मिनीएचर पेंटिंग) स्वरूपात आहेत. भारतामध्ये आलेल्या तत्कालीन युरोपीयन व्यापाऱ्यांमार्फत प्रथम ही लघुचित्रे युरोपमध्ये हस्तांतरित झाली. जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिका येथे ही चित्रे सुरक्षितपणे जतन करण्यात आली आहेत.

शिवकाळात भारतामध्ये अनेक प्रादेशिक चित्रशैली अस्तित्वात होत्या. त्यापैकी कुतूबशाहीची राजधानी असलेल्या गोवळकोंडा येथील चित्रशैलीला दख्खनी गोवळकोंडा चित्रशैली संबोधिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण भारताच्या मोहिमेवर गेले असताना ही चित्रे काढली गेली आहेत. किंवा त्यावेळी चितारल्या गेलेल्या त्यांच्या अन्य चित्रांच्या आधाराने ही चित्रे काढली गेली असावीत. ही तीनही चित्रे जलरंगातील असून सोन्याने रंगविली आहेत. या चित्रांचे चित्रकार अज्ञात आहेत, अशी माहिती प्रसाद तारे यांनी सोमवारी दिली. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे या वेळी उपस्थित होते.

जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तुसंग्रहालयामध्ये असलेल्या चित्रामध्ये केशरी म्यानात सरळ पात्याची तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये दाखविण्यात आली आहे. फ्रान्समधील पॅरिस येथील खासगी वस्तुसंग्रहालयामध्ये असलेल्या चित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातामध्ये पट्टा हे शस्त्र दाखविले आहे. संग्रहालयातील नोंदीनुसार त्यांच्या डाव्या हातामध्ये मोरपिसाप्रमाणे कोणत्या तरी पक्ष्याचे शोभेचे पीस दाखविण्यात आले आहे. अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील संग्रहालयामध्ये असलेल्या चित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये पट्टा हे शस्त्र आणि कमरेला कटय़ार दाखविली आहे. पॅरिस आणि फिलाडेल्फिया येथील चित्रांमध्ये पर्शियन आणि रोमन लिपीमध्ये शिवाजी महाराजांचे नाव लिहिलेले आहे, असे तारे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जगभरात २७ चित्रे प्रसिद्ध आहेत. या तीन अप्रकाशित चित्रांची भर पडण्यासाठी तारे यांनी केलेले प्रयत्न स्तुत्य आहेत. परदेशात असलेली ही चित्रे मराठी माणसांसाठी अभिमानास्पद आहेत, असे पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले. मुंबई येथील छत्रपती शिवाजी संग्रहालय येथील चित्रांशी ही मिळतीजुळती चित्रे आहेत, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. या लघुचित्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावात डौलदार शिरोभूषण, त्यावर खोवलेला तुरा, पायघोळ अंगरखा, सुरवार आणि पायामध्ये मोजडी आहे. कानात मोत्याचा चौकडा, बोटात अंगठी आणि गळ्यात मोत्यांच्या दोन माळा असे मोजकेच अलंकार परिधान केले असल्याचे दिसून येते. करारी मुद्रा, बोलके डोळे आणि स्मितहास्ययुक्त प्रसन्नता ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तत्कालीन वर्णनामध्ये आढळणारी वैशिष्टय़े या चित्रांमध्येही दिसतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

नामदार थोरात यांच्या उपस्थितीत गळीत हंगामात विक्रमी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान

संगमनेर (प्रतिनिधी) सन 2019- 20 या गळीत हंगामात विक्रमी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान रविवार दिनांक 11 जुलै 2021...

शहिद जवान गोकुळ कचरे यांच्या परिवारास ५१ हजार १५१ रुपयांची मदत; सैनिक कल्याण समितीची बैठक उत्साहात – विविध ठराव मंजूर

संगमनेर (प्रतिनिधी)सैनिक कल्याण समिती संगमनेर (महाराष्ट्र राज्य) समितीची मासिक मीटिंग रविवार दिनांक 4 जुलै रोजी समितीच्या कार्यालयात...

…माझ्यासाठी तो कॅच ऑफ द इयर : सचिन तेंडुलकर ; हरलीन देओलचा सुपरकॅच व्हायरल, नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव

क्रिकेटमध्ये आजवर सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. विशेषत: गेल्या काही वर्षांमध्ये टी-२०च्या जमान्यात जिथे प्रत्येक...

सावधान : जिल्ह्यात कोरोना वाढतोय; संगमनेरातही रूग्णसंख्येत वाढ – 60 रूग्णांची भर

संगमनेर (प्रतिनिधी)जिल्ह्यात काही दिवसांपासून किंचित वाढ होणार्‍या कोरोनामध्ये आज मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात आज...

रविवारी 500 ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण- सौ. दुर्गाताई तांबे

संगमनेर (प्रतिनिधी)कोरोना पार्श्‍वभूमीवर संगमनेर शहरातील पाचशे ज्येष्ठ नागरिकांना संगमनेर नगर परिषदेच्या वतीने रविवारी दिनांक 11 जुलै 2021...