वाळू उपसा सुरूच
संगमनेर (शहर प्रतिनिधी)- तालुक्यामध्ये होत असलेल्या बेकायदेशीर मुरूम उपसा बाबत महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय पथकाने कारवाई करत तालुक्यातील आश्वीमध्ये बेकादेशीर मुरूम वाहणारे दोन डंपर तर संगमनेरमध्ये तीन डंपर असे एकूण पाच डंपर जप्त केले. दरम्यान शासन स्वस्त दरात वाळू पुरवित आहे, अवैध वाळू उपसा बंद केला आहे असे वारंवार सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र प्रवरा नदीतून अवैध वाळू उपसा सुरूच असल्याचे दिसत आहे.
संगमनेर तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरुमाची वाहतूक केली जात आहे. ‘महसुल मंत्र्यांनी गौण खनिज उपश्याबाबत सक्त आदेश देऊनही या आदेशाचे संगमनेर तालुक्यात पालन होताना दिसत नाही. हिच परिस्थिती वाळू तस्करी बाबत आहे. तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये खुलेआम मुरूम उपसा केला जात आहे. झोळे परिसरातही मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाच्या तस्करीचे वृत्त प्रकाशित झाले होते. त्यामुळे प्रशासन जागे झाले आणि जिल्हास्तरीय पथकाने काल संगमनेर तालुक्यातील मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. तालुक्यातील आश्वी गावात दोन तर शहरामध्ये तीन ठिकाणी अशा पाच डंपरवर कारवाई करण्यात आली. संगमनेर तालुक्यामध्ये खुलेआम मुरुमाची वाहतूक केली जात असतानाही संगमनेर येथील महसूल अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे. जिल्हास्तरीय पथकाने या मुरुमावर कारवाई केल्याने महसूलचे स्थानिक प्रशासन काय करते? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.