Sunday, June 4, 2023

इंजिनीअरिंग अॅडमिशनचे ‘मिशन’ : प्रा. डॉ. रमेश पावसे

सध्या उपलब्ध क्षेत्रांतील जास्तीत जास्त कुशल मनुष्यबळ घडवणारे, नोकऱ्यांची संधी उपलब्ध करणारे आणि राष्ट्रनिर्मितीमधील उद्योजक घडवणारे क्षेत्र म्हणजे इंजिनीअरिंग / अभियांत्रिकी होय.“अभियांत्रिकीच्या ‘अमुक’ एका शाखेलाच प्रवेश घेतल्याने यशस्वी करिअर घडते” असा गैरसमज असून, विद्यार्थ्यांच्या चार वर्षांच्या काळातील मुलभूत विषयातील अध्ययन, प्राप्त झालेले ज्ञान, प्रात्यक्षिक कौशल्ये याबरोबरच प्रभावी व्यक्तिमत्व,संभाषण कौशल्ये, भाषांवरील प्रभुत्व यांच्यामुळेच सर्व शाखेतीलअभियंत्यांची बहूराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अधिकाधिक पॅकेजवर निवड होत असते.

यंदा बारावीचा निकाल वेळेत लागूनही प्रवेश प्रक्रियेच्या लांबलेल्या वेळापत्रकांमुळे विद्यार्थी व पालकांचा जीव टांगणीला लागलेला आहे. गेल्या काही वर्षातील रेंगाळलेल्या प्रवेश प्रक्रिया पाहता पालक विद्यार्थी यांसाठी ‘ऍडमिशन’ म्हणजे एक ‘मिशन’च ठरत आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीतून सावरताना प्रत्येक व्यक्तीचे नियोजन कोलमडलेले असताना विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर / करिअरवर दीर्घकालीन परिणाम होताना दिसत आहेत. ऑनलाईन शिक्षणाच्या केविलवाण्या व अयशस्वी प्रयत्नानंतर प्रत्यक्ष वर्गातील शिक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थी,शिक्षक आणि विशेषत: पालक आग्रही आहेत. नुकताच जेईई२०२२ आणि महाराष्ट्र आरोग्य आणि तांत्रिक सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटीसीईटी) २०२२ चा निकाल जाहीर झाला आहे. केंद्रीय पातळीवरील जेईई (मेन्स, एडव्हान्स्ड) परीक्षा असल्यातरी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त पालक विद्यार्थी वर्ग अभियांत्रिकी, फार्मसी, व कृषी या क्षेत्रातील एचटीसीईटीच्या निकालाकडे डोळे लावून बसतो. बारावीनंतर अभियांत्रिकी पदवी शिक्षणातील प्रवेशाच्या संबंधी दरवर्षी मार्गदर्शन करत असताना समुपदेशन सत्रामध्ये काही पालक, विद्यार्थी याना वारंवार पडणारे प्रश्न नेहमी उपस्थित होतात. त्यापैकी प्रातिनिधिक व महत्वाचे प्रश्न आणि त्यांचे समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

• बारावी विज्ञाननंतर आरोग्यक्षेत्र, अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी ह्या अभ्यासक्रमामधून कशी निवड करावी ?
बारावी विज्ञान नंतर प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत: आत्मपरीक्षण करावे किंवा आपले शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, समुपदेशक यांच्या मदतीने आपली बलस्थाने, आवड, रुची ओळखावी. आपल्या आवडीनुसार संधी निवडताना भविष्यातील बदल आणि आव्हाने काय असतील याची माहिती तज्ज्ञांच्या मदतीने घेतल्यास नक्की फायदेशीर ठरेल. आपली आवड नाविन्यपूर्ण शिक्षण घेण्याची असल्यास अभियांत्रिकी शिक्षण विद्यार्थ्यास नेहमीच नवा मार्ग दाखवत असते.

• सध्यस्थितीत जास्तीत जास्त इंजिनीअर्स उपलब्ध असताना इंजिनीअरिंग (अभियांत्रिकी) शाखेलाच का प्रवेश घ्यावा?
मागील वीस वर्षातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढल्याने सध्यस्थितीत जास्तीत जास्त इंजिनीअर्स बाहेर पडत आहेत परंतु यामध्ये औद्योगिक क्षेत्रास गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतलेल्या कुशल मनुष्यबळाची सतत वाणवा जाणवत असते. सध्या उपलब्ध क्षेत्रांतील जास्तीत जास्त प्रवेश क्षमता असलेले तसेच जास्तीत जास्त तांत्रिक कुशल मनुष्यबळ घडवणारे, नोकऱ्यांची संधी उपलब्ध करणारे आणि सर्वात महत्वाचे राष्ट्रनिर्मितीमधील उद्योजक घडवणारे क्षेत्र म्हणजे इंजिनीअरिंग होय. उत्पादन क्षेत्रातील रोजगार उपलब्ध असताना गेल्या काही काळातील सेवा क्षेत्रातील रोजगार झपाट्याने वाढत आहेत. कोरोना काळातही औद्योगिकक्षेत्राने भरपूर मनुष्यबळाला संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.


• अभियांत्रिकी संस्थेचा / महाविद्यालयाचा दर्जा कसा ओळखावा?
अभियांत्रिकी महाविद्यालयास भारत देशातील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मान्यता असण्याबरोबरच महाविद्यालयाचे प्रतवारी (ग्रेड) ठरवणारी संस्था,राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद (नॅक) हिने वरिष्ठ ग्रेड दिलेली असावी व एकूण चार गुणांकापैकी जास्तीत जास्त गुण असायला हवेत. महाविद्यालयातील जास्तीत जास्त विभाग राष्ट्रीय मान्यता मंडळ (एन बी.ए.) मानांकन प्राप्त असावेत. तसेच, राष्ट्रीय व विविध सर्वे अहवालामध्ये वरच्या रँकिंग मध्ये समावेश असावा. सर्वात महत्वाचे मागील वर्षी उपलब्ध क्षमतेपैकी प्रवेशसंख्या व कॅम्पस प्लेसमेंट संख्या या दोन्हीही बाबी जास्तीत जास्त असाव्यात. याबरोबरच, सदर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट, मुलाखत, फोनवरून चौकशी केल्यास संयुक्तिक ठरेल. सध्या महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांमार्फत अध्यापन, शिक्षक, विद्यार्थ्यांकरिता राबवण्यात येणारे उपक्रम, प्लेसमेंट या महत्वाच्या बाबीबरोबरच वसतीगृह, मेस आणि इतर उपलब्ध सुविधा याबद्दल अभिप्राय घ्यावा.

• अभियांत्रिकीतील बी.ई. व बी.टेक. पदवी शिक्षणातील फरक काय?
भारतात आय.आय.टी, एन.आय.टी, विद्यापीठे, स्वायत्त व विद्यापीठ-संलग्न महाविद्यालये यामधून अभियांत्रिकी शिक्षण देण्यात येते.प्रत्येक महाविद्यालय हे स्वायत्त व विद्यापीठ-संलग्न महाविद्यालय यापैकी एक वर्गात कार्यरत असते. यामध्ये बी.टेक. पदवी बहाल करणाऱ्या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात आवश्यकतेनुसार वेळोवेळी अभ्यासक्रमात नवनवीन विषय समाविष्ट करता येतात. असे असले तरीही बी.ई.पदवी बहाल करणाऱ्याविद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील अभ्यासक्रम प्रत्येक चार वर्षांनी अद्ययावत होत असून विद्यापीठातील अभ्यासमंडळ औद्योगिक तज्ज्ञांच्या मदतीने पुढील चार वर्षांतील संभाव्य तंत्रज्ञानाचा वेध घेऊन आधुनिक विषय समाविष्ट करत असतात.

• यशस्वी कॅंपस प्लेसमेंटसाठी अभियांत्रिकीच्या कोणत्या शाखेस प्रवेश घ्यावा?
इतर सर्व प्रश्न असले तरीही, पालक व विद्यार्थ्यांच्या मनात सर्वात जास्त गोंधळ शाखेविषयी असतो, असा अनुभव आहे. अभियांत्रिकी शिक्षणात मुख्य, व मूलभूत शाखा या सिव्हिल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, केमिकल इंजिनीअरिंग आहेत. परंतु काळाच्या ओघात ह्या मूळ शाखेमधूनच उगम पावलेल्या शाखेंचा सखोल व विशेष अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, ई. अँड टी.सी., माहिती तंत्रज्ञान, मेकॅट्रॉनिक्स, पेट्रोकेमिकल शाखा अस्तित्वात आल्या आहेत. असे असले तरीही मूळ शाखेचे महत्व नेहमीच अतुलनीय राहिले आहे. एआयसीटीईच्या उदयोन्मुख शाखांमध्ये आर्टीफिसिअल इंटिलिजिअन्स (ए.आय.), इंटरनेट ऑफ थिंग्स (आय.ओ.टी.), रोबोटिक्स, डेटा
सायन्स (डी.एस.), सायबर सुरक्षा, ३ डी प्रिंटिंग- डिझाईन यांचा समावेश केला असून या शाखेंच्या सर्व मूळ शाखेंमध्ये उपयोगितेमुळे एकंदर सर्व शाखेंच्या
सीमा पुसल्या गेल्या आहेत. कोरोनापूर्व व कोरोनानंतर डिजिटलायझेशनमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांतील वाढत्या मनुष्यबळाच्या मागणीनुसार कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर माहिती तंत्रज्ञान व आपल्या आवडत्या अभियांत्रिकी क्षेत्रात यशस्वी करिअर करू शकतो. ज्ञान, कौशल्याच्या धर्तीवर इतर शाखेतील अभियंते कॉम्प्युटर व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अत्युच्च पदांवर कार्यरत आहेत. शेवटी “अमुक” एका शाखेलाच प्रवेश घेतल्याने यशस्वी करिअर घडते असे नसून, विद्यार्थ्यांच्या चार वर्षांच्या काळातील अध्ययन, प्राप्त झालेले ज्ञान, कौशल्ये याबरोबरच प्रभावी व्यक्तिमत्व,संभाषण कौशल्ये, भाषांवरील प्रभुत्व यांच्यामुळेच बहूराष्टीय कंपन्यांमध्ये अधिकाधिक पॅकेजवर निवड होत असते.

• अभियांत्रिकी प्रवेशाचे टप्पे कोणते?
प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन प्रक्रिया असल्याने विद्यार्थ्याने स्वतः लक्ष्य देवून तज्ञांच्या मदतीने प्रक्रिया राबवल्यास चुका होणार नाहीत. विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणीपासून प्रथम वर्ष वर्ग सुरुवात पर्यंत महत्वाच्या टप्प्यांची माहिती रकान्यात दिली आहे.

प्रवेश प्रक्रिया महत्वाचे संभाव्य टप्पे
• विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी व कागदपत्रे तपासणी.
• तात्पुरती व अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध
• प्रवेशासाठी प्रथम, द्वितीय फेरीमध्ये ऑप्शन देणे
• प्रथम, द्वितीय फेरीचे जागा वाटप
• फ्रीज किंवा नॉट फ्रीज ऑप्शन स्वीकारणे.
• महाविद्यालयात फी भरून प्रवेश घेणे
• संस्था पातळीवरील रिक्त जागांवरील प्रवेश
• प्रवेश प्रक्रिया समाप्त (कट ऑफ डेट)
• प्रथम वर्ष वर्ग सुरुवात

• प्रवेशाचा ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी?
ऑप्शन आणि त्यांचा प्राधान्यक्रम यास सर्वाधिक महत्व असल्याने त्यातील मुद्देसूद माहिती घेऊनच ऑप्शन फॉर्म भरावा. यासाठी अभियांत्रिकी शिक्षणातील महाविद्यालये, शाखा माहित असलेल्या तज्ञांची, प्रवेश प्रक्रिया माहिती असलेल्या व्यक्तींची मदत घ्यावी. विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणीनंतर प्रत्येक विद्यार्थ्यास एमएचसीईटी च्या मार्कांनुसार स्टेट जनरल मेरीट नंबर प्राप्त होतो. हा क्रमांक विद्यार्थ्यास आपण महाराष्ट्र राज्यात किती मेरीट क्रमांकावर आहोत आणि त्यानुसार आपण मेरीट मध्ये किती पुढे? किंवा किती मागे?याची पडताळणी करतो. तसेच,मागील वर्षाच्या कट ऑफ नुसार एखाद्या महाविद्यालयाच्या एखाद्या शाखेस प्रवेश मिळेल की नाही?असा अंदाज करण्यासाठी उपयोगी येतो.सर्वसाधारणपणेएक ऑप्शन म्हणजे एखाद्या महाविद्यालयाच्या एखाद्या शाखेचा टीएफडब्ल्यूएस सहित किंवा टीएफडब्ल्यूएस विरहितकोड! टी. एफ. डब्ल्यू. एस.म्हणजे ट्युशन फी माफी योजना आणि त्यासाठी पालकांच्या वार्षिक उप्तन्नानुसार विद्यार्थीपात्र आहे की नाही याची पडताळणी करावी. यामध्ये ऑनलाईन नोंदणी करतानाशक्यतो‘टी एफ डब्ल्यू एस: होय’ हा पर्याय नोंदवावा. या योजनेमध्ये विद्यार्थ्याच्या वार्षिक फीमधील सर्वात जास्त भाग असलेली ट्युशन फी माफ होत असते परंतु प्रत्येक शाखेत फक्त५% (६० जागांसाठी ३) जागा उपलब्ध असल्याने जास्त मेरीट असलेल्या आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळतो.


• फ्रीज किंवा नॉट फ्रीज ऑप्शन म्हणजे काय?
फ्रीज:प्रवेश प्रक्रीयेमध्ये प्रथम/ द्वितीय फेरी साठी ऑप्शन दिल्यानंतर प्रथम/ द्वितीय फेरीचे जागा वाटप होत असते. यानंतर विद्यार्थ्यास मिळालेल्या जागेस प्रवेश घ्यावयाचा असल्यास ऑनलाईन ‘फ्रीज’ पर्याय नोंदवावा आणि वेळापत्रकानुसार महाविद्यालयात प्रवेश घ्यावा.
नॉट फ्रीज: प्रथम/ द्वितीय फेरीमध्ये वाटप झालेली जागा आपल्या अपेक्षेप्रमाणे नसल्यास ‘नॉट फ्रीज’पर्याय स्वीकारणे आवश्यक असते. या प्रकारातील विद्यार्थी पुढील फेरीमध्ये सध्या मिळालेल्या जागेपेक्षा चांगला व प्राधान्यक्रमातून वरचा ऑप्शन मिळण्यासाठी प्रयत्न करत असतो. पुढील फेरीमध्ये सध्या मिळालेल्या जागेपेक्षा चांगला व प्राधान्यक्रमातून वरचा ऑप्शन न मिळाल्यास सध्या मिळालेली जागा अबाधित राहत असते.
प्रवेश प्रक्रियेमधील सर्व माहिती घेतली तरीही, ऑप्शन फॉर्म, फ्रीज/नॉट फ्रीज, प्रवेशाचा निर्णय घेताना घाई न करता, विचारपूर्वक निर्णय घेऊन वेळापत्रकाप्रमाणे सर्व टप्पे वेळेत पूर्ण केल्यास इंजिनिअरिंगच्या प्रवेशाचे ‘मिशन’ नक्कीच त्रासदायक ठरणार नाही.

Dr. Ramesh Pawse

प्रा. डॉ. रमेश सहादू पावसे
सहयोगी प्राध्यापक, ई एन्ड टी सी
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय,
संगमनेर.९७६६५०१८०४

4 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

इंटेलिजन्स : लाभदायक की हानीकारक

आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या क्षेत्रात नकारात्मक शक्यतांविषयी तज्ञ लोकांचे भाकित(लेखक...

संगमनेरात आक्रोश, तालुका बंदसह मोर्चाचे आयोजन

मंगळवारी एकवटणार हिंदू समाज, अत्याचार रोखण्याचे आवाहनविविध संघटनाच्या सहभागातून...

जनतानगरमध्ये महिलेसह चौघांना मारहाण

मारहाणीत कोयता फायटर व गजाचा वापरमारहाणीत ६ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल

संगमनेर मर्चंट्स बँक निवडणूकीत अखेरच्या क्षणी एकोप्याचे दर्शन

व्यापार्‍यांच्या कामधेनूत राजकारण टाळून बिनविरोधचा रचला इतिहासयुवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर - बँकेचे संस्थापक स्व.ओंकारनाथजी मालपाणी...

स्वीफ्ट कार व दुचाकीची जोराची धडक

कारच्या धडकेत युवक ठारयुवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर- नाशिक-पुणे महामार्गावरील रायतेवाडी फाटा येथे दुचाकीस्वार गतीरोधकावरून जात असतांना पाठीमागून भरधाव वेगाने...