अकोलेतील बेसुमार वृक्ष तोडीवरून नवलेंचा सवाल
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – झाडांच्या कत्तली केल्याशिवाय विकास होऊच शकत नाही का ? अकोले शहरात गटारीचे बांधकाम चालू आहे. काँक्रीटच्या इमारती टाळण्यासाठी गटारी शहरभर नागमोडी फिरल्या. रस्त्याच्या कडेला उरलेली झाडं वाचविण्यासाठी मात्र इंचभर सुद्धा वळून जायला त्या तयार झाल्या नाहीत. झाडांच्या क्रूर कत्तली त्यासाठी करण्यात आल्या आहेत का? असा खडा सवाल कॉ. डॉ. अजित नवले यांनी विचारला आहे.
अकोलेतील एडीसीसी बँकेच्या समोरचे याच गटारीसाठी हे फोटोतील तोडलेले झाड पाहून तीव्र वेदनेची कळ हृदयात उमटली. झाडाचा डोलारा शेंड्यासह तोडलाच. जणू मानचं छाटली. पण माणसाची क्रूरता पहा, शिल्लक राहिलेल्या धडालाही खिळे ठोकलेत. झाड उंबराचे असल्याने त्याचा रस (रक्त) खिळे ठोकून बाटलीत गोळा केले जात आहे. तो तोंडाला लावला जाईल. फोटो पाहिला तरी माणसाच्या क्रूरपणाची नखशिखांत शरम वाटते. मराठी शाळेच्या समोरही टपरीपुढील झाड मागील आठवड्यात असेच तोडले गेले. ते पुन्हा फुटू नये यासाठी त्याची साल (कातडी) सोलून काढली गेली. अशी झाडे तोडताना कुणाची परवानगी घ्यावी लागते का ? तशी परवानगी संबंधितांनी घेतली होती का ? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात.
जनावरांच्या सरकारी दवाखान्याच्या आजूबाजूची झाडे दुकानांवर पडतील या सबबीखाली अशीच तोडली गेली आहेत. कॉलेज रोडला वडाची दाट झाडी होती. आमची मागची पिढी त्या परिसराला ‘दाटवड’ म्हणायची. आज तेथेही पद्धतशीरपणे झाडे संपवित आणली गेली आहेत. दुकानाचा फ्रंट झाकतो म्हणून झाडे तोडली जात आहेत. अकोले बस स्थानकाच्या दक्षिण बाजूला गगनाला भिडलेली असंख्य झाडे होती. बाग करण्यासाठी ती कापली. बाग झाली नाही. झाडे मात्र जीवानिशी गेली. कोल्हार घोटी रोडच्यविस्तारात कळस ते बारी झाडांची किती मुंडकी छाटली त्याची गणतीच नाही. उन्हाळ्यात शहरात धुळीचे असह्य लोट उठतात. फुफ्फुसे गुदमरून जातात. मागील पिढीने आपल्याला हिरवेगार शहर दिले होते. आपण पुढच्या पिढीला झाडे नसलेले, ओकेबोके, धुळीने माखलेले शहर देत आहोत.
विकास असा नसतो मित्रांनो ! जिवंत राहण्यासाठी झाडे रोख कमिशन देत नाहीत तोवर हे असेच चालू राहील बहुतेक. बँके समोरील फोटोतील उंबराचे झाड अजूनही वाचू शकेल. पुढील जिव्हारी घाव त्याच्या बुंध्यावर पडला नाही तर..! मराठी शाळेच्या समोर टपर्यांपुढे सुरू असलेल्या पावसाळ्यात गुलमोहर, जांभूळ, चिंच लावता येतील. टपरीवाल्यांना झाडे जगविणे बंधनकारक करता येईल. बाजारतळाचे काँक्रीटीकरण सुरू आहे. झाडे लावण्याचे व ते जगविण्याचे नियोजन करता येईल. कळस ते बारी रस्त्याच्या कडेला बहुवर्षीय प्रकारातील झाडे लावून जगवीता येतील. बस स्थानक, वीज मंडळाचा परिसर, कारखाना व देवठाण रोड, नदी परिसर, तहसील कार्यालयाचा परिसर, कोर्ट परिसर, हुतात्मा स्मारक, कॉलेज, अगस्ती व मॉडर्न हायस्कुल, अगस्ती कारखाना परिसर झाडांनी सजवितात येईल. नगर पालिका, बांधकाम विभाग, सामान्य प्रशासन, सजग नागरिक, लोकप्रतिनिधी, शिक्षक, पत्रकार, बुद्धिजीवी सर्वांनीच याबाबत विचार करावा असे आवाहन डॉ. अजित नवले यांनी केले आहे.