विधानसभेत आग्रही मागणी
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – कोरोनाच्या संकट काळात राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशासेविका यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. त्या तुटपुंज्या मानधनावर काम करत असून त्यांची मानधन वाढ तात्काळ करावी अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंगणवाडी सेविका व आशा सेविकांचे प्रश्न मांडताना आमदार थोरात म्हणाले की, अंगणवाडी सेविका ,मदतनीस व आशासेविका ह्या ग्रामीण व दुर्गम भागात अत्यंत चांगले काम करत आहे. कोरोनाच्या संकट काळात या सर्व महिला भगिनींनी अत्यंत चांगले काम केले. हे सर्व राज्याने आणि देशाने पाहिले आहे. त्यांच्या मानधनवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. मानधन वाढीबाबत सर्व विधानसभेतील सदस्य अनुकूल आहेत.
या सर्व अंगणवाडीताई, मदतनीस व आशाताई यांची अर्थव्यवस्था चांगली व्हावी. त्यांचे कुटुंब चांगले व्हावे हे प्रत्येकाला वाटते आहे .म्हणून राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशासेविका यांच्या मानधना तात्काळ वाढ झाली पाहिजे.मानधन वाढीबाबत या महिला भगिनींनी अनेक वेळा आंदोलने केली मोर्चे काढले. मागील आठवड्यामध्ये आझाद मैदानावर कॉ. मिलिंद रानडे यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी संघटनांचा भव्य मोर्चा झाला. मात्र सरकारकडून दिलेले उत्तरही समाधानकारक नाही. या विभागाचे मंत्री महोदय संवेदनशील आहेत. त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन या महिला भगिनींना सरकारकडून जास्तीत जास्त मानधन वाढ करण्यासाठी सभागृहाला आश्वासित करून प्रत्यक्ष ही मानधन वाढ दिली पाहिजे अशी मागणी ही आमदार थोरात यांनी केली आहे.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित असून कोरोना संकटानंतर डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, अशा सेविका व मदतीस यांचा कौतुक सोहळा संपन्न झाला होता .यावेळी आमदार थोरात यांनी या प्रश्नासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असून विधानसभेतही हा प्रश्न आग्रहीपणे मांडू असे सांगितले होते. आज आमदार थोरात यांनी अत्यंत आक्रमकपणे अंगणवाडी सेविकांच्या मानधन प्रश्नाबाबत सरकारला घेरले.आमदार बाळासाहेब थोरात हे विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य असून त्यांनी मांडलेल्या प्रश्नामुळे सरकार नक्कीच तातडीने अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत अपेक्षित निर्णय होईल असा आशावाद राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविकांमध्ये निर्माण झाला आहे.