संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजी उर्फ विष्णूपंत आनाजी रहाटळ (रा. जवळे कडलग) यांनी माझी फसवणूक करुन वेळोवळी व वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन माझ्यावर नैसर्गीक व अनैसर्गीक अत्याचार केला. दोन वेळा बळजबरीने गर्भपात केला. तसेच वेळोवेळी प्रमोशन देतो म्हणून पैसे उकळले अशी आशयाची फिर्याद तालुक्यातील सुकेवाडी येथील राहणार्या व आरोग्य केंद्रात शिपाई म्हणून काम करणार्या महिलेने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. या फिर्यादीवरुन माजी पंचायत समिती सदस्य विष्णूपंत रहाटळ याच्याविरुध्द भा.दं.स. 376(2)(एन), 377, 452, 328, 384, 406, 504, 506 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान याप्रकरणी विष्णूपंत रहाटळ यांनी सदर फिर्यादी महिलेवर काही दिवसांपूर्वी आरोप करत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या महिलेने प्रेमसंबंधांचे नाटक करत व्हिडीओ तयार करुन त्याआधारे ब्लॅकमेल करुन सुमारे 40 लाख रुपयांना आपल्याला लुटले अशी फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी पोलीसांनी सदर महिलेला अटक केली होती.
मात्र आज याप्रकरणी सदर महिलेने विष्णूपंत रहाटळ याच्याविरोधात पोलीसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. यात म्हटले आहे की, मी जवळे कडलग प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर म्हणून काम करत असताना विष्णूपंत रहाटळ यांच्याशी एका मिटींगमध्ये ओळख झाली. त्यावेळी त्याने माझा मोबाईल नंबर घेऊन माझ्याशी लगड केली. तु मला खूप आवडते, तुझ्याशी मला शारीरीक संबंध ठेवायचे असे म्हणत वारंवार त्रास दिला. मला मोठी मुलगी असल्याने मी असे करु शकत नाही असे या फिर्यादी महिलेने त्याला सांगीतले. परंतू तो रात्री अपरात्री मला फोन करुन प्रसंगी घरी येऊन मला त्रास देत होता. सन 2015 जूलै महिन्यात विष्णूपंत रहाटळ फिर्यादीच्या घरी आला यावेळी घरात फिर्यादी व तिची मुलगी असताना त्याने चहात गुंगीचे औषध दिले व फिर्यादीला बेडरूममध्ये नेऊन तिच्याशी नैसर्गीक व अनैसर्गीक संबंध प्रस्थापीत केले.
यावेळी त्याने या प्रकरणाची शुटींग केली तसेच ही गोष्ट कोणाला सांगीतली तर तुझी नोकरी घालवेल तसेच तुला जगणे मुश्कील करेल अशी धमकी दिली. त्या धमकीमुळे व घरात आम्ही दोघीच असल्याने मी तो अत्याचार सहन केला. त्यानंतर विष्णूपंत रहाटळ याने तुला आरोग्य खात्यात प्रमोशन देतो असे म्हणत पाच लाख रुपयांची मागणी केली. मात्र एवढे पैसे देणे शक्य नसल्याचे फिर्यादीने त्याला सांगीतले. परंतू मी तुला सध्या उसणे देतो परंतू ते तू सोयीने परत कर असे म्हणत 2018 मध्ये आरटीजीएसने माझ्या खात्यात जमा केले. त्यानंतर हे पैसे संबंधीत अधिकार्यांना द्यायचे असल्याचे सांगत माझ्याकडून हे पैसे काढून घेेतले. परंतू त्याने माझ्या प्रमोशन साठी काहीही प्रयत्न केले नाही. यादरम्यान विष्णूपंत रहाटळ याने वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी मला नेऊन माझ्यावर अत्याचार केले. यादरम्यान त्याने माझ्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली त्यावेळी अहमदनगर जिल्हा सोसायटीमधून 07 लाख 55 हजार रुपये कर्ज काढून तसेच बजाज फायनान्स येथून 4 लाख रुपये कर्ज काढून 11 लाख 55 हजार रुपये दिले. यादरम्यान त्याच्या सततच्या त्रासाला व अत्याचाराला कंटाळून तिची बदली अस्तगाव ता. राहाता येथे करुन घेतली त्यामुळे चिडलेल्या रहाटळ याने माझ्याकडे आपल्या संबंधाचे व्हिडीओ, फोटो आहेत ते मी सार्वजनिक करेल त्यामुळे तुला माझ्याशी शारीरीक संबंध ठेवावेच लागेल असे म्हणून धाकदडपशाही केली. त्यामुळे मी 2015 ते 2019 यादरम्यान आरोपीकडून गरोदर राहिली. त्यावेळी आरोपीने गोळ्या देऊन जबरदस्तीने गर्भपात केला.
फिर्यादीच्या मुलीचे लग्न झाल्यानंतर रहाटळ याने वेळोवेळी फिर्यादीसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. आपल्या संबंधाचे शुटींग, फोटो तुझ्या मुलीच्या सासरच्यांना दाखवेल अशी धमकी देऊन माझ्यावर ठिकठिकाणी नेऊन अत्याचार करतच राहिला. त्यानंतर 11/11/2021 रोजी आरोपीच्या मागणीनुसार त्याला पुन्हा नवे-जुने करुन नऊ लाख रुपये कर्ज काढून दिले. दरम्यान या प्रकरणामुळे मुलीचे सासरचेही माझ्यावर संशय घेऊ लागले. 8/3/2022 रोजी रहाटळ याने फिर्यादीला बाभळेश्वरला भेटण्यास सांगीतले यावेळी फिर्यादीने तिच्या मुलीचे सासरे राजेंद्र गिरी यांनी बाभळेश्वरला सोडले. यावेळी आरोपी विष्णूपंत रहाटळ हा कारमधून फिर्यादीला साईसम्राट हॉटेल येथे घेऊन गेला. यावेळी राजेंद्र गिरी याने या दोघांचा पाठलाग करुन हे हॉटेल गाठले. त्याठिकाणी गिरी यांने या दोघांचे फोटो काढले व विष्णूपंत रहाटळ यास आता तुझे फोटो माझ्याकडे आहे. यापुढे तू फिर्यादीला त्रास देऊ नको, तिचे शोषण करु नको, तुझ्याकडे तिचे असलेले फोटो नष्ट कर तसेच तिचे पैसे परत देऊन टाक अन्यथा मी तुझे फोटो तुझ्या बायकोला दाखवतो अशी धमकी दिली. यावेळी रहाटळ याने आमची माफी मागितली व पुन्हा असे करणार नाही असे कबूल केले. माझ्या पतीचे निधन झाल्याने व माझ्या असाहयतेचा फायदा घेऊन विष्णूपंत रहाटळ याने वेळोवेळी शारीरीक संबंध ठेऊन मला त्रास दिला तसेच माझ्याकडून लाखो रुपये उकळले. माझा गर्भपात केला अशी फिर्यादी या महिलेने तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
एकूणच सुरुवातीला माजी पंचायत समिती सदस्य विष्णूपंत रहाटळ याने आपल्यासोबत हनीट्रॅपचा प्रकार होऊन आपल्याला 40 लाख रुपयाला या महिलेने व तिच्या साथीदाराने लुटल्याची फिर्याद दिली. तर आता सदर महिलेने रहाटळ याच्याविरुध्द लैंगीक अत्याचार, फसवणूक, धमकी, गर्भपात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तालुका पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.