Tuesday, January 18, 2022

संगमनेरचे वैभव : ऋषितुल्य कळसकर गुरुजी

Kalaskar Guruji

शिक्षण क्षेत्रात अद्वितीय कामगिरी केल्याबद्दल 1988 साली राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या कळसकर गुरुजींची कमाई खूप मोठी आहे – भटक्या व विमुक्त जमातीतून मुख्य समाज प्रवाहात आलेले, शिकून-सवरून उच्च पदाला गेलेले सुमारे 100 विद्यार्थी, मोफत शिक्षण घेत असलेले 250 विद्यार्थी आणि गारुडी, डोंबारी, वडार आदि मागास समाजातील अनाथ मुलींसाठी चालविण्यात येत असलेले वसतीगृह.

सौ. नलिनी सोमनाथ कळसकर

पाहताक्षणी ज्यांच्या पुढ्यात नतमस्तक व्हावे असे कळसकर गुरुजी आणि नलिनीबाई. शहाबादी फरशा असलेला दोन माजली बनागाला. संध्याकाळी साडेतीनच्या सुमारास गुरुजींना भेटायला गेलो. ते आराम करत होते. बाईंनी कोणी आल्याचे सांगतात मध्यम उंचीचे गुरुजी येऊन बसले. पांढरे-शुभ्र धोतर आणि पांढरा सदरा.
गुरुजी नमस्कार, ज्यामुळे तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला ते शिक्षण क्षेत्रातील तुमचं काम आणि त्यापुढला प्रवास याबद्दल जाणून घेण्यासाठी आलोय. थोडं सविस्तर सांगाल का?
गणपुले वकिलांनी सुरू केलेल्या सदूबाबा वाडीतील एका खाजगी शाळेत 1966 साली 50 रुपये पगारावर मी शिक्षक पेशा स्वीकारला, गुरुजी सांगू लागले. 9 ऑगस्ट 1966 रोजी चणेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत रुजू झालो. त्यानंतर निमगाव टेंभी येथील जिल्हा परिषद शाळेत माझी बदली झाली. 1968 साली संगमनेर शाळा क्रमाक 1 येथे माझी बदली झाली. 1976 साली ही शाळा संगमनेर नगर परिषदेत वर्ग होईपर्यंत मी या शाळेत होतो. मी जिल्हा परिषद शाळेत राहणे पसंत केले आणि घुलेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मी बदली करून घेतली. बाईही येथेच शिकवत होत्या. शाळेच्या आसपासच्या परिसरात कंजारभाट या भटक्या आणि विमुक्त जमातीतील काही कुटुंब राहत होती. त्यांची बोली चौरासी पण येथे राहण्यामुळे ते मराठीही चांगल्या रीतीने बोलू शकत. गावोगावी फिरून ते अन्नधान्य गोळा करत. हीच माणसं रात्री चोर्‍यारही करत. आई-वडिलांबरोबर मुलंही फिरत. मला ते पहावले नाही. मी पत्नी सोबत चर्चा केली. या मुलांना शिकवण्याचा आम्ही निर्णय घेतला. ‘बल्लू’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या लोकांना आम्ही म्हटलं तुम्ही मुलांना आमच्याकडे सोडून जा. आम्ही त्यांना शिकवू. ही गोष्ट 1975 सालची. या मुलांसाठी आम्ही 1978 साली शाळेच्या परिसरात ’गोकुळ’ वसतीगृह सुरू केले. ही मुलं शाळेत शिकत आणि वसतीगृहात रहात.
येथूनच कळसकर दाम्पत्यांचा खरा जीवनप्रवास सुरू झाला. बल्लू समाजातील पहिला मुलगा त्यांच्या कुटुंबात आला. पुढल्या वर्षी दुसरा मुलगा. त्यानंतर मग मुलं एकेक करून गोकूळमध्ये येऊ लागली आणि त्यांचं कुटुंब वाढत गेलं. हे सर्व या उभयतांनी स्वखर्चाने केलं. गुरूजी सांगतात 1975 साली इथे 16-17 घरे होती, त्यांची संख्या 1978 चाली 22 झाली. यांचं जीवन फारच वेगळं होतं 80 वर्षाच्या भिमसिंग याने त्यांच्या या कर्मकहाण्या गुरुजींना ऐकवल्या होत्या. हा समाज मूळचा रजपूत, राजस्थानातील. ही माणसं स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांच्या संघर्षात सर्वात पुढे होती. इंग्रजी सैन्याला घाबरूनच ही माणसं जंगलात जाऊन राहू लागली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही माणसं जंगलातून बाहेर पडली आणि भटकत राहू लागली.

विद्यालयातील शिक्षकांना मार्गदर्शन करताना आदरणीय कळसकर गुरुजी व बाई

त्या काळात गावोगावी दूरच्या प्रवासाला माणसं बैलगाड्यांतून जात. या बैलगाड्यांच्या खाली त्यांच्या शिदोरीचं टोपलं बांधलेलं असे. कंजारभाट समाजातील लोकांना हे माहीत होतं. आपली भूक भागवण्यासाठी ही माणसं बैलगाड्यांच्या दोन चाकांच्या मधल्या जागेत वाढलेल्या गवतामध्ये रात्री उताणी पडून राहत. बैलगाडी आली की भाकरीची टोपली खेचून घेत. अशाप्रकारे वाटमारी किंवा रात्रीचं गावोगावी जाऊन चोर्‍या करणं यामुळे यांच्याबद्दल दहशतही निर्माण झालेली होती. त्याचबरोबर हा समाजही बदनाम झाला होता.
गुरुजींच्या माहितीला पुस्ती जोडत बाई म्हणाल्या, फार पूर्वीपासून या समाजात मुलींना विकण्याची प्रथा होती.
या समाजाचे न्यायनिवाडे यांची जातपंचायत करीत असे. ही निवडा पद्धत खूपच अघोरी होती. एखाद्या स्त्रीशी गैरवर्तन केल्याच्या, व्यभिचाराच्या आरोपाबद्दल शहानिशा करताना भट्टीत तापून लाल झालेला कुर्‍हाड्याचा फाळ त्या माणसाच्या पिंपळपान बांधलेल्या आपल्या हातात ठेवला जाई. काही अंतरावर बोरीच्या झाडाची फांदी ठेवलेली असे. त्याने पळत जाऊन तो तापलेला फाळ त्या फांदीवर टाकावा लागे. तो इतका तापलेला असे की ती फांदी देखील जळून जाई. ज्या माणसाच्या हाताला जखमा होत तो माणूस दोषी ठरविला जाई. त्याच्या दोषाबद्दल ही जातपंचायत त्याला शिक्षा ठोठावे.
या समाजातली एक पिढी शिक्षित झाली त्यामुळे आता हे सर्व बंद झाले. कळसकर गुरुजी आणि बाई यांनी कंजारभाट समाजातील अशा दोन पिढ्या घडवल्या आहेत. गुरूजी सांगतात ही मुलं मुळातच अत्यंत हुशार होती. आम्ही शिकवलेली मुलं कधीही नापास झाली नाहीत. केवळ शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे त्यांना ज्ञान मिळत नसे. गुरुजी आणि बाई मिळून या विद्यार्थ्यांचा सर्व खर्च उचलत. शाळेत जाण्यासाठी हव्या असलेल्या सर्व गोष्टी त्यांना पुरवत.
बाईंनी मुलांना शिकवण्याची आपली एक वेगळी पद्धत विकसित केली आहे. आजही त्यांच्या शाळेत याच पद्धतीने शिकविले जाते. ही पद्धत म्हणजे गटवार शिक्षण पद्धती. वर्गातील एकूण विद्यार्थ्यांचे छोट-छोटे गट करून त्यात एक मुख्य विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी नेमली जाते. यामुळे काय होतं, मी विचारलं? बाई म्हणाल्या, विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगतरित्या लक्ष देता येतं, त्यांच्यामध्ये एक प्रतिस्पर्धा निर्माण होते.
तुमच्या हाताखाली शिकलेली ही मुलं आता काय करत आहेत, मी विचारलं. या मुलांचा पहिल्या पिढीतील मनोहर अभीयकर हा विद्यार्थी सध्या अमृतवाहिनी महाविद्यालयातील वसतिगृहात अधीक्षक आहे, गुरुजी सांगू लागले. रणजीत मांचरेकर हा विद्यार्थी पुणे जिल्हा कृषी विभागात राजपत्रित अधिकारी आहे. त्याने जलसिंचन व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदवी (एम.एस.सी.) संपादन केली आहे. असे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या हुद्यांवर आहेत.
गुरुजींच्या या कार्याची माहिती शिक्षण विभागातूनच पुढे गेली. गुरुजींना त्याची कल्पनाही नव्हती. जिल्हा शिक्षण अधिकारी श्री एम. जी. जाधव हे 1987 साली गुरुजी आणि बाई शिकवत असलेल्या या शाळेची पाहणी करण्याकरता आले होते. त्यांना धष्टपुष्ट बांध्याचे उंच सुदृढ आणि गोरेपान विद्यार्थी वसतिगृहाच्या एका खोलीमध्ये दिसले त्यांनी जाऊन त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं ही आमच्या गुरुजींची शाळा आहे. आम्ही इथेच शिकतो. हे अधिकारी त्या विद्यार्थ्यांना पाहून, त्यांचं बोलणं ऐकून, वागणं पाहून आश्‍चर्यचकित झाले. त्यांनी गुरुजींकडे चौकशी केली. ते म्हणाले जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांवर शासन खूप खर्च करतं परंतु हे विद्यार्थी इतके निरोगी, सुदृढ आणि शिस्तिचे नसतात. त्यांच्यात टापटीप स्वच्छता नसते. या मुलांचे तर दात देखिल चमकदार आहेत. त्यावेळी त्यांना गुरुजी करत असलेल्या कामाची पूर्ण कल्पना आली. या शाळेच्या सुमारे पाच एकराच्या परिसरात मुलांनी वृक्षारोपण केले होते. बाईंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रोपवाटिका तयार केल्या होत्या. मुले या झाडांना पाणी घालत. शाळा सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन सत्रात चाले. मधल्या वेळेत ही मुलं शाळेची आणि वसतीगृहातली दोन्ही कामे आनंदाने आणि स्वखुशीने करीत असत. 1978 ते 95 या काळात ‘गोकुळ’मध्ये 60 ते 70 विद्यार्थी होते. यात काही पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड येथून तर काही औरंगाबादमधून शिक्षण घेण्यासाठी आले होते. आज या कंजारभातट समाजाचे 40 ते 50 कुटुंब भाटनगर या घुलेवाडी परिसरात राहत आहेत.
1988 साली गुरुजींनी बंगल्याच्या मागच्या भागत गरीब मुलांसाठी बालवाडी सुरु केली. जून 1989 साली पहिलीचा वर्ग सुरू झाला. अवघ्या दोन महिन्यात 12 ऑगस्ट 1989 रोजी गुरुजींच्या बालवाडीला शासनाची मंजुरी मिळाली. त्यावेळी आमदार असलेल्या श्री. बाळासाहेब थोरात यांनी शासनाचे हे परवाना पत्र आपल्याला घरी आणून दिले ही आठवण गुरुजींनी आवर्जून सांगितली. दर वर्षी एक वर्ग याप्रमाणे या शाळेत तिसरीपर्यंतचे वर्ग सुरु झाले होते. गुरुजी आणि बाई यांनी आपल्या मिळणार्‍या पगारातून या शाळेकरिता दोन शिक्षकांची नेमणूक केली. ऑगस्ट 1992 साली गुरुजींच्या शाळेला 25 टक्के अनुदान मंजूर झाले. तीन वर्षानंतर गुरुजींची शाळा 100 टक्के अनुदानित झाली. शासकीय स्तरावर कार्यवाही इतकी त्वरित होण्यास कारणीभूत ठरला असावा तो गुरुजींना मिळालेला राष्ट्रपती पुरस्कार!
विद्यार्थी संख्या वाढू लागली. जागा कमी पडू लागली. गुरुजींनी आणि बाईंनी पुढील वर्गांकरता शाळा बांधण्याचा निर्णय घेतला. इंदिरा नगर गल्ली क्रमांक 9 येथे त्यांनी 10 गुंठे जागा त्यांनी विकत घेतली. त्यासाठी त्यांचा पुतण्या सोमनाथ यांनी आर्थिक मदत केली. याच जागेवर आज सौ. नलिनी सोमनाथ प्राथमिक विद्यालय उभे आहे. शाळा उभारण्यासाठी त्यांनी घुलेवाडी येथील त्यांची जागा विकली. आठवी पर्यंतच्या या शाळेत कुठलेही डोनेशन न घेता प्रवेश दिला जातो. शिवाय विद्यार्थ्यांना कुठलीही फी आकारली जात नाही. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या 660 झाली शाळेत 15 शिक्षक नेमण्यात आले. गुरूजी म्हणाले, आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये टाकण्याचा पालकांचा कल वाढला तसा मराठी माध्यमातील आमच्या शाळेच्या पटसंखेचा आकडा कमी झाला आणि 2021 साली तो 255 वर आला.
आजच्या युगातील आणि भावी पिढीच्या शिक्षणाबद्दल गुरुजींना त्यांचे मत विचारले असता ते म्हणाले, पाठांतर इतिहासजमा झाला आहे. पाठांतरामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढत असे. बुद्धी तल्लख होत असे. आज मुलांकडून पाठांतर घेतले जात नाही, परंतु आम्ही आमच्या शाळेत ही पद्धत आजही कायम ठेवली आहे. आज मोबाईलमुळे मुलांची विचार शक्ती कमी झाली आहे मुलांनी या वस्तूंचा किती उपयोग करावा आणि आपली मुलं मोबाईलचा कसा उपयोग करत आहेत याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
बंगल्यामागच्या जागेत असलेले वर्ग नव्या शाळेत गेल्याने रिक्त असलेल्या जागेत मग गुरुजींनी 23 जून 2006 रोजी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून डोंबारी, गारुडी, कैकाडी, बंजारा, वडार आदि मागास समाजातील अनाथ मुलींकरता सांदिपनी ऋषि बालिका आश्रम हे वसतिगृह सुरू केले.
हे सर्व तुम्ही कसं चालवता? गुरुजीनी प्रत्युत्तर केले, बँकेत ठेवलेल्या भविष्य निर्वाह निधीवर मिळणारे व्याज, आमच्या दोघांचे निवृत्तीवेतन यातून आमचा सर्व खर्च भागतो. आमच्या सर्व गरजा अत्यंत माफक आहेत, कमी आहेत. शाळेच्या बाबतींत म्हणाल तर अनुदानातून शिक्षकांचे पगार निघतात. शिक्षक देखील ही आपलीच शाळा आहे असे समजून आपला सहभाग उचलतात. मुलांना णे-आण करण्याकरता गाड्या पाठविला जातात. या गाड्यांच्या भाड्याचा खर्च शिक्षक आपल्या पगारातून उचलतात.

कळसकर विद्यालयाची इमारत


तुमच्या हाताखाली शिकलेल्या आणि मोठ्या झालेल्या तुमच्या विद्यार्थ्यांकडून यासाठी तुम्हाला आर्थिक मदत मिळते का? आमच्या कुठल्याही विद्यार्थ्याकडून आम्ही कधीही कुठलीही मदत स्वीकारत नाही. या संदर्भात गुरुजींनी एक आठवण सांगितली. एका शिक्षण परिषदेत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी असा संदेश दिला होता की शिक्षकांनी हात कधीही पसरू नयेत त्यांचे हात नेहमी देण्याकरता पुढे असावेत, घेण्याकरता नव्हे. विद्यार्थ्यांना ज्ञानाचे दान देणे हे आमचे कर्तव्य आहे ते आम्ही आजवर पार पाडत आलो आहोत.
सख्खी मुलं देखिल आपल्या आईवडिलांसाठी क्वचितच करतील एवढी मदत पुतण्या सोमनाथ आणि त्याच्या पत्नीने आम्हा उभयतांच्या कार्याला अत्यंत सढळ हस्ते केली आहे. आमच्या कार्यात त्यांनी नेहमीच फार मोठा वाटा उचलला आहे.
81 व्या वर्षी गुरुजी आणि 78 व्या वर्षी बाई स्वावलंबीपणे कुठल्याही तरुणाला आणि तरुणीला लाजवतील अशा रीतीने आपली सर्व कामे पार पाडत आहेत. गुरुजींचा साधा पेहराव आणि उच्च विचारसरणी यांचा प्रत्यय आल्यामुळे मी म्हटलं, स्वातंत्र्यपूर्व काळ तुम्ही पाहिला आहे. त्या काळातील पिढीवर असलेला गांधी विचारसरणीचा प्रभाव तुमच्यावर सुद्धा आहे काय? ते म्हणाले, माझे मामा कम्युनिस्ट होते, परंतु घरातल्या कुठल्याही किंवा समाजातील कुठल्याही व्यक्तीच्या विचारसरणीचा प्रभाव माझ्यावर कधी पडला नाही. जे मनाला योग्य वाटले ते प्रामाणिकपणे आणि परस्परांच्या विचारविनिमयाने आम्ही करत आलो आहोत.
तुमची विचारसरणी नेमकी कोणती अध्यात्मवादी, विज्ञानवादी की साम्यवादी? गुरूजी म्हणाले, मी मानवतावादी, जीवनवादी.
जीवनाकडे पाहण्याच्या तुमच्या दृष्टीकोना बद्दल थोडं …
नेहमी आनंदी राहणे, कुठल्याही गोष्टी बद्दल खेद वा खंत न बाळगणे. आपल्याच चुकीबद्दल हळहळ व्यक्त न करता स्वतःवरच हसणे. हा माझा जीवनमंत्र आहे. विचारल्याशिवाय कोणाला सल्ला द्यायचा नाही. ज्याला आपले विचार समजतात त्यांच्याशीच चर्चा करायची या नियमांचे पालन करून आम्ही वेळेचे व्यवस्थापन करतो. ज्ञान देऊन एखाद्याला मोठं करणं यात आम्हा दोघांनाही खूप मोठं समाधान मिळतं. ते आम्ही पुरेपूर घेतलं आहे, आजही घेत आहोत. देश आपल्यासाठी काय करतो या पेक्षा आपण देशासाठी काय करू शकतो, याचा आम्ही दोघेही नेहमी विचार करतो. आम्ही विद्यार्थ्यांवर कधीही रागवत नाही. तीच आमची मुलं आहेत. आम्ही बेटा किंवा बेटी म्हणूनच त्यांना संबोधतो. अशा या विचारांच्या आणि विचार-आचारांची सांगड घालणार्‍या ऋषितुल्य गुरुजीना नमस्कार करून मी त्यांचा निरोप घेतला.

Sudhir Bramhe

– सुधीर शालीनी ब्रह्मे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कामावर हजर होण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे भले आहे – संगमनेर आगार प्रमुख निलेश करंजकर

संगमनेर (प्रतिनिधी)मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपाचा...

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच : निवृत्तीमहाराज इंदोरीकर ; तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप

‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांना कीर्तनातून...

बॅडमिंटन : ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला नागपूरकर मालविकाने केले पराभूत ; सायना नेहवालला पराभूत करणारी ठरली दुसरी भारतीय महिला

इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर (YonexSunriseIndiaOpen2022) फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (Saina...

एसटी कर्मचाऱ्यांनो, गिरणी कामगार होऊ नका! तुटे पर्यंत ताणू नका, कर्मचार्‍यांना नागरीकांचे आवाहन

संगमनेर (संजय आहिरे)केवळ कामगार क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण मुंबई व महाराष्ट्रावर अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे...
web counter