
संगमनेर (प्रतिनिधी)
लायन्स क्लब संगमनेर सफायरकडून दरवर्षी स्वातंत्र्यदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. 19 वर्षांपासून स्वातंत्र्योत्सव या शीर्षकाखाली महापुरूष, शहीद जवान यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून देशभक्तीपर व्याख्यान, भव्य समूह नृत्य स्पर्धा, म्युझिकल कलर्स, कीर्तन आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. 2004 सालापासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. सर्व भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सन साजरा करीत आहेत. यावर्षी संघर्षातून समृध्दीकडे या विषयावर व्याख्यान देण्यासाठी मालपाणी उद्योग समूहाचे संचालक व प्रेरक वक्ते डॉ. संजय मालपाणी उपस्थित राहणार आहेत. सोमवार दि. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक 7.00 वा. मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे सर्व श्रोत्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन लायन्सचे मा. मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन गिरीष मालपाणी, प्रकल्पप्रमुख श्रीनिवास भंडारी, अध्यक्ष उमेश कासट, सचिव कल्याण कासट, खजिनदार गौरव राठी यांनी केले आहे.

2004 साली भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी भव्य कँडल मार्च संगमनेर शहरातून काढण्यात आला. त्यानंतर स्वातंत्र्योत्सव या कार्यक्रमाची सुरूवात झाली. युध्दाच्या क्लीप दाखविणे, भक्तीपर गाणे दाखविणे, शहीदांच्या कुटुंबांना सन्मानित करून त्यांना आर्थिक मदत देणे अशा प्रकारचे कार्यक्रम लायन्स संगमनेर सफायरने आयोजित केलेले आहे. 2017 साली सुप्रसिध्द गायक प्रविणकुमार यांचा देशभक्तीपर गीतांवर आधारित द म्युझिकल कलर्स या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. 2018 साली देशभक्तीपर गीतांवर आधारित भव्य समूह नृत्य स्पर्धा आयोजित केली होती.

2019 साली जिंदा शहीद अशी ओळख असणारे ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंट चे अध्यक्ष मनिंदरजीतसिंह बिट्टा यांच्या देशभक्तीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 2020 साली श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे स्वतंत्रता या विषयावर व्याख्यान झाले. कोव्हिडमध्ये 2021 साली मानसीताई बडवे यांचे गाथा क्रांतीकारकांच्या या विषयावर व्याख्यान झाले. याआधीही सुप्रसिध्द अभिनेते राहुल सोलापूरकर, कीर्तनकार चारूदत्त आफळे, सिन्नरकर महाराज यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.सर्व संगमनेरकरांनी डॉ. संजयजी मालपाणी यांच्या संघर्षातून समृध्दीकडे या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स क्लब संगमनेर सफायरच्या सदस्यांनी केले आहे.
