काॅंग्रेस पक्षात गटबाजीचा उद्रेक
युवावार्ता (प्रतिनिधी)
राज्याच्या राजकारणात व विशेषतः काॅंग्रेस पक्षात वेगाने घडामोडी घडत असून थोरात-पटोले वादाने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू होते. आज या नाराजी नाट्याने पक्षातील गटबाजी समोर आली आहे. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झाला होता. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत थेट हायकमांडकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर आज काही माध्यममांमध्ये थोरातांचे गटनेते पद धोक्यात अशा बातम्या पसरल्या होत्या. अखेर ही बातमी खरी ठरत आ. बाळासाहेब थोरात यांनी स्वतःहून गटनेते पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींना पाठवला आहे. वाढदिवस दिनीच बाळासाहेब थोरातांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे.नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने तांबे – पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यावरून काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद सुरू झाले आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही यासंदर्भात बोलताना नाराजी व्यक्त केली होती.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून पक्षांतर्गत रंगलेले राजकारण थोरात यांच्या राजीनाम्यास कारणीभूत ठरले आहे. विशेष म्हणजे आज थोरात यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठविल्याची माहिती पुढे येत आहे.दरम्यान या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रकृती चांगली नसल्याने ते आमच्याशी बोलत नाही. त्यांचा कुठलाही राजीनामा आमच्याकडे आलेला नाही, असे म्हटले आहे. मात्र या संदर्भातील वृत्त काही वाहिन्यांनी प्रसिद्ध केले आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अधिवेशनादरम्यान आ. थोरात मॉर्निंग वाॅक करत असताना पडल्याने त्यांच्या खांद्याला जबर दुखापत झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्णतः आरामाचा सल्ला दिल्याने विधान परिषद निवडणूक काळात थोरात कोठेही सक्रिय नव्हते. याच दरम्यान थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि निवडून देखील आले. तसेच यासंदर्भात त्यांनी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नव्हती. निवडणूक निकालानंतर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शनिवारी संगमनेरमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ऑनलाईन संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे. त्यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहे. नाना पटोले यांनी देखील थोरातांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुभेच्छा देताना थोरात जर भाजपमध्ये आले तर आहे त्यापेक्षा त्यांचा मोठा सन्मान आम्ही ठेऊ. त्यामुळे त्यांची आणखी उंची वाढेल असे सांगत अप्रत्यक्षपणे थोरातांना भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले.