पदवीधरच्या राजकीय खेळीतून काँग्रेसची पीछेहाट
तर जिल्ह्यात भाजपाची पकड आणखी मजबूत

राजकीय समीकरणे बदलणार

जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलणार

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – एकाच घरात दोन सक्षम उमेदवार आणि त्यांना उमेदवारी देण्यासाठी सर्वच पक्ष एका पायावर तयार, मात्र उमेदवारी करायची कुणी आणि कोणत्या पक्षाकडून यावर शेवटच्या क्षणापर्यंत एकमत न झाल्याने नाशिक पदवीधर मतदारसंघात मोठी उलथापालथ घडली. काँग्रेसच्या हक्काच्या मतदारसंघात आता पक्षाचे चिन्ह बाद झाले. तर भाजपला शेवटपर्यंत आशा होती की सत्यजित तांबे हे भाजपचे उमेदवार असतील परंतु सत्यजित तांबे यांनी एक वेगळीच खेळी करत आपण काँग्रेसचे असल्याचे दाखविण्यासाठी अपक्ष उमेदवारी केली आणि पाठिंबा भाजपाला मागितला. मात्र या राजकीय नाट्याने जिल्ह्यातील राजकारणावर मोठा विपरीत परिणाम होणार असून काँग्रेसची पीछेहाट तर भाजपची पकड आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या विचित्र घडामोडींमुळे आ. बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय वर्चस्ववाला देखील धोका निर्माण झाला आहे. एकूण राजकीय परिस्थिती पहाता व काँग्रेसची भुमिका बघता सत्यजित तांबे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता आहे.


खरे तर हा मतदारसंघ सुशिक्षित मतदारांचा मतदारसंघ आहे. परंतु यावेळी ज्या राजकीय घडामोडी घडल्या जे राजकीय डावपेच टाकण्यात आले ते राजकीय जाणकारांना देखील समजल्या नाही तर या सुशिक्षित मतदारांना कसे समजणार. ज्यांना काँग्रेस पक्षाने अधिकृत ए.बी. फॉर्म दिला त्यांनी अर्जच भरला नाही. अर्ज भरण्यासाठी इच्छूक असणार्‍या भाजप उमेदवाराला भाजपने ए.बी. फॉर्म दिला नाही. त्यामुळे या निवडणूकीत एकाही राजकिय पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात नाही. मात्र यात सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी करत स्वपक्षासह भाजपलाही अडचणीत आणले. खरेतर सत्यजित तांबेंना भाजपकडून उमेदवारी हवी होती. मात्र काँग्रेसने वडील डॉ. सुधीर तांबेंना उमेदवारी दिल्याने सत्यजित तांबेंची मोठी पंचायत झाली. मात्र यावर तोडगा म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवारी केली आणि मुलासाठी वडिलांनी माघार घेतली. परंतू या राजकिय खेळी आणि घडामोडीत काँग्रेसचे मात्र मोठे नुकसान झाले. थोरात कुटूंबातील विसंवादही यानिमित्ताने पुढे आला.


आ. बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेस पक्षात व हायकमांडकडे मोठे वजन आहे, त्यांच्या शब्दाला किंमत आहे. असे असताना त्यांच्याच कुटूंबात हे राजकारण घडल्याने आ. थोरात यांना स्वपक्षातच टिकेचे धनी व्हावे लागत आहे. पक्ष शिस्तभंग केल्याने डॉ. तांबे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार लटकली आहे. इकडे भाचा सत्यजित अपक्ष उभा आहे आणि विरोधी भाजप त्यांच्यावर डोळा ठेऊन आहे. अशा परिस्थितीत मामा असलेले आ. थोरात यांची मात्र मोठी अडचण निर्माण झाली आहे. गेल्या काहि दिवसांपासून जिल्ह्यात महसूलमंत्री विखेंचे प्राबल्य वाढू लागले आहे. थोरात समर्थकांवर महसूल विभागाकडून अनेक कारवाया देखील झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सत्यजित तांबे भाजपला जाऊन मिळाल्यास संगमनेरच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार आहे. सत्यजितच्या या भुमीकेला आ. थोरातांचाच आतून पाठिंबा आहे कि काय अशीही चर्चा तालुक्यात होऊ लागली आहे.


सत्यजित तांबे हे अभ्यासू व महत्त्वाकांक्षी नेते आहेत. त्यांनी या अगोदरही नगरमधून आमदारकीसाठी निवडणूक लढवली होती. दांडगा राजकिय अनुभवही त्यांच्या पाठीशी आहे. आता या पदवीधर मतदार संघात एकाही राजकिय पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात नसल्याने सत्यजित तांबे यांना भाजपचा व इतर मित्र पक्षाचा पाठिंबा मिळणार असल्याने सत्यजित तांबेंचा विधान परिषदेमधील प्रवेश सुकर होणार आहे. परंतू दुसरीकडे मात्र काँग्रेस पक्ष आणि बाळासाहेब थोरात यांची मोठी राजकिय अडचण निर्माण होऊन जिल्ह्यातील राजकारणावर दुरगामी परिणाम होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख