
नदी घाटाच्या अर्धवट कामामुळे नागरीकांना त्रास
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – मागील दिड वर्षाहून अधिक काळ प्रशासक असणार्या संगमनेर नगर पालिकेने गेल्या वर्षभरापासूून प्रवरा नदीकाठ परिसराचे सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. सदर काम कासवाच्या गतीपेक्षा ही कमी गतीने चालू आहे. यामुळे सकाळी फिरायला येणार्या नागरिकांची गैरसोय होत आहे. तर तेथील बांधकाम साहित्याची नासधूस होत आहे. या अर्धवट कामातून मार्ग काढताना ज्येष्ठ नागरीकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सदर काम तातडीने पुर्ण करावे अशी मागणी नागरीकांनी व पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
प्रवरा नदि घाट सुशोभीकरणाचे काम सध्या सुरू आहे. परंतु या कामाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. या बांधकामाचे साहित्य व वाळू, दगड, विटा रस्त्यावरच पडलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांची रस्त्याच्या आणि घाटाच्या मधून पाऊल वाटेवरून ये जा करावी लागत आहे. नगर पालिकेच्या विहीरी समोरच जमिनीत असलेली विहीर उघडी असून यावर लोखंडाचा पत्रा टाकलेला आहे. आणि याच पत्र्यावरून वृध्द, महिला आणि तरूणांना ये जा करावी लागत आहे.

नुकत्याच श्रीराम नववीच्या दिवशी मध्य प्रदेश इंदोर मध्ये एका मंदिरात राम जन्माच्या वेळी भाविकांनी मंदिरात गर्दी केल्याने मंदिरातील विहीरीवरील स्लॅब कोसळला होता. व त्यावर उभे आसलेल्या भाविकांवर काळाने झडप घातली आणि 36 भाविक विहीरीत पडून मृत्युमुखी पडले. याची पुनरावृत्ती होवू नये म्हणून पालिका प्रशासनाने काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच चालू असलेले बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून नदी घाट सुशोभित करावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
राज्यातील इतर नगरपरिषदेसह संगमनेर नगरपरीषदेवर प्रशासकीय राज मागील दिड वर्षांपासून सुरू आहे. न्यायालयाच्या प्रलंबीत खटल्यामुळे अजूनही सहा महिने निवडणूक होण्याची शक्यता नाही. पालीकेचा सर्व कारभार हे प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी व अधिकारी पाहत आहे. नागरीकांच्या अनेक तक्रारी व समस्या असतांना पालीकेत लोकप्रतिनिधी नसल्याने या अडचणी वेळेवर सुटत नाही. अनेकवेळा हेलपाटे मारूनही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. नविन कामे निघत नाही, जुने कामे वेळेवर होत नाही. असा कारभार किती दिवस चालणार असा प्रश्न नागरीक विचारत आहे.
