संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेर शहरातील अनेक पतसंस्थांची मातृसंस्था असलेल्या दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेत कोटयवधी रूपयांची आफरातफर झाली आहे. त्यामुळे ठेवीदारांनी आपल्या ठेवी काढण्यासाठी संस्थेत गर्दी केल्याने व कर्जदारांनी पतसंस्थेकडे पाठ फिरवल्याने ही नावाजलेली संस्था आर्थिक अडचणीत आली आहे. त्यामुळे येथील प्रशासनाला ही पतसंस्था काही दिवस बंद ठेवावी लागली आहे. संस्थेच्या अध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह अन्य चार कर्मचार्यांविरोधात संबंधित खात्याकडे तक्रार केली आहे. दरम्यान या पतसंस्थेची एकूण प्रगती पहाता व झालेला अपहार पाहता ठेवीदारांनी व सभासदांनी घाबरून जाऊ नये. काही दिवसातच सर्व परस्थिती पुर्व पदावर येणार असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षीत असून सर्वांना ते परत मिळतील अशी खात्री संस्था संचालकांनी व्यक्त केली.
संगमनेर तालुक्यातील एका राजकीय पदाधिकार्याने तीस वर्षांपूर्वी या पतसंस्थेची स्थापना केली होती. अत्यंत कमी कालावधीमध्ये ही पतसंस्था नावारुपास आली होती. दोन हजाराहन अधिक सभासद संख्या असलेल्या या पतसंस्थेचा विस्तार तालुक्यातील अनेक गावात झाला आहे. ग्रामीण भागात शाखा विस्तार करून या संस्थेने मोठे यश मिळवले आहे. जवळपास चार कोटी भाग भांडवल असलेल्या या संस्थेकडे सव्वाशे कोटींच्या ठेवी आहेत. या संस्थेने तब्बल 100 कोटींच्या कर्जाचे – वाटपही केलेले आहे. शहरात स्वतःच्या मालकीच्या जागेत संस्थेची भव्य इमारत आहे. अनेक संस्थांची मातृसंस्था असलेली ही पतसंस्था गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेली आहे. या पतसंस्थेमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याची दबकी चर्चा संस्थेच्या सभासदांमधून होत होती. संस्था पदाधिकारी व काही कर्मचार्यांनी पतसंस्थेत झालेला हा अपहाराची भरपाई करण्याचा प्रयत्न केला. काही कोटी रूपये संस्थेत भरले गेले. मात्र अजुनही काही कोटी रूपये भरणे बाकी आहे. मात्र याची चर्चा सभासदांमध्ये, कर्जदार, ठेवीदारांमध्ये पसरल्याने संस्थेचा आर्थिक व्यवहार अडचणीत आला. कर्जदारांनी पाठ फिरवल्याने व ठेवीदारांनी तगादा लावल्याने पतसंस्थेचे व्यवहार अडचणीत आले. तसेच अनेक कर्मचारी गैर हजर राहिल्याने पतसंस्था चालविणे अवघड बनले. त्यामुळे बुधवारी सकाळपासून अचानक या पतसंस्थेला टाळे लावण्यात आले. तसेच बाहेर सभासदांसाठी आवाहन करणारे फलक लावण्यात आले.
अनेक ठेवीदारांनी पतसंस्थेच्या कार्यालयासमोर गर्दी करून आमचे पैसे परत करा या मागणीसाठी ताटकळत बसले. यातील अनेक ठेवीदारांनी मुलीच्या लग्नासाठी, कुणाच्या अजारपणासाठी, कुणाच्या शिक्षणासाठी व इतर कारणांसाठी पैशाची निकड होती. मात्र पतसंस्थेलाच टाळे लागल्याने अनेकांची धांदल उडाली. त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
दरम्यान पतसंस्थेच्या अध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी संबंधित खात्याकडे तक्रार अर्ज दिला आहे. पतसंस्थेचे व्यवस्थापक व इतर चार कर्मचार्यां विरोधात तक्रार केली आहे.
शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या जीवावर पतसंस्था उभ्या राहतात व मोठ्या होतात. परंतू संचालक मंडळ, व्यवस्थापन यांच्या गैरकृत्यामुळे संस्था दिवाळखोरीत निघते. व त्यातून या ठेवीदार, सभासदांची आयुष्याची पुंजी मातीमोल होते. मात्र दुधगंगा पतसंस्थेत काही अफरातफर झाली असून संस्थेची एकूण प्रगती पहाता ठेवीदार सभासदांनी संयम ठेवावा, कर्जदारांनी कर्जफेड करावी तरच संस्था पुन्हा उभी राहू शकते. अन्यथा ही मोठी पतसंस्था अडचणीत येवू शकते. मात्र यातून धडा घेत संचालकांनी तसेच उपनिबंधक, लेखापरिक्षकांनी अशा संस्थाच्या आर्थिक हिशोबाकडे कानाडोळा करू नये, कुणाला पाठीशी घालू नये तरच सहकारातील या संस्था जीवंत राहू शकतील.