Friday, August 19, 2022

जयंती विशेष : अभ्यासू नेतृत्व स्व. तीर्थरूप भाऊसाहेब संतूजी थोरात दादा

थोर स्वातंत्र्यसैनिक,जेष्ठ गांधीवादी नेते,सहकार,शिक्षण,समाजकारण,राजकारण,अर्थकारण, बँकिंग, पर्यावरण, जलसिंचन अशा अनेक विविध क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व स्व. तीर्थरूप भाऊसाहेब संतूजी थोरात हे माझे वडील. आम्ही सर्वजण त्यांना ‘ दादा ’ म्हणायचो.


दादांच्याविषयी काही लिहिण्यापूर्वी आमच्या थोरात परिवाराचा इतिहास थोडक्यात नमूद करणे मला आवश्यक वाटते.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील सह्याद्री डोंगर रांगांच्या कुशीत असलेल्या रतनगडावरुन उगम पावणार्‍या ‘ अमृतवाहिनी ’ प्रवरा नदीच्या तीरावर वसलेले संगमनेर तालुक्यातील जोर्वे हे आमचे गाव. या गावात नदीच्या घाटावर एकमुखी दत्ताचे सुंदर पुरातन मंदिर आहे. जोर्वे गावाला फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. चालुक्य आणि यादव यांच्या काळातील ऐतिहासिक दस्तावेजांत जोर्वे गावाचा ‘जयुरेव ग्राम ’ असा उल्लेख आढळता. 1950 – 1951 साली येथे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने उत्खनन झाले. त्यात ताम्रपाषाणयुगीन मातीची भांडी आणि दगडाची हत्यारे मोठ्या प्रमाणावर सापडली. त्यातील अनेक अवशेष दिल्लीच्या पुरातत्व विभागाच्या संग्रहालयात आजही जतन करून ठेवलेले आहेत. इसवीसनपूर्व 1500 ते 2000 या कालखंडाशी या वस्तूंचा संबंध जोडला जातो. येथे विकसित झालेली संस्कृती जोर्वे संस्कृती या नावाने इतिहासात आणि पुरातत्वशास्त्रात ओळखली जाते.


महाराष्ट्राच्या ऐतिहासिक,सांस्कृतिक ,सामाजिक, राजकीय अशा क्षेत्रात अनेक परिवार पिढ्यानपिढ्या समाजात काम करतात. त्या परिवारांपैकी एक प्रमुख परिवार म्हणजे ‘ थोरात पाटील परिवार ’ या परिवाराची परंपरा वेगळीच आहे. पूर्वापार चालत आलेली कष्टाळू वृत्ती, सर्वधर्म समभावाची वागणूक, पुरोगामी विचार , अध्यात्मिकता , समाजाच्या भल्यासाठी सतत काम करण्याची समर्पण वृत्ती , आतिथ्यशीलता अशा नानाविध उत्तम गुणांनी संपन्न असलेला हा परिवार. नेतृत्वगुण हे या परिवाराचे खास वैशिष्ट ! उत्तम नेतृत्व एका दिवसात आकाराला येत नाही. नेतृत्वाची जडण-घडण होणे ही दीर्घकालीन प्रक्रिया असते. नेतृत्वाच्या जडण – घडणीसाठी कुटुंबातील, समाजातील अनेक घटना – घडामोडी कारणीभूत ठरतात. नैतिकतेचा इतिहास आणि वारसा असलेल्या या कुटुंबात नेतृत्वगुण परंपरेने विकसित आणि दृढ झालेले आहेत.


आमचे पंजोबा गंगाराम पाटील थोरात हे गावचे पाटील होते. त्यामुळे आघोनेच आमची पणजी मंजुळाबाई थोरात ही पाटलीन होती. पंचकृषीत हे दांपत्य प्रसिद्ध होते. परिसरात त्यांचा दबदबा आणि नावलौकिक होता. संपूर्ण गावाला सामाजिक धार्मिक, सांस्कृतिक ,राजकीय दृष्ट्या सांभाळून घेणारे जबरदस्त ताकदीचे हे दांपत्य होते. त्यांची कडक शिस्त, करडी नजर, शिक्षणाविषयीचे प्रगत विचार यातूनच त्यांचे सुपुत्र म्हणजे आमचे आजोबा संतुजी पाटील थोरात हे त्या काळात नाशिक येथे शिकून मॅट्रिक्युलेट झाले होते. त्यांचा विवाह जोर्वे गावच्या वाडी असलेल्या कोल्हेवाडी येथील जमीनदार तात्या पाटील दिघे यांची कन्या सीता हिच्याबरोबर झाला. त्या काळात हा विवाह सोहळा खूप गाजला होता. नवरदेवाची मिरवणूक हत्तीवरून काढली होती. माझी आजी सीता हिच्यासाठी येवल्यावरुन खास सोन्या चांदीच्या धाग्यात विणलेली पैठणी आली होती. बाजूबंद , कंबरपट्टा, कर्णफुले, केसांमध्ये कमळफुल असेच जुन्या काळात प्रचलित असलेले सोन्या-चांदीचे अंग भरून दागिने आजीला घातले होते. लग्नात रोख हुंडा दिला गेला नव्हता. परंतु आंदण ( कन्यादान ) म्हणून एक पांढरी घोडी आणि पावणे पाच एकर जमीन आजीला दिली होता. अशा या दांपत्याच्या पोटी 12 जानेवारी 1924 रोजी माझे वडील भाऊसाहेब थोरात (दादा ) यांचा जन्म झाला.
दादा आणि त्यांची सर्व भावंडे विलक्षण बुद्धिमान. आजोबा संतुजी पाटील पुरोगामी विचारांचे होते. कालबाह्य रूढी-परंपरा त्यांना मान्य नव्हत्या. जातीपातींचे भेद धर्मभेद हे देखील त्यांना अजिबात मान्य नव्हते. त्यांच्या स्पष्ट वागण्यातून आणि कृतीतून सर्व परिवार घडत गेला. दादांचे शिक्षणही नाशिकला बोर्डिंगमध्ये राहून झाले. तेसुद्धा मॅट्रिकपर्यंत शिकले.


महात्मा गांधींच्या 1942 च्या ‘ चले जाव ’ आंदोलनात विद्यार्थीदशेतच ते सहभागी झाले होते. अण्णासाहेब शिंदे, रावसाहेब शिंदे ,कॉ.पी.बी कडू पाटील, धर्माजी पोखरकर या त्यांच्या सहकार्‍यांबरोबर त्यांनी स्वत:ला स्वातंत्र्य चळवळीत पूर्णपणे झोकून दिले होते. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळळीकडेे या सर्वांचाच विशेष ओढा होता आणि अशा स्वरूपाच्या समाज रचनेसाठी झटायचे त्यांचे ध्येय होते. कम्युनिझम , कार्ल मार्क्सचे विचार जगातील विचार विविध देशांत घडलेल्या क्रांत्या, त्यांचा अभ्यास करत होते. त्या संबंधाने त्यांचे अखंड वाचन चालू होते.
दादांचे लग्न कोल्हेवाडीच्या दिघे पाटील परिवारातील त्यांची मामेबहीण मथुराबरोबर ठरले. लग्न ठरले पण दादांनी सर्वांना निक्षून सांगितले की मला सत्यशोधक पद्धतीने लग्न करायचे आहे. सर्वजण दादांना म्हणत होते की तुझ्या आई वडिलांचे लग्न किती थाटामाटा झाले. तशाच थाटा माटात तुझे आणि मथुराचे लग्न करू. परंतु दादांनी आपला हट्ट सोडला नाही. लग्नात कोणताही अवास्तव खर्च करायचा नाही. नवे कपडे दागिने यांची खरेदी करायची नाही. असेही त्यांनी बजावले. शेतावरच्या गड्याचे नुकतेच लग्न झाले होते. त्याचेच कपडे दादांनी घातले. माझ्या आजीच्या लग्नाची साडी आजीला दिली. आणि ठरवलेल्या पद्धतीने लग्न केले अशा प्रकारच्या पुरोगामी विचारांनी भारून गेल्यामुळे स्वातंत्र्यचळवळीत सहभागी चालू असतानाही त्यांनी शिक्षण चालूच ठेवले. अशातच 21 जानेवारी 1945 रोजी दादांच्या आईचे साथीच्या आजाराने अकाली निधन झाले. त्यावेळी दादांची भावंडे खूपच लहान होती. या अपघातातून पुरते सावरले नाही तोच 1946 सालच्या प्रवरेच्या महापूराने शेतीवाडी, पीके, घरदार संपूर्ण उद्ध्वस्त करून टाकले. कुटुंबावर संकट मागून संकट येत असतानाही दादांनी सर्व भावंडे ,वडील आणि कुटुंबातील सर्वांना सांभाळून स्वातंत्र्याच्या चळवळीतील आपला सहभाग चालू ठेवला. इंग्रजांना नाना प्रकारे त्रास देवून सळो कि पळो करण्याचे काम दादा आणि त्यांचे सहकारी करीत असत. भूमिगत राहून हे काम चालायचे. इंग्रज पोलिस त्यांना शोधण्यासाठी वस्तीवर घरी आले तर माझी पणजी पोलिसांच्या गळ्यात पडुन रडायला लागायची आणि त्यांना म्हणायची ‘‘ माझ्या गळ्यातील सोन्याचा पुतळ्याा, माझी व-ाटीक तुम्हाला घ्या पण माझ्या सोन्यासारखा नातू भाऊसाहेब तुम्ही कुठे पकडून ठेवला असेल तर तो आणून द्या.’’ पोलीसांना हे सर्व खरे वाटायचे आणि ते निघून जायचे. कधी दादा घरी असले आणि अचानक पोलीस येत असल्याची खबर लागली कि पणजी त्यांना नऊवारी साडी नेसून, डोक्यावर पदर घेवून भांडी घासायला बसवले. पोलीस आले त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतु नऊवारी साडीतील व्यक्ती दादा आहेत हे त्यांना समजलेच नाही. आणि आल्या पावली निघून गेले. दादांच्या चळवळीतील सहभागाच्या अशा खूप गमतीजमती पणजी सांगायची. अर्थात काळाच्या ओघात दादांना आणि त्यांच्या सहकार्यांना अटक झालीच. आणि त्यांना कारावासही झाला.


नाशिकच्या कारागृहातील 15 महिन्यांचा कारावास हा दादांची वैचारीक बैठक पक्की होण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा ठरला. नाशिकच्या कारागृहात त्यांच्यासमवेत अण्णासाहेब शिंदे, रावसाहेब शिंदे, पी.बी.कडू पाटील, धर्माजी पोखरकर हे देखील होते. अण्णासाहेब त्या सर्वांमध्ये येष्ठ होते . कारागृहात त्यांनी अभ्यास मंडळ सुरू केले. अनेक पुस्तकांचे सामुदायिक वाचन केले. त्यात प्रामुख्याने रजनी पामदत्त यांचे ‘ सोशॅलिझम ते फॅसिझम ’ कार्ल मार्क्सचे ‘ कम्युनिस्ट मॅनिफेस्टो ’ आणि एडगर स्नो यांचे रेड स्टार ओव्हर चायना या पुस्तकांचा दादांच्या विषयावर खूप प्रभाव पडला असे दादा सांगत.


देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.शेतकर्‍यांच्या,कष्टकर्‍यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणायचे हे ध्येय उराशी बाळगून दादांनी सहकाराचा मार्ग निवडला. शेतकर्‍यांना, कष्टकर्‍यांना, विडी कामगारांना त्यांनी संघटित केले. सावकारशाही विरुद्ध संघर्ष उभारला. ‘ सहकारातून समृध्दी ’ हा विचार सतत डोळ्यापुढे ठेवून त्यांनी आयुष्यभर समाजासाठी स्वत:ला वाहून घेतले.


वयाच्या 18 व्या वर्षापासून 86 व्या वर्षापर्यंत स्वातंत्र लढ्यापासून ते दंडकारण्य अभियान पर्यंत मधली 68 वर्षे दादांनी न थकता,विश्रांती न घेता शेतकर्‍यांसाठी शिबिरे,मोर्चे,आंदोलने, लोकचळवळी आयोजित केल्या. जोर्वे गावच्या सोसायटीच्या अध्यक्षपदापासून ते महाराष्ट्र राय सहकारी बँकेच्या ( शिखर बँकेच्या ) अध्यक्षपदापर्यंत सहकारातील अनेक पदे त्यांनी भूषविली. 1978 ते 1980 या दीड वर्षाच्या कालावधीत त्यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व म्हणून आमदारपदही भूषवले. परंतु सत्तेच्या राजकारणात त्यांचे मन फारसे रमले नाही. त्यांचा सहकार क्षेत्रातील प्रवास मात्र अखंड चालू राहिला.


या 68 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अक्षरश: झपाटल्यासारखे काम केले. आम्ही त्यांना शेतीची कामे करताना पाहिले. कार्यकर्त्यांच्या गोतावळ्यात पाहिले. गावपातळीपासून राय आणि देश पातळीवरील संस्थांमध्ये पदे भूषवितांना पाहिले. मात्र या सर्व वाटचालीत त्यांनी आपली तत्वे आणि मूल्ये यांची कटाक्षाने जपवणूक केली.
आम्ही दादांना कधीही उशिरापर्यंत झोपलेल,उशिरा उठलेले पाहिले नाही. नेहमीच उत्साहात व्यवस्थित, टापटिपीत, आवरलेलेच पाहिले. स्वातंत्र्याच्या चळवळीत महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित झाल्याने दादांनी आयुष्यभर खादीचेच कपडे वापरले. खादीचा शर्ट, धोतर, टोपी, रुमाल असा त्यांचा साधा पेहराव असे. मात्र तो कमालीचा टापटीप आणि स्वच्छ. खूप कपडे घेणे त्यांना पसंत नसे. बर्‍याचदा शर्ट, धोतर फाटले तर आमच्याकडून हाताने रफु करून घेत. चप्पल तुटली तर शिवून पुन्हा वापरीत. 2 चपलांचे जोड त्यांनी कधीच घेतले नाही. साखर कारखान्याच्या उभारणीच्या कालखंडात पुण्याला मिटींगला गेले तर घरून जेवणाचा डबा म्हणजे चपाती, गुळ – तुपाचा मलिदा, लोणच्याच्या फोडी. ते गाडीतच डबा खात आणि गाडीतच विश्रांती घेत. पण हॉटेलमध्ये जात नसत. सहकाराच्या उभारणी त्यांना खूप कष्ट पडले. परंतु त्यांची दूरदृष्टी, जिद्दद्द, चिकाटी यामुळे एवढ्या संस्था उभ्या राहिल्या. कारखान्याच्या गेस्ट हाऊसला त्यांनी कडक शिस्त घालून दिली. आजही त्या गेस्ट हाऊसला बाहेरचे कोणी पाहुणे आले तर चहा,नाश्ता,जेवण मिळते. सहकारात त्यांनी रुजविलेली आर्थिक शिस्त, काटकसर, बचत आजारी अबाधित आहे. परखडपणा आणि स्पष्टोक्तेपणा त्यांचा स्थायीभाव होता.


दादांनी सुरू केलेल्या सहकारी संस्था, शैक्षणिक संकुल, यांच्या उभारणीत यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण आणि स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासाठी वरदान ठरलेले सौ मथुराबाई भाऊसाहेब थोरात ( एस एम बी टी ) हॉस्पिटल त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या एकसष्टी निमित्ताने स्थापन केले. संगमनेर तालुका हा कायम दुष्काळी व पर्जन्यछायेच्या प्रदेशात असल्याने शेतीला शाश्‍वत जोडधंदा म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना दिली. त्यासाठी गावोगाव दूध सोसायट्या स्थापन केल्या. त्यामुळेच आज तालुक्यात दूध संघाकडे रोज 4 लाख लिटर दुधाचे संकलन होत आहे. शेतकर्‍यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटार ची विज बिल आकारणी पूर्वीच्या मीटर नुसार व्हायची. ही पद्धत बदलण्यासाठी दादांनी ‘ मीटर हटाव ’ आंदोलन केले. विजेचे मीटर डोक्यावर घेऊन हजारो शेतकर्‍यांसह त्यांनी वीज मंडळाच्या कार्यालय मुंबई येथे मोर्चा काढला. त्या लढ्याला यश येवून महाराष्ट्रात हॉर्सपॉवर नुसार वीज बिलाची आकारणी करण्याची पद्धत लागू झाली. कर्जावरील व्याजाचे दर कमी करावेत यासाठी दादांनी रिझर्व्ह बँकेवर ‘ टिकुर मोर्चा ’ काढला. हजारो शेतकरी डोक्याला टापसे बांधून आणि हातात टिकूरे ( काठ्या ) घेऊन मुंबईला रिझर्व बँकेच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन गेले. रिझर्व बँकेच्या आजवरच्या इतिहासात बँकेवर निघालेला हा शेतकर्‍यांचा पहिला मोर्चा होता. दादांचा हा लढाही यशस्वी झाला. अशी कितीतरी लढे, मोर्चे, आंदोलने त्यांनी शेतकर्‍यांच्या, कामगारांच्या प्रश्‍नासाठी केले. डाव्या विचार सरणीचे असल्यामुळे संघर्ष हा त्यांच्या नसानसांत भिनलेला होता मात्र त्यांचा संघर्ष समाजाला रचनात्मकतेकडे घेऊन जाणारा होता. दादांनी उभा केलेल्या सहकार त्यांनी आयुष्यभर तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपला. महाराष्ट्रात अन्यत्र अनेक कारणांनी सहकार मोडकळीस आली असतांना संगमनेर तालुक्यातील सहकार उत्तरोत्तर अधिक होत आहे. याचे कारण म्हणजे त्यांची दूरदृष्टी आणि कार्यक्षम व्यवस्थापन हे होय. त्यासाठी त्यांनी त्यांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली. सहकारात काही देण्यासाठी यावयाचे तेथून घेण्यासाठी नाही हे तत्त्व त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनात रुजवल. त्यामुळे एवढ्या मंदीतही संगमनेराच सहकार दिमाखात टिकून आहे. देशातील सर्व नामवंत बँकांनी संगमनेर येथे आपल्या शाखा सुरू केल्या आहेत. सहकारी पतसंस्थांची खूप मोठे जाळे संगमनेर तालुक्यात निर्माण झाले आहे. त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला अर्थसाह्य उपलब्ध होऊन तो व्यवसायीक झाला आहे. दादांनी दिलेल्या बचतीच्या आणि काटकसरीच्या शिकवणीमुळे आज मितीस येथील पतसंस्थांमध्ये 2 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी जमा आहेत. बाहेरच्या तालुक्यातील,जिल्ह्यातील अनेक व्यावसायिक संगमनेरमध्ये येवून आपला व्यवसाय सुरु करुन येथे स्थानिक होतात. याचे मुख्य कारण म्हणजे येथील सदृढ अर्थकारण, सामाजिक सलोखा. येथे कोणताही राजकीय दबाव नाही.निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनने आलेल्या पाण्यामुळे येथील पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपाचा सुटला आहे.
संगमनेरच्या साखर कारखाना आणि दूध संघ यामुळे येथे मोठी आर्थिक समृद्धी आलेली आहे. दिवाळीच्या काळात येथील सहकारी संस्थांच्या माध्यमातून 200 ते 250 कोटी रुपये बाजारात येतात भाजीपाला फळे प्रामुख्याने टोमॅटो ,कांदा ,डाळिंब यातून रोज जवळ जवळ 5ाोटी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे येथील बाजारपेठ वर्षभर फुललेली राहते.


येथील शैक्षणिक संकुलात सुमारे 30 हजार विद्यार्थी शिक्षण घेताहेत. बालवाडीपासून तर पदव्युत्तर परीक्षा पर्यंत सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या सुविधा येथे उपलब्ध आहेत. इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय शिक्षणाच्या अत्याधुनिक सुविधा येथे दादांनी निर्माण करून दिल्या आहेत. स्व. वसंतदादा पाटील यांच्या शैक्षणिक धोरणातून मार्गदर्शन घेऊन दादांनी शिक्षण संस्थांची निर्मिती केली. आजवर हजारो इंजिनियर्स येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिकून बाहेर पडले आहेत. मोठमोठ्या हुद्यावर जगाच्या कानाकोपर्‍यात ते कार्यरत आहेत. शिक्षणाची गंगाच दारात अवतीर्ण झाल्यामुळे घराघरात डॉक्टर आणि इंजीनिअसर शिकून तयार झाले आहेत. यातून हजारो कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. त्याचा आनंद , उत्साह आणि तेज त्यांच्या चेहर्‍यावर अखेरपर्यंत दिसत होते.


दादांकडे दूरदृष्टी बरोबरच विलक्षण कल्पकता होती. त्यांनी येथील साखरेला व दूधाला ‘ राजहंस ’ चे नाव दिले. इंजिनिअरींग कॉलेजला ‘ अमृतवाहिनी ’ हे नाव दिले. इंजिनिअरींगच्या मेकॅनिकल विभागाला ‘द्रोणागिरी ’ हे नाव देवून कॉलेजच्या दर्शनी भागाला द्रोणागिरी घेवून उड्डाण करणाच्या हनुमानाचे भव्य चित्र चितारले. या इमारतीच्या उद्घाटनासाठी त्यांनी हरिभक्त परायण नारायण गिरी महाराज यांचे प्रवचन ठेवले. यावेळी केलेल्या भाषणात दादांनी सांगितले की हनुमान हा पृथ्वीवरील पहिला अभियंता आहे कारण त्याने समुद्रास सेतू बांधला. हुमानाच्या उड्डाणासारखीच विद्यार्थ्यांनीही त्यांच्या आयुष्यात उंच भरारी घ्यावी.


दादांना खूप सुंदर नावे सुचत. त्यांनी होस्टेलच्या इमारतींना गड, पर्वत ,नद्या यांची नावे दिली आहेत. सह्याद्री शिक्षण संस्थेस त्यांनी सह्याद्री पर्वताचे नाव दिले. शिक्षण संस्थेचे तालुक्यात 29 विद्यालय युनिअर कॉलेज आणि 3 प्राथमिक विद्यालय आहे. खेड्यापाड्यातील दुष्काळी भागातील मुलांना वि-ाान शाखेचे शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी तालुक्यातील बहुसंख्य माध्यमिक विद्यालयांना जोडून वि-ाान शाखेची युनिअर कॉलेज सुरु केली. वयाच्या 84 व्या वर्षी दवाखान्यात ऍडमिट असताना त्यांनी तळेगाव सारख्या दुष्काळी भागात सीनियर कॉलेज सुरू करून त्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या विशेषत्वाने विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणाची सोय केली.


आम्ही दादांच्या रोजच्या आचरणातूनच घडलो. स्वत:ची कामे स्वत: केली पाहिजेत. साधे कपडे वापरले पाहिजे.चपलांचा एकच जोड पाहिजे, अशी त्यांची शिकवण असायची. साध्या राहणीवर त्यांचा भर असे. आमचे बंधू बाळासाहेब थोरात हे एकुलते एक चिरंजीव व आम्ही चार बहिणी परंतु आम्हा सर्व बहिण भावांना समान वागणूक होत. त्यांचे अजिबात लाड नव्हते. दादांना आम्ही सर्वजण खूप घाबरत असत. त्यांचा आदरयुक्त धाक आम्हाला होता. आम्ही शेतात सुद्धा काम केले पाहिजे त्याच्या खांद्यावर सर्वांनी काम केले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे आम्ही सर्व बंधू भगिनी शेतीच्या कामात तरबेज झालो तर ट्रॅक्टर चालवणे, नांगरणी करणे ,गाई म्हशींच्या धारा काढणे ही सर्व कामे सहजपणे करू शकतात. वस्तीगृहात राहत असताना सुट्टी लागल्यानंतर आम्हाला एसटी बसने जावे लागे. सर्व समान घेवून एसटीने जोर्व्याला जावे लागायचे. तेथून वस्तीवर नेण्यासाठी बैलगाडी आलेली असे. दादांच्या कठोर शिस्तीमुळे कोणीच काही बोलत नसत. वस्तीगृहातील जेवण्यासाठी त्यावेळी महिन्याला पन्नास रुपये खर्च यायचा. दादा तेवढेच पैसे देत पिक्चर हॉटेलिंग साठी मी पाच रुपये जादा मागायचे. पण ते देत नसत खूप आढेवेढे घ्यायचे नाही म्हणायचे.


मी होस्टेलला राहून शिकत होते. इयत्ता नववीत शिकत असताना प्रसंग त्यावेळी मीनाकुमारीचा पाकीजा चित्रपट गाजलेला होता चित्रपटातील पाकीजा ड्रेसची फॅशन त्यावेळी जोरात प्रचलित झाली होती. दिवाळीच्या सुट्टी दिवाळीसाठी कपडे घेण्याकरता दादांनी आम्हाला दुकानात गेले मी म्हटले दादा मला पाकीजा ड्रेस घ्यायचा आहे. त्याची किंमत 80 रुपये होती दादा म्हणाले दुर्गा तुम्हाला एवढे महाग कपडे मी घेऊ शकत नाही. त्यांनी 25 रुपयांचा फ्रॉक घेऊन दिला. माझी पाकीजा ड्रेस घालायचे हाऊुस मी मैत्रिणीच्या पाकीजा ड्रेस घालून केली. वर्षातून दोनच ड्रेस आम्हाला घेतले जायचे. त्यापेक्षा जास्त नाही. हातात काचेच्या बांगड्या, कपाळाला कुंकू साधी साडी ,चेहर्‍यावर कसलाच मेकअप नाही असे आमचे राहणे म्हणजे आम्ही जेवढ्यास तेवढा त्यांना जास्त आनंद वाटेल. सोने वापरलेले त्यांना अजिबात आवडत नसत त्यांनी स्वत: देखील उभ्या आयुष्यात आंगठी देखील बोटात घातली नाहा. माझ्या आईला सुद्धा त्यांनी कधीच सोने घेतले नाही. आईला देखील आयुष्याच्या अखेरपर्यंत 3 साड्या होत्या 2 दररोज वापरासाठी आणि 1 कोठे बाहेर जाण्यासाठी. दादांना 6 – 7 शर्ट रुमाल असायचे. त्यांच्या प्रवासाची बॅग नेहमी भरलेली असायची कारण कामाच्या निमित्ताने त्यांना कायमच पुणे, मुंबई ,दिल्ली जावे लागत असे. दादा गेले तेव्हा त्यांची कपड्याची बॅग एवढे त्यांचे सामान होते.


दादा आम्हा भावंडांना,नातवंडांना डोंगरावर फिरायला नेत. उन्हाळ्यात करवंदे खाण्यासाठी करवंदाच्या जाळ्यांतून फिरवत. समुद्र, बंदर बघायला नेत. मी कॉलेजला असताना स्मिता पाटील चा ‘ मंथन ’ चित्रपट भक्ती बर्वे चे ‘ ती फूलराणी ’ हे नाटक खूप गाजत होते. दादांनी मला तो चित्रपट आणि ते नाटक आवर्जुन पाहण्याचे सांगितल. दादांना वाचनाची खूप आवड होती. जोर्वेला आमच्या लहानपणी तुळशीच्या ओट्यावर सामुदायिक वाचन होत असे. दिवसभराची शेती काम आवरल्यानंतर संध्याकाळी सर्वजण एकत्र बसतात त्यामुळे साने गुरुजींची ‘ श्यामची आई ’ , व्यंकटेश माडगूळकरांची ‘ बनगरवाडी ’ या व इतर अनेक पुस्तकांचे सामूहिक वाचन होई. वाचण्यासाठी वस्तीवरील माणसांची आळीपाळीने निवड केली जाई. दादांचे वकृत्व खूप सुंदर होते. सहज सोप्या आणि ओघवत्या भाषेत भाषण करीत त्यांचे भाषण म्हणजे त्यांनी साधलेला सुंदर संवाद असे भाषण आकडेवारी व्यक्तींची स्थळांची नावे एक वर्ष इत्यादी माहिती परिपूर्ण भ्यासपूर्ण से यांचे कथाकथन तर ऐकतच राहावेसे वाटे. आपल्याला भाषणांमधून दादा खूप दूरदृष्टीच्या संकल्पना मांदत आणि त्यांच्या काही संकल्पना तर अशा असत की त्या ऐकणार्‍याला जोर्वे आमच्या घरी आजोबांच्या काळापासून कौटुंबिक ग्रंथालय होते. स्वामी विवेकानंद यांचे ग्रंथ फ्रेंच रायक्रांती ही पुस्तके त्या ग्रंथालयात होती. आज थोरात परिवाराकडे ग्रंथालय आहे. भाऊ बाळासाहेब थोरात,त्यांची कन्या, चिरंजीव राजवर्धन या सर्वांनाच वाचनाची आवड आहे. वाचनातून विचार समृद्ध होतात आणि व्यक्तिमत्व विकसित होते असे दादा म्हणत. सहकाराची उभारणी सुद्धा दादांना स्वातंत्र्य चळवळीत त्यांना झालेल्या तुरुंगवासाच्या काळातील अभ्यास मंडळातून आणि सामुदायिक वाचनातूनच सुचली.


दादा जसे चांगले वाचक होते तसे ते चांगले लेखकही होते. त्यांनी त्यांचा जीवनपट ‘ अमृतमंथन ’ आणि ‘ अमृतगाथा ’ या आत्मचरित्रांमधून शब्दबद्ध केलेला आहे. रोज पहाटे उठून ते लेखन करायचे मला वाचायला द्यायचे लेखनात नावे गावे स्थळ-काळ-वेळ याची तपशिलाने माहिती दिलेली आहे ये दादा जात-पात मानत नसत इतर कोणी जातपात मानली तर ते त्यांना रागावत असत त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गोतावळ्यात सर्व जाती-धर्माची माणसे आहेत. ते सर्वांच्या घरी जेवण करत. कधीकधी तर एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जेवण बनवायला सांगत. स्वातंत्र्य चळवळीत ते संगमनेर अकोले तालुक्याच्या डोंगरदर्‍यात पायी फिरल्यामुळे त्यांचा दोन्ही तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीचा दांडगा अभ्यास होता. तालुक्यातील डोंगर , नद्या, उपनद्या यांची त्यांना खडा न खडा माहिती होती. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात त्यांनी डोंगरदर्‍यात रात्री-बेरात्री भटकंती केली त्या काळात त्यांना जेवण दिलेल्या ठाकर आदीवासी कार्यकर्त्यांच्या दादांनी अखेरपर्यंत विसर पडू दिला नाही. कधी कधी ते स्वत: या कार्यकर्त्यांना भेटायला जात कधी ते कार्यकर्ते त्यांच्याकडे आले त्या दादा त्यांचे मनापासून आदरातिथ्य करीत पाहुण्यांचे उत्तम आदरातिथ्य करणे हा दादांचा आवडता छंद होता.


वयाच्या 83 व्या वर्षापासून वार्धक्यामुळे आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे दादा घरी थांबत मात्र संध्याकाळी चार ते सात वाजेपर्यंत ते गावागावांत सहकारी संस्थांमध्ये शैक्षणिक संकुलात चक्कर मारुन येत. महत्प्रयासाने उभ्या केलेल्या दिमाखदार संस्थांकडे डोळे भरून बघत. प्रत्येक सहकारी संस्थेच्या अधिकार्‍याकडून दैनंदिन कामकाजाचे फोनद्वारे आढावा घेत. निळवंडे धरण पूर्ण करणे हा त्यांचा ध्यास होता धरण पूर्ण झाल्याने त्यांच्या स्वप्नपूर्ती झाली होती. धरणाचा फोटो त्यांनी आपल्या बेडरूममध्ये सतत समोर दिसेल अशा पद्धतीने लावला होता.


संगमनेर तालुक्यातून प्रवरामाई वाहते परंतु प्रवरेचे पाणी उचलण्याचा शेतकर्‍यांना अधिकार नव्हता दादांनी त्यासाठी खूप संघर्ष केला. संगमनेर – अकोले तालुक्यातील हक्काचे 30 टक्के पाणी मिळवले. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राय सहकारी बँकेच्या माध्यमातून अर्थपुरवठा करून प्रवरा नदी वरून वैयक्तिक सहकारी आणि सामुदायिक पाणीपुरवठा योजनांचे मोठे जाळे तयार केले आणि हा तालुका सुजलाम सुफलाम बनवला. तालुक्यात निर्माण झालेली हिरवाई ते अखेरपर्यंत गाडीने फेरफटका म्हणून,डोळे भरून बघत.त्यांना निसर्गाची खूप आवड होती. शेतकर्‍यांच्या जीवनात सहकार्यामुळे आणि पाण्यामुळे समृद्धी आलेली आहे. शेतात शेतात उभे राहिलेले सुंदर बंगले त्यांच्यापुढे असली हिरवीगार बगीचे, आंबे नारळाच्या झाडांनी भरलेल्या फळबागा, सर्वच हिरवाई न्यालेले शिवार पाहून त्यांना खूप आनंद होत अस. एक होता कार्व्हर हे वीणा गवाणकर यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या अत्यंत आवडते पुस्तक. ते पुस्तक त्यांनी पुन्हा पुन्हा वाचून काढले होते.

असेच एकदा मी त्यांच्याकडे गेले असतांना त्यांना ते पुस्तक वाचून नोस्टस काढतांना पाहिले. मला आश्‍चर्य वाटले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांना नोटर्स हव्या कशाला असा प्रश्‍न पडला मी दादांना विचारले त्यांनी सांगितले का, आलीकडे वृद्धपकाळामुळे मला काही नावा गावांचे, घटना , प्रसंगांचे विस्मरण होते म्हणून मी नोट्स काढत आहे. मी तच चकीतच झाले. स्व. आमदार राजीव राजळे माझा भाचा ‘झाडे लावणारा माणूस’ हे त्याचे आवडते पुस्तक होते. मी ते पुस्तक आणले आणि दादांना दिले. मी म्हटले दादा हे पुस्तक जरूर वाचा. पण त्या काळात दादा जिल्हा सहकारी बँकेचे क्रेडिट कार्ड देण्याच्या विचाराला विरोध करण्याच्या कामात होते. शेतकरी कर्जबाजारी होतील म्हणून क्रेडिट कार्ड देण्यात येऊ नये अशी त्यांची भूमिका होती. त्या कामाच्या गडबडीत दादांनी ते पुस्तक वाचलेच नाही. बॅेकेला दादांची भूमिका मान्य झाली आणि निर्णय रद्द झाला. त्यानंतर उसंत मिळताच त्यांनी ‘झाडे लावणारा माणूस’ ही पुस्तिका काढली आणि त्यांच्या घरी बोलावले. आणि सांगितले कि हे पुस्तक वाचून माझ्या डोक्यात चमक उठली. आता आपल्याया संगमनेर तालुक्यात 1 कोटी झाडे लावायची आहेत. हे ऐकून आम्ही स्तंभित झालो. हे कसे शक्य आहे हा प्रश्न आम्हाला पडला. पण मला दादा मात्र त्या दिवशी त्या कामात गर्क झाले.


दादांनी दुसर्‍या दिवशी पुन्हा प्रमुख लोकांची मीटिंग बोलावली. नामदार बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे सर्व संस्थांचे पदाधिकारी अधिकारी यांना एकत्र बसवले. स्वत: कागद-पेन घेऊन बसले. तालुक्याचा नकाशा समोर ठेवला. स्वातंत्र्यलढ्यात तालुकाभर खूप भ्रमंती केलेली असल्यामुळे तालुक्याची भौगोलिक परिस्थिती त्यांना पुर्णपणे माहीती होती. त्यांनी नकाशा पुढे ओढून पेन त्याचे आठ विभाग केले पर्यावरण यावर गाणी ऐकण्यासाठी तालुक्यातील शाहीर कवी यांना बोलावले व गाणी राहण्यास सांगितले गायकांनी ती गाणी तालासुरात जाण्यास सुचवले. वादकांना संगीतांची साद द्यावयास सांगितले, शाहीर, कवी गायक, वादक यांचे 8 गट करून प्रत्येक विभागासाठी एका गटाची नियुक्ती केली.
तो दिवस होता 27 मे 2006 कार्यकर्त्यांना पिवळा टी-शर्ट, उपरणे, पट्टा ,ड्रेस महिलांना पिवळी साडी असा पोशाख ठरला. बि कोठे मिळणार याची सर्व माहिती घेऊन नागरिकांना,कार्यकर्त्यांना, विद्यार्थ्यांना कडुलिंब, जांभूळ, सीताफळ ,करवंदे, आंबा यांच्या बिया जमा करण्यास सुचवले. त्या बीया एका ठिकाणी जमा करून त्याची वर्गवारी करण्यासाठी माणूस व ठिकाण नेमूण दिले. काही बिया बियांपासून दुकानातून खरेदी केल्या. जुलैच्या पहिल्या आठवड्यात वृक्षारोपण या अभियानाला सुरुवात केली.

thora


या अभियानाला दादांनी ‘दंडकारण्य अभियान ’ असे समर्पक नाव दिले. पहिल्या वर्षी गावोगावी कार्यकर्ते ,नागरिक, विद्यार्थी ,संस्था या सर्वांनी मिळून साडेचार कोटी बियांचे रोपण केले. ड्रेस कोड स्वत:चा जेवणाचा डबा, पाण्याची बाटली घेऊन सर्वजण आनंदाने गाणी म्हणत उत्साहाने बीजारोपण करीत होते.
संपूर्ण तालुकाभर बीजारोपणाची ही लोक चळवळ बनली. बीजारोपण झाल्यानंतर दादाने मोठा भव्य ‘आनंद मेळावा’ घेतला. पुढे दरवर्षी या विभागात गावात जास्त बीजारोपण ,वृक्षारोपण या विभागात गावात आनंद मेळावा घेण्याची प्रथा निर्माण झाली. आयुष्याची अखेरची 8 वर्षे दादांनी दंडकारण्य या अभियानाचा ध्यास घेतला. आजपर्यंत या अभियानांतर्गत 25 कोटी बिया आणि 17 लाख रोपांचे रोपण करण्यात आले. तब्येत साथ देत नसतानाही दादांनी अभियानासाठी डोंगरावर जात, त्यातच ते आजारी पडले आणि त्या आजारातून कधीच बरे होऊ शकले नाही. त्यांना दवाखान्यात ऍडमिट केले असताना केलेले असताना भेटायला आलेल्या प्रत्येकाकडे ते साखर कारखाना, दूध संघ ,शैक्षणिक संस्था, दंडकारण्य अभियान याची विचारपूस करीत असत. दंडकारण्य अभियानाला आज 14 वर्षे पूर्ण झाली आहेत्. एकच कोटी काय पण त्यापेक्षा कितीतरी अधिक झाडे आज संगमनेर तालुक्याच्या डोंगरदर्‍यांमध्ये दिमाखाने भरलेली दिसत आहे. दादांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या या दंडकारण्य अभियानायाची जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाने नोंद घेतली आहे.


अखेरच्या श्वासापर्यंत दादा सहकार, शिक्षण, पर्यावरण या विषयाचे चिंतण, मणन करत राहीले. त्याच विषयावर विचार करीत राहिले, बोलत राहिले. आपले आयुष्य त्यांनी सर्वसामान्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी वेचले.आपल्या कर्तृत्वाने आणि नेतृत्वाने हजारो,लाखो लोकांच्या मनावर त्यांनी अधिराय केल.‘जाणता राजा ’ कसा असतो याचे मूर्तीमंत दर्शन लोकांना दादांच्या व्यक्तिमत्वातून आणि जीवन वाटचालीतून घडले.

दिनांक 14 मार्च 2010 रोजी दादांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांचे कार्य ‘बापसे बेटा सवाई ’ या उक्तीनुसार रायाचे महसूलमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात यांनी अव्याहतपणे पुढे चालू ठेवले आहे. दादांनी निर्माण केलेली परंपरा जपण्याचे, सर्व संस्था डोळ्यात तेल घालून सांभाळण्याचे कार्य महाराष्ट्राचे राजकारण सांभाळून नामदार बाळासाहेब करत आहेत. दादांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आमदार डॉ. सुधीर तांबे,सत्यजीत तांबे आणि थोरात – तांबे परिवार समर्थपणे पुढे चालवीत आहे.
या लेखाच्या निमित्ताने मला दादांच्या आठवणी पुन्हा जागवण्याची संधी मिळाली. दादांना माझे विनम्र अभिवादन !

सौ. दुर्गा सुधीर तांबे
नगराध्यक्षा, संगमनेर
नगरपरिषद, संगमनेर
98225 53254

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

डोक्याला पिस्तुल लावत जीवे मारण्याची धमकी

काँग्रेस नेते सुरेश थोरात यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखलसंगमनेर (प्रतिनिधी)सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकूर टाकून बदनामी करतो म्हणून...

नैसर्गिक संकटाशी दोन हात करत निर्माण केला आदर्श

खांडगावच्या युवा शेतकर्‍याने एकाच बेडवर तीन पिके घेऊन घेतले लाखोंचे उत्पन्नसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातून वाहणार्‍या मुळा, प्रवरा, म्हाळुंगी,...

जोर्वे दुर्घटनेतील बेपत्ता इसमाचा ड्रोनद्वारे शोधला मृतदेह

संगमनेर (प्रतिनिधी)सोमवारी (दि, 15) रात्री जोर्वे शिवारात पुलाचे कठडे तोडून पिकअप प्रवरेत वाहून गेली होती. यात एकजण...

अपघातग्रस्त वाहन बाहेर काढण्यात यश – एक मृतदेह हाती, एक बेपत्ता, शोध मोहिम सुरू

संगमनेर (प्रतिनिधी)सोमवार (15) रात्री तालुक्यातील ओझर येथून पिंपरणे मार्गे निघालेला मालवाहतूक टेम्पो चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने...

डिजीटल जमान्यात कलात्मक छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ

जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त काशिनाथ गोसावी यांची खंतसंगमनेर(प्रतिनिधी)पूर्वीच्या काळी काढलेले ब्लॅक व्हाईट फोटो जपून ठेवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत...