चोरी, दरोड्यानंतर आता कुत्रे, शेळ्या, मेंढ्या चोरट्यांचा धुमाकूळ

चोरट्यांचा धुमाकूळ

नागरिकांची भीती दुर करुन त्यांच्या मालमत्तेचे व पशुधनाचे रक्षण करावे – नागरीकांची मागणी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहर, परिसर व तालुक्यात चोर, दरोडेखोरांनी जणू हैदोस घातला आहे. चोरट्यांचा या भीतीने नागरिक भयभीत झाले असताना आता तालुक्यात महागडे पाळीव इंग्लिश कुत्रे (पेट डॉग्स्), शेळ्या, मेंढ्या, बकर्‍या चोरट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. तालुक्यातील कोल्हेवाडी येथे एका शेतकर्‍याच्या शेळ्या चोरुन नेताना एका इसमाला ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले. तर संगमनेर औद्योगीक वसाहत येथील एका कंपनीच्या मालकाचा पाळीव कुत्रा चोरुन नेऊन विकणार्‍या दोघांना नागरिकांनी पकडले. यासह अशा अनेक घटना तालुक्यात घडू लागल्याने आर्थिक संपत्तीबरोबर पशूधनाचे संवर्धन कसे करायचे असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

कोल्हेवाडीत पकडलेला चोर


गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर व तालूका जणू चोरट्यांच्या विळख्यात सापडला आहे. वाहन चोरी, घरफोडी, लुटमार, चैन स्नॅचिंग आदी प्रकाराने तर कहर केला आहे. अनेक तक्रारी, फिर्यादी दाखल होऊनही पोलीसांकडून त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. लाखोंचा लुटमार करुन चोरटे अद्यापही पसार असून मौजमजा करत आहेत. दरम्यान तालुक्यातील कोल्हेवाडी येथे सोपान सखाराम कोल्हे यांनी त्यांच्या मालकीच्या शेळ्या व बकर्‍या घरासमोर बांधून ठेवल्या होत्या. दरम्यान रियाज शेख व सुनील घोडके या चोरट्यांनी सोपान कोल्हे यांच्या शेळ्या व बोकड चोरुन नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वाढत्या चोर्‍यांच्या पार्श्‍वभुमीवर कोल्हेवाडी ग्रामसुरक्षा दलाच्या राहुल दिघे, सतीष वाळूंज, शिवाजी खुळे, बळीराम काळे, शिवाजी काळे, अमोल दिघे, महेश खुळे, जालिंदर दिघे, दिपक कोल्हे, शिवाजी कोल्हे आदी कार्यकर्त्यांनी या चोरट्यांचा पाठलाग करुन त्यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांची यथेच्छ धुलाई करत त्यांना तालुका पोलीसांच्या स्वाधीन केले. त्यांच्यावर भादवि कलम 379, 511, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दर दुसरीकडे अनेक लोक आपल्या हौशेपोटी वेगवेगळ्या जातीचे महागडे कुत्रे पाळत असतात
स्वतःच्या मुलाबाळां प्रमाणे या कुत्र्यांची काळजी घेतात. बाजारात या कुत्र्यांना मोठी किंमत असते. मात्र आता चोरट्यांचा डोळा या कुत्र्यांवरही गेला आहे. संगमनेर औद्योगीक वसाहतीमधील एका कंपनी मालकाने आपला पाळीव कुत्रा आपल्या कंपनीच्या गेटजवळ बांधून ठेवला होता. रात्रीच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या दोघाजणांनी या कुत्र्याची चोरी करुन तो शहरातीलच एका जणाला परस्पर विकला. याबाबतची माहिती समजताच सदर कंपनी मालकाने शोध घेऊन या चोरांचा तपास लावला मात्र सदर तरुण हे चांगल्या घरातील असल्याने हे प्रकरण परस्पर मिटविण्यात आले. मात्र असे असले तरी कुत्रे, शेळ्या, मेंढ्या चोरांची आता नागरिकांना दहशत बसू लागली आहे. पोलीसांनी या वाढत्या चोर्‍यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांची भीती दुर करुन त्यांच्या मालमत्तेचे व पशुधनाचे रक्षण करावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणावर वाहन चोरीच्या घटना घडत आहेत. ही चोरीची वाहने नेमकी जातात कुठे याचा शोध घेणे गरजेचे आहे. स्क्रॅप करणाके किंवा भंगारवाले यांच्यावर प्रशासनाने देखरेख करणे गरजेचे आहे.