साकुरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंप लुटला तर घारगावमध्ये मारहाण करुन दुकानदाराला लुटले

0
2025
पेट्रोल पंप लुटला


लुटीचा थरार सीसीटीव्हीत कैद

युवावार्ता (प्रतिनिधी)

घारगाव – संगमनेर तालुक्यातील पठार भागात वाढत्या चोऱ्या, घरफोड्या, दरोडे यामुळे नागरिक प्रचंड दहशतीखाली असताना काल रविवारी रात्री अज्ञात तीन चोरट्यांनी घारगावमध्ये रात्री एका टायर दुकानदाराला चाकूने मारहाण करून त्याच्याकडील पैसे, दोन मोबाईल व दुचाकी गाडी पळवून नेली. तर याच चोरट्यांनी साकुर परिसरातील मांडवे रस्त्यावरील असणाऱ्या पेट्रोल पंपांवर कर्मचाऱ्यां बंदुकीचा धाक दाखवून सुमारे अडीच लाख रुपये पळवून नेले. या दोन्ही घटना रात्री १० ते ११ च्या दरम्यान घडल्या. या शसस्त्र दरोड्याने पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिक प्रचंड भयभीत आहेत.


याबाबत माहिती अशी की, साकुर परिसरात मांडवे रस्त्यावर आदिक खेमनर यांच्या मालकीचा भगवान पेट्रोलियम हा पेट्रोल पंप आहे. दरम्यान नेहमीप्रमाणे रविवारी दिवसभर पेट्रोल पंप सुरू होता. रात्री काम आटोपून पंप मॅनेजर दत्ता शेंडगे हे घरी गेले. तर यावेळी सुनील गिरे व विलास कातोरे हे दोघे कर्मचारी तेथे काम पहात होते. रात्री 10.45 च्या सुमारास हे दोघे कर्मचारी दिवसभराचा हिशेब करीत असताना दोन दुचाकीवरून तीघे तरूण तोंड बांधून पेट्रोल भरण्यासाठी आले असता विलास कातोरे हे त्यांना पेट्रोल देण्यासाठी बाहेर गेले. पेट्रोल भरल्यानंतर हे तरुण पैसे न देता थेट या पंपाच्या कॅबीनमध्ये घुसले. यावेळी ता तिघांपैकी एकाने थेट बंदुक काढून सुनील गिरे यांच्यावर रोखत पैसे काढून देण्याचा इशारा केला. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भेदरलेल्या या कर्मचाऱ्यांनी कोणताही विरोध न केल्याने या दरोडेखोरांनी येथील सुमारे 2 लाख 50 हजार 747 रूपयांची रोकड लुटून नेली. हे दरोडेखोर तेथून निघून गेल्यावर या घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिक मदतीला धावून आले मात्र तोपर्यंत हे चोर पसार झाले. याबाबत सुनील गिरे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.


दरम्यान या पेट्रोल पंपांवर दरोडा पडण्यापूर्वी याच दरोडेखोरांनी घारगाव बसस्थानकाजवळ असणाऱ्या लक्ष्मी टायर वर्क्स या दुकानाचे मालक अनुदेव अनंत ओटुशेरी यांच्या दुकानात घुसून या दरोडेखोरांनी त्यांच्या खिशातील सर्व रोकड, दोन मोबाईल व त्यांची मोटारसायकल क्रमांक एम. एच. 17 सी ए 7207 ही गाडी पळवून नेली. या चोरीला विरोध केल्याने चोरट्यांनी या दुकान मालकावर चाकूने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. याच गाडीचा वापर पुढे साकुर येथील दरोड्यात करण्यात आला. एकाच वेळी या तीन अज्ञात दरोडेखोरांनी दोन ठिकाणी दरोडा टाकत लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत.


या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी मागील काही दिवसात या पठार भागात चोरी, दरोड्याच्या अनेक घटना घडल्या असताना यातील एकाही गुन्ह्याचा तपास लावण्यात घारगाव व संगमनेर पोलीस अपयशी ठरले आहे. पुणे पोलीस पठार भागात येऊन चोर, दरोडेखोरांच्या मुसक्या आवळीत असले तरी येथील पोलीस मात्र हातावर हात धरून बसले आहे. पोलीसांच्या या भुमिकेमुळे मात्र येथील नागरिक मात्र पुरते हादरून गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here