जितेंद्र रमेश निकुंभ

१२ जानेवारी थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. आजचा दिवस संपूर्ण भारतात “युवादिन” म्हणून देखील साजरा केला जातो. नव्या भारतातील तरुणाला विवेकानंदांच्या विचारांची खऱ्या अर्थाने गरज दिसून येते.
जीवनातील हेवा करण्याचा काळ म्हणजे “युवावस्था”. यौवनाला साथ लाभल्यामुळे आगीला वाऱ्याचे साहचर्य लाभते तो हा पेटता काळ होय. अनंत आकाशाला आपल्या कवेत घेवू पाहणारा, सूर्यासारखे प्रखर तेज असलेला, मनात भावनांचे काहूर माजविणारा काळ म्हणजेच तारुण्य. परंतु क्षणातच आपल्या आशा आकांक्षांचा भंग, उत्साहाची माती,सामर्थ्याची मस्ती यामुळे हा युवक स्वतःच्याच हातांनी स्वतःची स्वप्ने भस्म करून टाकतो.

स्वामीजींनी तारुण्यातच आपले ऐश्वर्य,घर,कुटुंब यांचा त्याग केला व संन्यासत्व्व पत्करले. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी अमेरिकेतील जागतिक सर्वधर्म परिषदेत भारतीय हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. डोक्यावर भगव्या रंगाचा फेटा,अंगात भगव्या रंगाचे कपडे या वेशात त्यांनी सभागृहात बोलण्यास सुरुवात केली. भाषणाची सुरुवात हि “ माझ्या अमेरिकन बंधू भगिनींनो !” अशी केली.संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने उधळून निघाले.

स्वामीजींची देहबोली,विचार,राहणीमान व ज्ञान यांची आज तरुण पिढीला नितांत आवश्यकता आहे. देशापुढे अनेक समस्या असतांना आमची युवापिढी नको त्या ठिकाणी पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्यात स्वतःला धन्य मानू लागली आहे. आमची हि युवापिढी सिगारेट,बियर,झगमग कपडे,इंटरनेट इ.मोहजालात अडकली आहे.
स्वामी विवेकानंदानी ज्याप्रमाणे आदर्श घडवून अनेक देशातील तरुणांना आपले अनुयायी बनविले. त्याप्रमाणे या तरुणाने त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन ज्ञानाची ज्योत अखंड तेवत ठेवली पाहिजे. तरुणाने नैराश्यात न जाता नव्या उमेदीने संकटांना सामोरे गेले पाहिजे. प्रत्येक जण आपली जात, जमात आणि आपला धर्म या गोष्टीकडे लक्ष देऊ लागला आहे.त्यातून राष्ट्रीय एकत्मता निर्माण होऊ शकणार नाही.

नव्या भारताचा आधारवड आजचा युवक आहे. युवकांनी स्वामी विवेकानंद,शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर या सारख्या व्यक्तींच्या मार्गावर चालण्याची आज गरज निर्माण झाली आहे. लोकसंख्यावाढ,हिंसाचार,भ्रष्टाचार यातून युवकांनी मार्ग काढला पाहिजे.नैतिक,अध्यात्मिक यांची शिदोरी जवळ बाळगली पाहिजे तरच एक आदर्श पिढी निर्माण होऊन आपले राष्ट्र बलशाली व आत्मनिर्भर बनू शकते.

प्रत्येक युवकाला आज गरज आहे ती आत्मनिर्भर करण्याची. युवकांनी जर आपल्या देशाची जबाबदारीचे भान ठेवले तर नवीन भारत उदयास येईल. २१ व्या शतकात खरोखर स्वामी विवेकानंदांच्या तत्वज्ञानाची आवश्यकता आहे.त्यांनी ज्याप्रमाणे हिंदू धर्माचा,तत्वज्ञानाचा अभ्यास केला,त्याचा प्रसार जगभर केला व भारताचे नाव उज्जल केले त्याचप्रमाणे तरुण पिढीने ‘रात्रीच्या गर्भात उद्याचा उष:काल’ या उक्तीप्रमाणे मार्गक्रमण करावयाचे आहे.
संस्कारक्षम भारत घडविण्यासाठी स्वामीजींच्या तत्वज्ञानाचा मार्ग तरुणांनी स्वीकारायला हवा तरच आपल्या देशाची कीर्ती संपूर्ण जगात पोहचवता येईल. उदासीन समाजाला ‘तीमिराकडून तेजाकडे’ नेण्यासाठी त्याचे नेत्र बनावे लागेल. शांततेचे उपासक म्हणून गौतम बुद्धांची शिकवण व स्वामी विवेकानंदाचे हिंदू धर्माविषयीचा अभ्यास व तत्वज्ञान उद्याच्या पिढीमध्ये रुजविण्यासाठीचे शस्त्र तरुणांनी हातात घेतले तर रस्त्यावर उतरणारे हात तलवार व धारदार शस्त्राऐवजी शांततेच संदेश देणारे असतील. युवकांनी मूल्याधिष्ठित शिक्षणप्रणाली अंगीकारून नैतिकता जोपासली पाहिजे तरच नवभारताची निर्मिती होऊ शकेल व हिच खरी स्वामीजींना युवदिनी खरी श्रद्धांजली असेल.
जितेंद्र रमेश निकुंभ
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय,धडगाव जि.नंदुरबार.
