
संगमनेर तालुक्यात 90 ग्रामंपचयातीत प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. तालुक्यात 328 प्रभाग रचना असून 888 सदस्य निवडून देण्यात येणार आहे. त्यासाठी 1482 उमेदवार रिंगणात असून तालुक्यात 192 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. चार ग्रामपंचायती पुर्णपणे बिनविरोध झाले आहे. निवडणूकीसाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून प्रत्यक्ष प्रचार संपला तरी आजची गोड रात्र उमेदवारांसाठी महत्वाची ठरणार आहे.

संगमनेर (प्रतिनिधी)
मागील 4 जानेवारीला माघारी नंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यापासून रोज हात जोडतोय.. ज्येष्ठांच्या पाया पडतोय.. तरुणाईला हाताशी घेतोय.. प्रचाराच्या फेर्यावर फेर्या काढल्यात.. तीळगुळ देऊन तोंडही गोड केलंय! पण आता मतांची संक्रांत कोणावर पडणार, आपल्यावर की प्रतिस्पर्ध्यावर या चिंतेत गाव-कारभारी आहेत.
जिल्ह्यातील सातशेवर गावांतील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. बुधवारी प्रचार संपल्याने आता शुक्रवारी (15 जानेवारी) मतदानाला कितीजण येतात व सोमवारी (18 जानेवारीला) मतमोजणीच्यावेळी मतपेटीतून कोणाला कौल मिळतो, याची उत्सुकता गावा-गावातून सुरू आहे. जिल्ह्यातील 767 गावांतून ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे.

यापैकी 46 ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. त्यामुळे राहिलेल्या 721 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 13 हजार 194 उमेदवार नशिब आजमावत आहेत. या सर्व मंडळींनी मागील 10 दिवसात गावाचा कोपरा न कोपरा पिंजून काढलाय, घरा-घरांतून हात जोडले, वस्त्यांवर राहणार्या मतदारांचेही पाय धरलेत, बाहेरगावी असलेल्यांना किमान मतदानासाठी तरी येण्याची गळ घातलीय, तरुणांच्या मदतीने दणक्यात प्रचार फेर्याही केल्या, नेत्यांनीही आपल्यासाठी अनेक ठिकाणी शब्द टाकलेत. त्यामुळे आता या सगळ्या बळावर गावकर्यांचा कौल आपल्याच बाजूने असेल, असा आत्मविश्वास प्रत्येक उमेदवाराला आहे. तो कितपत खरा ठरतो हे मतदानातून व नंतर मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.

हिवरेबाजार-राळेगणची उत्सुकता
नगर तालुक्यातील आदर्श गाव हिवरे बाजार व पारनेर तालुक्यातील आदर्शगाव राळेगण सिद्धी या दोन गावांच्या निवडणुकांकडे देशाचेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष लागले आहे. राज्याच्या आदर्शगाव योजना कार्य समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजारची निवडणूक 30 वर्षांनी व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धी गावाची निवडणूक तब्बल 35 वर्षांनी होत आहे. आतापर्यंत या दोन्ही गावांच्या निवडणुका बिनविरोधच होत आल्या आहेत. पण यंदा या गावांतून विरोधाचा सूर रिंगणात उतरला आहे. राळेगण सिद्धी गावात परस्पर विरोधी दोन गटांनी मतभेद मिटवून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा विचार केला, पण त्याला विरोध असलेल्या तिसर्या गटाने रिंगण गाठल्याने 9 पैकी केवळ 2 जागाच या गावात बिनविरोध झाल्या आहेत व आता 7 जागांसाठी लढती होत आहेत. खुद्द अण्णा हजारे मात्र या निवडणुकीपासून अलिप्त आहेत. त्यांचे सर्वांना आशीर्वाद आहेत व फक्त निवडणुकीमुळे गावात भांडणे नकोत, एवढाच त्यांचा सल्ला आहे. यामुळे या गावच्या निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी हजारेंच्या लौकिकात फारसा फरक पडणार नाही. पण आदर्शगाव हिवरे बाजारच्या निवडणुकीत हे गाव आदर्श करण्यासाठी मागील 30 वर्षांपासून अविरत कष्ट करणारे पोपटराव पवार स्वतः निवडणुकीत उतरले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावा-गावातून पोलिस बंदोबस्त तैनात केला गेला आहे. महसूल प्रशासनाने मतदानाची तयारी अंतिम केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती मतदारांचे स्क्रिनींगसह अन्य उपाययोजना केल्या गेल्या आहेत. गाव पुढार्यांच्या राजकीय अस्तित्वाचा फैसला शुक्रवारी मतदानातून व सोमवारी मतमोजणीतून होणार आहे.
