
सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (aus vs ind 3rd test) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतला आहे. वारंवार येणाऱ्या पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. दरम्यान सामन्याआधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला राष्ट्रगीताच्यावेळेस आपले अश्रू अनावर झाले.
कोणत्याही सामन्याची सुरुवात संबंधित दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने होते. राष्ट्रगीतादरम्यान खेळाडूंचा उर भरुन येतो. अशा वेळेस प्रत्येक खेळाडूला अभिमान वाटतो. राष्ट्रगीतावेळेस मोहम्मद सिराजला अश्रू अनावर झाले. सिराज भावूक झालेला दिसून आला. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटीझन्सनी या व्हिडीओला भावनिक दाद दिली आहे.

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून झाली. मात्र त्याआधी टीम इंडिया काही दिवस ऑस्ट्रेलियात क्वारंटाईन होती. या दरम्यान मोहम्मद सिराजच्या वडिलांचे हैदराबादमध्ये निधन झाले. क्वारंटाईन असल्याने सिराजला वडिलांचे अंत्यदर्शन घेता आले नव्हते. वडिलांच्या आठवणीत सिराज भावूक झाला असावा, असंही क्रिकेट चाहत्यांकडून म्हटलं जात आहे.

दरम्यान या तिसऱ्या कसोटीत सिराजने टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नर मोठ्या कालावधीनंतर ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन केलं. या वॉर्नरला सिराजने चेतेश्वर पुजाराच्या हाती कॅच आऊट केलं. मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटीतून पदार्पण केलं होतं. मोहम्मद सिराजला अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने कॅप देऊन टीम इंडियाच्या प्लेइंग इलव्हेनमध्ये स्वागत केलं होतं. सिराज हा टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण करणारा 298 वा खेळाडू आहे. या सामन्यात त्याने एकूण 5 विकेट क्रिकेट्स घेतल्या. त्याच्या या पदार्पणातील कामगिरीसाठी त्याचे क्रिकेट चाहत्यांकडून कौतुकही करण्यात आले होत.
