Wednesday, March 3, 2021

स्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई

राजेंद्र फरगडे

अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण ओतुर येथे झाले. त्यांचे वडिल संगमनेर पोस्ट ऑफिस मध्ये पोस्टमन होते त्यामुळे त्यांचं कुटुंब संगमनेर मध्ये राजस्थान थिएटर समोर, मेन रोडवरील भागवत वाड्यात रहायचे. वडिलांच्या टपाल बटवड्याच्या कामातही ते वडिलांना नेहमी मदत करत असत. त्या काळातील पोस्टमन हे तसे साधेभोळे, सरळमार्गी, सज्जन असत… वडिलांचा तोच सरळमार्गी पणा दत्तांमध्ये भिनलेला होता. त्यांनी सुरवातीला राजस्थान थिएटर मध्ये डोअरकीपरचेही काम केले, नंतर राजेंद्र क्लाॅथ स्टोअर्स मध्ये सेल्समन म्हणून काम केले. नंतर काही काळ ते शिवसेनेत होते. तत्कालीन संगमनेर मधील शिवसेना शहरप्रमुख दिवंगत राजेंद्र जोर्वेकर यांचेसोबत काम केले. त्यानंतर ते साधारण तीस वर्षांपूर्वी त्यावेळचे काँग्रेसचे युवा नेते स्व. अशोकराव मोरे यांचे संपर्कात आले आणि सह्याद्री विद्यालया समोर अशोकरावांचं एस टी डी बुथ होते तेथे ते काम करु लागले. मग कालांतराने स्व. अशोकराव मोरेंनी दत्तांची लोकनेते ना. बाळासाहेब थोरात यांची भेट घडवून आणली. त्यांच्या सानिध्यात आल्यावर तर दत्ता झोळेकरांना जणूकाही परिस स्पर्श झाला. त्यांनी सुरवातीला अंगची हुशारी, आपल्या कामावरील निष्ठा आणि योगदान यांच्या जोरावर बाळासाहेबांचे मन जिंकले. दत्ता जोर्व्याला गेल्यावर तिथे भाऊसाहेबांचीही भेट होत असे. दत्ता भाऊसाहेबांचीही सर्व कामे करत. भाऊसाहेबांचाही दत्तांवर खूप विश्र्वास बसला आणि ते त्यांचे खास विश्र्वासू झाले. नंतर नंतर तर भाऊसाहेबांना ‘जसलोक’ मध्ये जायचं असेल तर दत्ता असल्या शिवाय ते निघत नसत. काही वेळेस मध्येच दौरे सोडून दत्ताला यावं लागे. त्यांनी भाऊसाहेबांची खूपच सेवा केली. भाऊसाहेबांना जसलोक मध्ये भरती करुन त्यांच्या सोबत रहावे लागे. दत्ता सोबत असेल तर भाऊसाहेबांना इतर कोणी नसले तरी चालत असे.
दत्ता हा भाऊसाहेबांचा उजवा हातच नव्हे तर मानसपुत्रच होता. एकंदरीत दत्ताची काम करण्याची पद्धत, कामावरची पकड, हे बघून ना. बाळासाहेब थोरातांनी त्यांची स्वीय सहाय्यक म्हणून सुरवातीपासूनच नेमणूक करुन टाकली होती. त्यानंतर मात्र दत्ताचे क्षितिज विस्तारले. कायम सकारात्मक दृष्टि, कमालीची आकलनशक्ती, कामाचं स्वरुप जाणून घेण्याची क्षमता! समोरच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना न दुखावता काम करुन घेण्याची खुबी!! माणसे हाताळण्याची पध्दत!!! कामाचं स्वरुप समजावून घेऊन कोणत्या व्याधीवर कोणता इलाज…नेमकं कोणाचं औषध कोणाला लागू पडेल… वेळ पडल्यास कोणाचं इंजेक्शन रोगमुक्त करील…याचं अचूक ज्ञान. विरोधी पक्षातील आमदारांशी, नेत्यांशी, त्यांच्या स्वीय सहायकांशीही सलोख्याचे, जिव्हाळ्याचे संबंध! अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन!! दोन कायम खणखणाऱ्या मोबाईलवर सतत व्यस्त असूनही येणाऱ्यांच्या कामाची सोडवणूक करण्याचा ध्यास!!!कुणाच्या शिर्डीच्या दर्शनाची व्यवस्था, त्यांच्या तेथील जेवणाची व्यवस्था… तर कुणाची मुंबईच्या सिध्दीविनायकाच्या दर्शनाची व्यवस्था…. कुणाला मुंबई, पुणे येथील रुग्णालयांमध्ये भरती करण्यासाठी फोन… तर जाताना येथील अँब्युलन्स सोबत देण्यापासून त्यांची व्यवस्था…नामदार साहेबांकडे मतदारसंघातून कोणीही कोणत्याही कामासाठी मुंबईत आलं तरी ते त्यांच्या जेवणाची…गरज असेल तर त्यांच्या रहाण्याची व्यवस्था आवर्जून करत असत. बऱ्याच जणांची मंत्रालयातली कामे सुध्दा ते बिनबोभाट करत. सामान्य माणसाला भरपूर वेळ, पैसा, शक्ती वाया घालवूनही न होणारी कामे ते चुटकीसरशी त्यांच्या संपर्क यंत्रणेच्या जोरावर सोडवत असत. नामदारांच्या घरातील, त्यांच्या नात्यातील माणसांची कामे दत्ताच मार्गी लावत असत. आणि एकदा दत्ताला सांगितलेलं कोणत्याही प्रकारचं काम झालं नाही असं कधीच होत नसे. त्यामुळे नंतर सर्व नातेवाईक नामदारांपर्यंत न जाता परस्पर दत्ताला कामे सांगून करुन घेत. नामदारांना ते नंतर कधीतरी त्यांच्या कडूनच समजत असे. त्यामुळे नामदारांचा या प्रकारच्या कामाचा भार आपोआप कमी होऊन ते अति महत्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करु शकत होते. दत्ताने थोरात कुटुंबीयातील भाऊसाहेबांची सेवा केली, मथुराबाईंचीही मुलासारखी सेवा केली, कांचनताईंच्या आजारपणात त्यांचीही खूप सेवा केली. त्यामुळे आपोआपच दत्ता त्या परिवारातील सदस्य बनला. नामदारांनी सुध्दा दत्तावर लहान भावासारखं प्रेम केलं. दत्ताच्या सर्व अडचणीच्या प्रसंगी ते सर्वार्थाने त्याच्या मागे उभे राहिले.

नामदारांच्या संपर्कात आलेल्या महाराष्ट्रातील आणि परराज्यातील अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या शिर्डी दर्शनाची व्यवस्था, त्यांची तेथील रहाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था आणि दर्शनानंतर साई मंदिर कार्यालयात त्यांचा साई मंदिराच्या वतीने सन्मान, सत्कार! त्यांना संस्थानच्या वतीने साईंची मूर्ती, हार, होमकुंडातील धूणी यांची भेट! त्यानंतरही मुक्कामात काही अडचण आल्यास सरळ मला केव्हाही फोन करा हा दिलासा! अशा पद्धतीने सर्वच व्यवस्था केल्यानंतर त्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती कुटुंबासह अक्षरशः भारावून जात असत. शिर्डीतून निघताना पुन्हा त्या व्यक्तींना फोन करुन “साहेब पुन्हा केव्हाही शिर्डी दर्शनाला यायचे असेल तर मला फक्त फोन करा मी तुमची सगळी व्यवस्था लावून देईल, अजिबात काळजी करु नका.” या शब्दात त्यांना आश्र्वस्थ केलं जाई आणि खरोखर पुढच्या वेळी त्यांचा फोन आल्यावर पहिल्या सारखीच त्यांची व्यवस्था दत्तांच्या केवळ फोनवर होत असे. अशा व्यक्तींशी दत्तांचे कायमस्वरूपी स्नेहाचे, जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होत असत. हा स्नेहच पुढे गरजू व्यक्तींची कामे करुन घेण्यासाठी उपयोगी पडत असे.
ज्या ‘संपर्क कार्यालयामध्ये’ ‘संगमनेर विधानसभा मतदारसंघातील’ जनतेची कामे करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, शेतकी विभाग, महसूल विभाग, पोलिस प्रशासन आणि इतर विभागातील कामांसाठी प्रत्येकी स्वतंत्र सहाय्यक नेमून संबंधित विभागाशी सुसूत्रता ठेवून संबंधित ‘जनता जनार्दनाची’ कामे मार्गी लावण्यासाठी संगमनेर मध्ये नामदारांचं जे ‘यशोधन’ संपर्क कार्यालय उभारलं गेलं त्याच्या उभारणीत झोळेकरांचा सिंहाचा वाटा होता.
दत्ता झोळेकरांना लोकांचं काम करण्याचं इतकं वेड होतं की या अगोदर त्यांच्या यकृताच्या तब्बल सहा शस्त्रक्रिया ‘जसलोक’ मध्येच २००५ ते २०२० या काळात पार पडल्या. त्याकाळातही ते जवळपास महिनाभर ‘जसलोक’ मध्ये असायचे. परंतू ते शक्यतो अगदी जवळच्या व्यक्तीं व्यतिरिक्त कोणालाही आपण रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल आहोत हे कळू देत नसत. रुग्णालयात सुध्दा त्यांची दैनंदिन कामे फोनवरुन चालू असायची. त्याकाळात सुध्दा अनेकांची कामे ते फोनवरुनच मार्गी लावत असत. कित्येकदा आपलं काम झालं त्यावेळी ‘झोळेकर साहेब’ शस्त्रक्रियेसाठी ‘जसलोक’ मध्ये होते हे त्या संबंधित व्यक्तींना नंतर समजत असे. एकंदरीत “लोगोंकी दुवा ही उनके लिये दवा बन गयी थी।”
त्यांच्यावर पहिली शस्त्रक्रिया २००५ मध्ये झाली त्यावेळी यकृतामध्ये छोटीशी कर्करोगाची गाठ आढळली होती. परंतू ‘रेडिऐशनद्वारे’ तिचा समूळ नायनाट झाला होता. आणि तिथेच दत्ताला ‘जीवदान’ मिळालं होतं. पुन्हा कर्करोगाने कधीच डोकं वर काढलं नव्हतं. परंतू यकृत कमजोर झालं होतं. आता मिळालेलं पुढील आयुष्य हे आपलं ‘बोनस लाईफ’ आहे हे दत्ताने ओळखलं…मुळच्या परोपकारी स्वभावाला लहानमोठी कामे आणखी जोमाने करण्यात धन्यता वाटू लागली! परंतू २००५ नंतरच्या पहिल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी फारशी काळजी घेतली नाही. रेडिएशन नंतर ते १५ दिवसातच ते झपाट्याने कामाला लागले. सुरवातीच्या दोन तीन शस्त्रक्रियेंच्या दरम्यान त्यांचं वय तसं कमी असल्याने आणि अंगात जोम असल्याने ते तब्येतीकडे दुर्लक्ष करत. पथ्य पाणी फारसे पाळत नसत.

मधल्या पंधरा वर्षांच्या कालावधीत यकृताच्या आणखी ६ शस्त्रक्रिया पार पडल्या. परंतू अतिशय प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ते नेहमी हसतमुखाने या शस्त्रक्रियांना सामोरे गेले.
ईश्र्वर कृपेने मिळालेलं ‘बोनस लाईफ’ संपर्कात आलेल्यांना त्यांची कामे करण्याच्या स्वरुपात ‘बोनस’ वाटप करु लागलं. यामुळे झोळेकरांचा अतिशय दांडगा लोकसंग्रह झाला, असंख्य शुभचिंतक आणि मोठा चाहता वर्ग तयार झाला. याचं प्रत्यंतर २०१९ च्या डिसेंबर मध्ये त्यांची जेष्ठ कन्या अक्षदाचा विवाह संगमनेरच्या मालपाणी रिसोर्ट मध्ये पार पडलं त्यावेळी आला. त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इतके ‘व्ही आय पी’ आले की स्वतः झोळेकरांचाच स्वतःवर विश्र्वास बसेना इतक्या मोठ्या संख्येने ‘ते’ आले होते. सुदैवाने चाळकवाडीचे विश्र्वजित चाळक यांच्या रुपात अतिशय शांत, समंजस, देखणा जावई दत्ताला परमेश्वर कृपेने लाभला. चाळक परिवार सुध्दा दैवयोगाने खूप दिलदार मिळाला. यकृतदानाचा विषय निघाला त्यावेळी सासऱ्यांनी अक्षदाला सांगितले की तुझ्या आणि विश्र्वजितच्याही चाचण्या करुन घ्या. ज्याच्या ‘मॅच’ होतील त्याने यकृतदान करा!
२००५ मधील पहिले ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले त्यावेळीही दत्ता भागवत वाड्यातच रहात होता. त्याप्रसंगी अनेक लोक दत्ताला भेटायला येवू लागले. मेनरोडवर चारचाकी गाडी नेणंच मुश्किल तर पार्किंगचा विषयच नसायचा. त्यावेळी दत्ताचे अगदी जवळचे मित्र मंडळीतील रामेश्वरजी भंडारी वगैरेंनी त्याला छेडले, “अरे इथे तुला भेटायला अनेक मोठे लोक गाड्या घेऊन येतात आणि येथून पुढेही येतच रहाणार आहेत. त्यांनी इथपर्यंत कसं यायचं?” त्याचक्षणी दत्ताने आॅरेंज काॅर्नरचा फ्लॅट बुक केला. आणि लवकरच दत्ता आॅरेंज काॅर्नरला रहयला आला आणि ऑरेंज काॅर्नरचा नूरच पालटून गेला. दत्ताच्या फोनवर काॅलनीतील आणि सिध्दीविनायक परिसरातील कामे होऊ लागली.

ऑरेंज काॅर्नर-सुविधा काॅलनीच्या सिध्दीविनायक मंदिर उभारणीचे काम सुरु होण्याअगोदर त्यांनी आम्हाला सांगितले की “मंदिर भव्य उभारा” पैशांची चिंता करु नका. आपण पाहिजे तेवढे पैसे उभारु शकतो. आणि त्याप्रमाणे त्यांनी संगमनेर व्यतिरिक्त बाहेरुन सुध्दा भरघोस आर्थिक मदत मिळवून दिली आणि त्यामुळे या परिसरात एक अतिशय स्वच्छ, नीटनेटकं, देखणं आणि भव्य मंदिर उभं राहिलं. नंतर दरवर्षी येणारे गणेशोत्सव भव्य प्रमाणात साजरे करण्यासाठी सुध्दा त्यांनी भरघोस आर्थिक मदत सातत्याने मिळवून दिली. विश्र्वस्तांच्या होणाऱ्या बैठकीत त्यांची उपस्थिती सर्वांना उभारी देणारी असायची. मंदिर उभारणीत आणि नंतरच्या गणेशोत्सवात सिंहाचा वाटा असूनही त्यांना त्याबद्दलची चर्चाच काय त्याबद्दल उल्लेख केलेलाही आवडत नसे. त्यांना तिथेही मागे रहायलाच आवडे. मिटींग मध्ये सुध्दा सर्वांच्या सूचना ते ऐकून घेत. योग्य असेल लगेच स्वीकारायला सांगत. स्वतःची मतं, सूचना त्यांनी कधीच लादल्या नाही. झोळेकरांचे मुंबईतील ‘सिध्दीविनायक मंदिर’, व्यवस्थापनाबरोबर सुध्दा अतिशय सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या त्या जिव्हाळ्याचा संबंधामुळे आमच्या आॅरेंज काॅर्नर- सुविधा काॅलनीच्या सिध्दीविनायक मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळी मुंबईतील ‘सिध्दीविनायक मंदिर’ व्यवस्थापनाने ‘खास हार, फुले, माळा’ पाठविल्या होत्या. ऑक्टोबर २०२०; नवरात्रात दत्तांना ‘लिव्हर स्ट्रोक’ चा त्रास सुरु झाला. त्यांना पुन्हा रुग्णालया मध्ये भरती करावं लागलं. बरेच दिवस ते रुग्णालया मध्येच होते. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुध्दा ते सायंकाळी ५ वाजता घरी आले. त्यानंतर ‘जसलोक’ मधील तज्ञ डाॅक्टरांचं म्हणणं पडलं की आता हीच वेळ आहे लिव्हर ट्रान्सप्लान्ट ची म्हणजेच यकृत प्रत्यारोपणाची. दत्ता लगेच तयार झाले. कनिष्ठ कन्या दिशाही तयार झाली. कारण दिशाचा हट्ट होता… पप्पा मीच तुम्हाला लिव्हर देणार. कारण तिच्या सर्व चाचण्या सकारात्मक आल्या होत्या व वैद्यकीय दृष्टीने दाता आणि याचक यांचे सर्व आवश्यक वैद्यकीय तपशील एकमेकांशी पूर्ण जुळत होते. घरातून झोळेकरांची पत्नी, मोठी कन्या अक्षदा आणि छोटी दिशा यांनी दत्तांना समजावले कि, “पपा आम्हाला यातलं काही जास्त माहिती नाही. डाॅक्टरांच्या सल्ल्याने हे चालू आहे. परंतू यात मोठी जोखीम आहे, तर तुम्हाला काय वाटतं?” तर दत्ता म्हणाले कि, “अगं तुम्ही का काळजी करता? माझी एकदम तयारी आहे. आणि मी यातून पूर्ण बरा होऊन पुन्हा कामाला लागणार आहे. तुम्ही काहीच घाबरु नका, सर्व काही ठिक होईल.” त्यानंतर “फोर्टीसला” दत्ता आणि दिशा यांच्या पुन्हा एकदा सर्व चाचण्या, तपासण्या पार पडल्या. दोघांच्याही सर्व चाचण्या अगदी योग्य पाहिजे तशा सकारात्मक आल्या. म्हणजे प्रत्यारोपणपूर्व तयारी झाली होती. आणि “फोर्टीस” हे मुंबईतील अवयव प्रत्यारोपणासाठी अग्रमानांकित रुग्णालय गणलं जातंय. परंतू तेथे लगेचची म्हणजे डिसेंबर मधील तारीख मिळेना. मग ‘जसलोक’ चे तज्ञ डाॅक्टर्स म्हणाले की आपल्या कडे डाॅ गौरव चौबळ सारखे निष्णात शल्यचिकित्सक आहेत ज्यांनी आतापर्यंत २५० पेक्षा अधिक ‘यकृत प्रत्यारोपण’ यशस्वीपणे केले आहेत. शेवटी ९ डिसेंबर ही प्रत्यारोपणाची तारीख ठरली. त्या अगोदर काही दिवस त्यांना ‘जसलोक’ मध्ये ठेवावं लागलं. त्यावेळी तिथे त्यांच्या सोबत पत्नी, कन्या अक्षदा जावई विश्र्वजित आणि दिशा हे सर्व होते. बुधवार दि. ९ डिसेंबरला सकाळी ७ वाजता सुरु झालेली ‘यकृत प्रत्यारोपणाची’ शस्त्रक्रिया तब्बल २० तास म्हणजे रात्री ३ वाजेपर्यंत चालली. डाॅक्टर गौरव चौबळ, डाॅक्टर नीलेश डाॅक्टर आणि इतर सहाय्यक डाॅक्टर्स, भूलतज्ञ, सिस्टर्स असा चौदा पंधरा जणांचा वैद्यकीय चमू सातत्याने २० तास शस्त्रक्रिया पार पाडत होता. इकडे दत्ताचे संगमनेरातील जवळचा मित्र परिवार, महाराष्ट्रातील आणि परराज्यातील परिचित, शुभचिंतक, चाहते हे सर्वच शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत होते. अखेर शस्त्रक्रिया यशस्वी झाली. दत्तांना दुसऱ्या दिवशी रात्री म्हणजे गुरुवारी रात्री ८ वाजता शुध्द यायला सुरुवात झाली. शुध्दीवर यायला लागल्यावर जसजशी भूल उतरु लागली तस तशा त्यांना वेदना जाणवू लागल्या. डाॅक्टरांनी त्या वेळी योग्य औषधोपचार करुन वेदना शमविल्या. त्यानंतर काही दिवस ते आय सी यु मध्येच होते. नंतर त्यांना स्पेशल रुममध्ये आणलं परंतू संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना ‘आयसोलेशन’ मध्ये ठेवलं. अक्षदा, झोळेकर वहिनी यांना त्यांना भेटायला जाताना तो विशिष्ट सुट घालून भेटायला जावं लागे. त्यानंतर ते हळूहळू अक्षदा बरोबर आणि पत्नी बरोबर थोडं थोडं बोलू लागले. एक दोन आठवड्यात तब्येत चांगली सुधारली आणि ते छान बोलू लागले. चांगली हालचाल करु लागले, थोडंफार चालूही लागले. त्यानंतर त्यांनी जवळचे मित्रांना स्वतःहून उत्साहाने फोन करण्यास सुरुवात केली. प्रत्येकाला ते सांगू लागले, “अरे मी आता लवकरच बरा होऊन परत येतोय. काही काळजी करु नका. मला अजून साहेबांसाठी म्हणजे नामदारांसाठी पुढील पाच वर्षे खूप काम करायचंय! तुमच्या सर्वांची खूप कामे करायची आहेत.” एकंदरीत ते उत्साहाने भारावून गेले होते. त्यांच्यातील जबरदस्त इच्छाशक्तीचा तो परिणाम होता.

त्यानंतर ३० डिसेंबरला अक्षताच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यादिवशी ते खूपच आनंदात होते. संध्याकाळी विश्र्वजित आणि अक्षदा भेटायला गेल्यावर त्यांना ते म्हणाले आज तुम्ही चांगल्या हाॅटेल मध्ये जेवायला जा! मजा करा!! त्यांनी काही चांगल्या हाॅटेल ची नांवे सुचविली. त्यांना आणखी काही चांगल्या हाॅटेलची ज्यामध्ये ते पूर्वी बऱ्याचदा गेले होते, त्या हाॅटेल्सची नांवे आठवली नाही तर त्यांनी फोनवरुन मित्रांना विचारुन ती नांवे मागविली. अक्षदाने त्यांना होकार दिला.
त्यानंतर २ जानेवारीला दत्ताचा वाढदिवस होता. ‘जसलोक रुग्णालय व्यवस्थापनाने’ त्यांच्यासाठी खास केक बनवून घेतला. दत्ताने संगमनेर मध्ये राजेंद्र क्लाॅथचे कैलास सोमाणी यांना अगोदरच सांगून रुग्णालयातील स्टाफसाठी वाढदिवसानिमित्त पन्हाळेंचे पेढ्यांचे १०० बाॅक्स छानपैकी प्रेझेंटेशन करुन मागविले होते. एका बाॅक्स मध्ये चार मोठे पेढे! दत्ताला कोणतीही वस्तू देताना ती छान प्रेझेंट करुन देण्याचेही वेड होतं तो त्याचा हट्ट असायचा. शिवाय ती वस्तू दर्जेदारच असली पाहिजे हा आग्रह असायचा. वाढदिवसाच्या दिवशी दत्ताच्या पत्नी सौ शशीकला, कन्या सौ अक्षदा, श्री विश्र्वजित आणि दिशा यासर्वांनी आणि रुग्णालय स्टाफ यांनी अतिशय उत्साहात आणि आनंदातिशयात साजरा केला. दत्ता नेहमी ‘जसलोक’ मध्ये भरती होण्यासाठी जाताना संगमनेरहून तेथील स्टाफसाठी नढेंची भेळ, जोशींचे पेढे, पन्हाळेंचे पेढे नेत असत. त्यामुळे तेथील स्टाफला दत्ताचा खूप जिव्हाळा निर्माण झाला होता. २ जानेवारीला दत्ताला वाढदिवसाच्या शुभेच्छांचे असंख्य फोन ‘जसलोक’ मध्ये आले. दत्ताने सर्वांना त्याच उत्साहात उत्तरे दिली. त्यांच्याशी भरपूर गप्पा मारल्या! कुटुंबीयांशी भरपूर गप्पा मारल्या. त्यानंतर व्यवस्थापनाने सौ शशीकला यांना दत्तांसोबत रहाण्याची परवानगी दिली. आणि सौ झोळेकर दत्तासोबत सर्व काळजी घेऊन राहू लागल्या. दरम्यान दत्ताने संगमनेरहून चंद्रकांत नवले जे पूर्वी सर्व शस्त्रक्रियांच्या वेळी दत्तासोबत असायचे त्यांना बोलावून घ्या असे सांगितले. अक्षदाने नवलेंना फोन केला ते लगेच यायला तयार झाले. त्यांनी तेथे येण्यापूर्वी कोविड टेस्ट करुन घेतली. कारण ‘जसलोक’मध्ये पास तयार करण्यापूर्वी ‘कोविड टेस्ट’ अनिवार्य होती.
साधारण चार पाच जानेवारीला डाॅक्टरांनी दत्ताला उद्याच ‘डिस्चार्ज’साठी तयार रहा असे सांगितले. ते ऐकून दत्ताला अत्यानंद झाला. दत्ताने ‘डिस्चार्ज’ मिळणार म्हणून सर्वांना फोन करायला सुरुवात केली. अर्थात ‘डिस्चार्ज’ घेऊन दत्ताला तिथे जवळच्या फ्लॅट मध्ये जिथे सध्या अक्षदा- विश्र्वजित आणि दिशा रहात होत्या त्या फ्लॅटवरच चार-सहा महिने रहावं लागणार होतं ते संसर्गापासून बचावासाठी!
अक्षदाला जेव्हा कळालं की उद्याच ‘डिस्चार्ज’ मिळतोय, त्यावेळी अक्षदा दत्ताला म्हणाली की “पपा आम्हाला अगोदर आम्ही आता रहातोय तो फ्लॅट पूर्ण ‘सॅनिटाइज’ करुन घ्यावा लागेल. तुमच्या बेडच्या मध्ये आणि आमच्या मध्ये तुम्ही ‘आयसोलेट’ रहावे म्हणून शिल्ड-कर्टन टाकून घ्यावा लागेल. त्याकरिता एकदोन दिवस जास्त लागतील. त्यामुळे आपल्याला दोन तीन दिवस उशीरा ‘डिस्चार्ज’ घ्यावा लागेल.” दत्ताचा थोडा हिरमोड झाला परंतू तो म्हणाला, “ठिक आहे आपण तसं डाॅक्टरांना सांगू.” त्याने तसं डाॅक्टरांना सांगितल्यावर डाॅक्टर तयार झाले. त्यानंतर सर्व ठीक चाललं होतं. दत्ता फोनवर व्यस्त असायचा. फावल्या वेळात ‘कारवाँ’ वरचे गाणे ऐकत आनंद घेत होता.
९ जानेवारीला अचानक एक दिवस दत्ताला रात्री थोडा ताप आला. दुसऱ्या दिवशी जे रिपोर्ट आले त्यात यकृतात थोडासा जिवाणू संसर्ग आढळला होता. डाॅक्टरांनी त्वरित तो जंतूसंसर्ग कमी होण्यासाठी काही औषधे दिली. दत्ताने ते फारसं गांभीर्याने घेतलं नाही. तो म्हणाला, “होईल सगळं व्यवस्थित! तुम्ही काही काळजी करु नका!!” मात्र दुसऱ्या दिवशीही ताप आला. आणि रिपोर्ट मध्ये जंतूसंसर्गात वाढ झाल्याचं आढळलं. औषधांना संसर्गाने दाद दिली नव्हती. मग डाॅक्टरांनी पोटाच्या बाजूने कॅथेड्रल टाकून यकृता जवळ जेथे संसर्ग म्हणजे ‘पू’ झाला ते सिरिंज टाकून ‘suck’ करण्याचा प्रयत्न केला. परंतू तिथला रक्तप्रवाह बंद पडल्यामुळे तो प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यावेळी डाॅ गोरव चौबळ, डाॅ नीलेश डाॅक्टर आणि इतर जेष्ठ शल्यचिकित्सक यांची बैठक झाली आणि प्रदीर्घ चर्चेनंतर त्यांनी अक्षदा आणि विश्र्वजित यांना बोलावून घेतले की आता आपण त्यांना जास्त ‘तीव्र अँटिबायोटिक्स’ देऊ शकणार नाही. कारण त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढली तर ‘लिव्हर रिजेक्शन’ होऊ शकतं. कारण शरीरात प्रतिपिंडं वाढली तर अवयव दानात प्रत्यारोपण केलेला यकृताचा भाग शरीराकडून नाकारला जाईल आणि आपली ‘प्रत्यारोपण’ शस्त्रक्रियाच असफल होऊन परत परिस्थिती अधिक गंभीर होईल. यात आपल्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे ‘रिओपन’ करुन संसर्ग काढून टाकणं. यातही जोखीम आहे परंतू पहिल्या उपायापेक्षा म्हणजे ‘तीव्र अँटिबायोटिक्स’ देऊन ‘लिव्हर रिजेक्ट’ होण्यापेक्षा थोडी कमी. अक्षदाने त्यावर डाॅक्टरांना अनेक प्रश्न विचारले. आणि मग विश्र्वजित बरोबर चर्चा करुन तिने ‘लिव्हर रिओपनला’ परवानगी दिली.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी दत्ताला पुन्हा आय सी यु मधून मग आॅपरेशन थिएटर मध्ये न्यायचं ठरविलं. मग अक्षदा पुन्हा दत्ताकडे गेल्यावर दत्ता तिला म्हणाले, “अग काही नाही छोटसं ‘इन्फेक्शन’ झालं आहे त्यामुळे ते काढून टाकण्यासाठी मला ते आय सी यु मध्ये नेणार मग उद्या आॅपरेशन थिएटर मध्ये नेणार आहे. तू काही काळजी करु नको! मी अगदी बरा होणार आहे. अगं मला बरं होऊन आणखी खूप कामे करायची आहेत, त्यामुळे मला काहीच होणार नाही.”
अक्षदाने यासर्व घडामोडी आईला आणि दिशाला कळू दिल्या नाही. आईला तिने फ्लॅटवर दिशासोबत रहायला पाठवून दिलं. आय सी यु मध्ये जाण्यापूर्वी दत्ताने त्याच्या छोट्या बॅगमध्ये स्वतःच्या हाताने त्याचे दोन मोबाईल, चार्जर, छोटासा डोंगल, त्याचं नेहमीचं पूजेचं यंत्र ठेवले. स्वतः होऊन आय सी यु मध्ये दाखल होण्यासाठी तयार होऊन बसला. दत्ताला तिथेही राजहंसच्याच पाण्याच्या बाटल्या लागत. तिथे त्याकरिता विशेष परवानगी घेतली होती. पाणी गरम करण्याचं स्वतःचं मशीन लागायचं.
दुसऱ्या दिवशी ‘लिव्हर रिओपन’ करुन अत्यंत जिकिरीची जंतू संसर्ग काढण्याची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर दत्ता आय सी यु मध्येच होता बऱ्याचदा गुंगीत असायचा. त्यानंतर रोज तब्येतीत चढ उतार सुरु झाले. एखाद्या दिवशी तब्येत चांगली असायची तर दुसऱ्या दिवशी गंभीर! रिपोर्ट रोजच्या रोज येत होते. शुक्रवारी ते झोपुनच होते अगोदरच्या दिवशी रात्री त्यांना उलटी झाली होती. अक्षदाने हाक मारल्यावर त्यांनी हुंकार दिला होता तेवढाच. संध्याकाळी सौ झोळेकर गेल्यावरही ते गुंगीतच होते बोलू शकत नव्हते. त्यावेळी आलेले रिपोर्ट डाॅक्टरांनी बघितल्यावर मग त्या रात्री डाॅक्टरांनी अक्षदा आणि विश्र्वजितना बोलावून सांगितले की तुम्ही आता सर्व प्रकारची तयारी ठेवा कारण आपण ‘रिओपन’ करुन बाहेर काढलेला जंतूसंसर्ग दुप्पट वेगाने वाढलेला आहे.
अक्षदा आणि विश्र्वजित काळजी करत गंभीर होऊन फ्लॅटवर परतले. आईने व दिशाने विचारल्यावर सर्व काही ठिक आहे असेच त्या दोघींना सांगितले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी हे दोघे दुपारी बाराच्या दरम्यान दत्ताला भेटायला गेले तर दत्ता छानपैकी उठून गप्पा मारत होता. त्याने स्वतःच्या हाताने काॅफी घेतली. दोन्ही पायांच्या हाताच्या हालचाली करुन दाखविल्या. त्यामुळे अक्षदा आणि विश्र्वजित आश्र्वस्त झाले. दुपारी चंद्रकांत नवले जवळ असताना दत्ताने त्यांना हात खूप दुखतो तेवढा चोळून दे असं सांगितलं. संध्याकाळी वहिनी असताना त्यांना पाय चोळून द्यायला सांगितले.
१७ जानेवारीला रविवारी ते झोपूनच होते. अक्षदा भेटायला गेल्यावर दत्ता गुंगीत होता. अक्षदाने “पप्पा, पप्पा अशी हाक मारल्यानंतर त्यांनी अर्धवट उठून हुंकार दिला व परत डोळे मिटले. ते गुंगीतच होते.
बोलू शकत नव्हते. त्या दिवशी रात्री तीन वाजता रुग्णालयातून फोन आला की दत्ताची तब्येत अचानक बिघडली आहे आणि त्वरित तुम्ही इकडे या! अक्षदा आणि विश्र्वजित दहा मिनिटात तेथे पोहचले. तेथे गेल्यावर डाॅक्टरांनी सांगितले की दत्ताचा ‘पल्सरेट’ म्हणजे नाडीचे ठोके मिनिटाला १५० पडायला लागले आहेत आणि परिस्थिती एकदम गंभीर, चिंताजनक आहे. नंतर सर्व डाॅक्टर्स, नर्सेस यांनी मिळून त्यांना फिजिओथेरपीची ट्रिटमेंट अतिजलद गतीने दिली. आणि तो ‘पल्सरेट’ हळूहळू १२० पर्यंत आणला. मग डाॅक्टरांनी अक्षदाला सांगितले की आता परिस्थिती नियंत्रणात आहे तुम्ही जायला हरकत नाही. अक्षदा आणि विश्र्वजितने काचेच्या छोट्या चौकटीतून आतमध्ये डोकावून बघीतले दत्ता शांतपणे झोपले होते. मग दोघेही बाहेर पडले परंतू अस्वस्थपणे रुग्णालया भोवतीच फिरत राहिले. पहाटेचे ४ वाजले होते. शेवटी अक्षदा विश्र्वजितला म्हणाली आताच्या आता आपण ‘सिध्दीविनायकला’ प्रभादेवीत जाऊ. ते तेथे पोहचले तर मंदिर त्यावेळी बंदच होते. त्यांनी बाहेरुनच कळसाचे दर्शन घेतले. सिध्दीविनायकला जोडीनं साकडं घातलं आणि ते परत फिरले, फ्लॅटवर येण्यासाठी. तोपर्यंत चंद्रकांत नवले संगमनेरहून फ्लॅटवर आले होते.

सोमवारी सुध्दा ते पूर्ण गुंगीत होते. त्यादिवशी संध्याकाळी बरेच बाहेरचेही तज्ञ डाॅक्टर्स आले. मुंबईतील यकृत रोपणातील तज्ञ डाॅक्टर्स येऊन गेले. मग रुग्णालय व्यवस्थापनाने अक्षदा आणि विश्र्वजितला बोलावून सांगितले की आता आपण जे करायचे ते सर्व काही केले आहे. आता वैद्यक-शास्त्राच्या मर्यादा संपल्या आहेत. अक्षदाने विचारलं, “शेवटचा उपचाराचा काही पर्याय?” तर ते म्हणाले परत रिओपन करणे, परंतू त्याची जोखीम खूप जास्त, म्हणजे न केलेलंच जास्त चांगलं. कारण आता रुग्णाचा औषधांना प्रतिसादही कमी मिळतोय आणि त्यांची शक्ती खूपच क्षीण झाली असल्याने आपण त्यांना VLC व्हेंटिलेटर वर ठेवलं आहे. कारण ते स्वतःचा श्र्वास स्वतः घेऊ शकतात परंतू त्याकरिताही त्यांची अगोदरच क्षीण झालेली शक्ती खर्ची पडू नये म्हणून आपण त्यांची शक्ती वाचवून ठेवतोय.
रात्री दहा वाजता परत रुग्णालयातून फोन आला. तुम्ही येऊन जा. अक्षदा- विश्र्वजित गेल्यानंतर डाॅक्टर्सनी सांगितले की तुम्ही आम्हाला एका कागदपत्रावर सही करुन द्या ज्यामध्ये लिहिलंय की आता यापुढे त्यांना आहे त्या स्थितीत ठेवा! यापुढील उपचार थांबवा!! कारण आता अशी स्थिती आहे की त्यांचे रिपोर्ट अशा स्थितीत आहे की चमत्कार झाला तर ते यातून परत येऊ शकतात परंतू औषधोपचार केल्यास जास्त हानी होऊ शकते. अक्षदाने सर्व वाचून नाईलाजाने त्यावर सह्या केल्या. त्यानंतर तिने विचारले मी पप्पांजवळ जाऊ शकते का? त्यांनी परवानगी दिली. अक्षदाने गळ्यातून, तोंडातून नळ्या टाकलेल्या पप्पांना हाक मारली, “पप्पा…पप्पा…उठा…आपल्याला ‘डिस्चार्ज’ घ्यायचा आहे ना?” परंतू आजपर्यंत तत्काळ प्रतिसाद देणारे पप्पा ‘निश्र्चल’ होते…ते पाहून तिचा बांध फुटला व ती ओक्साबोक्षी रडू लागली. शेवटी नर्संने तिला बाजूला घेऊन सांगितले, “ते जरी प्रतिसाद देत नसले असं वाटलं तरी त्यांचा सेन्स अजूनही कार्यरत आहे, तुझ्या बोलण्यावर त्यांचा प्रतिसाद माॅनिटरवर प्रतीत होतो आणि ते रिडींग बदलतंय! त्यामुळे तू सकारात्मक बोलली तर सकारात्मक परिणाम होईल अन्यथा त्यांची जी लढाई चालू आहे… तुझ्या नकारात्मकतेने त्यात बाधा येईल. अक्षदा सावरली आणि दुसऱ्या बाजूने जाऊन ती, “पप्पा, पप्पा… उठा ना!” म्हणून हाक मारु लागली परंतू आतापर्यंत “पप्पा म्हणताच तत्काळ प्रतिसाद देणारे पप्पा निश्र्चल पाहून तिच्या मनावरचा ताबा सुटला व ती पुन्हा हुंदके देऊ लागली. मग नर्सने तिला आय सी यु बाहेर आणून सोडलं. रात्री अडीच वाजता ते फ्लॅटवर पोहचले त्यांनी आईला आणि दिशाला काहीच कळू दिले नाही. मंगळवार १९ जानेवारी सकाळी पावणेसात वाजता रुग्णालयातून अक्षदाला फोन आला सकाळी ६ वाजता सर्व काही संपलं होतं दत्ता आपल्या सर्वांना सोडून गेला होता. अक्षदा लगेच आई आणि बहिणीला सांगू शकली नाही. परंतू काही वेळाने तिने आई आणि दिशाला बोलावून पप्पा गेल्याचं सांगितलं आणि त्या तिघी एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागल्या.

१५ वर्षांत सहा शस्त्रक्रिया आणि यकृत प्रत्यारोपण झालेला परंतू दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला हा योध्दा शेवटच्या युद्धात हरला व संगमनेरच्या कोंदणातील हा हिरा निखळून पडला, आणि अनंताच्या प्रवासाला निघून गेला, आपणा सर्वांना सोडून! अगणित लोकांची कामे निरपेक्षपणे करुन मिळालेल्या संचितामुळेच दत्ताला रुबाबदार अल्पायुषी जीवन प्राप्त झालं.
झोळेकरांमुळे आमच्या ‘ऑरेंज काॅर्नरला’ आणि सुविधा काॅलनीला एक वेगळीच ‘झळाळी’ चढलेली होती. त्यांच्या जाण्यामुळे ती ‘झळाळी पूर्णपणे लूप्त’ झाली आहे.
भावपूर्ण श्रध्दांजली!

शब्दांकन : राजेंद्र फरगडे,
संगमनेर
९९७०१९२८४०
सहाय्य : अक्षदा झोळेकर-चाळक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

गर्दीचे दुष्परिणाम – कोरोनाचा वाढता आलेख कायम ; तीन दिवसात ९५ जणांना कोरोनाची बाधा

संगमनेर (प्रतिनिधी)जानेवारीत कोविड विषाणूने काहिसा आराम घेतला मात्र मानवीय चुकांमुळे हा विषाणू पुन्हा एकदा पहिल्या पेक्षा अधिक...

आता २४ तास मिळणार कोरोना लस ; लसीकरणाच्या वेगासाठी सरकारने वेळेचे बंधन काढले

नवी दिल्ली : 'करोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याकरता सरकानं वेळेची मर्यादा समाप्त केली आहे. देशाचे नागरिक आता...

फ्लेक्स लावून व गुलाबाचे फुल देऊन युवक काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आंदोलनात आज महसुल मंत्री नामदार बाळासाहेब...

आरोप खोटे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी हा पब्लिक ट्रस्टच – आंबरे पाटील

वीरगाव(प्रतिनिधी)-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर केवळ बदनामी करण्याचे उद्देशाने हितचिंतकांनी केलेले आरोप धादांत खोटे असून ही संस्था पब्लिक...

नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आता पालिकेबरोबर पोलिसांनाही

संगमनेर (प्रतिनिधी)कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासन व प्रशासनाने कोव्हीड साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली...