
संगमनेर (प्रतिनिधी)
बेकायदेशीररित्या गुटख्याची वाहतुक करणार्या वाहनाला अडवून या वाहनातून पोलिसांनी तब्बल तीन लाख 21 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असल्याची घटना काल मंगळवारी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्याजवळ घडली. या प्रकरणी शहरातील दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरुन एका वाहनातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार व त्यांच्या सहकार्यांनी हिवरगाव पावसा येथील टोलनाक्याजवळ गुटख्याने भरलेली ओमनी कार क्रमांक एम. एच. 170 बी. व्ही 9057 पकडली. पोलिसांनी या कारची तपासणी केली असता यामध्ये 2 लाख 41 हजार 680 रुपये किंमतीचे हिरा कंपनीचे पान मसाल्याचे 2014 पाकिटे, 60 हजार रुपये किंमतीचे रॉयल 717 तंबाखूचे 204 पुडे, 8 हजार 712 रुपये किंमतीचे विमल पान मसाल्याचे 44 पुडे, 968 रुपये किंमतीचे तंबाखुचे 44 पुडे,पहजार 460 किंमतीचे आर. एम. डी. पान मसालाचे पुडे असा 3 लाख 21 हजाराचा गुटखा आढळून आला. या गुटख्यासह पोलिसांनी 2 लाख रुपये किंमतीची मारुती कंपनीची ओमनी गाडी असा एकूण 5 लाख 21 हजार140 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

या प्रकरणी पोलीस नाईक अनिल कडलग यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी संजय माधव भागवत (वय 33), अक्षय माधव भागवत (वय 26) (दोघे रा. इंदिरानगर) यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता 328,188,272,273,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल एस. एस. पाटोळे हे करत आहे.
