अवश्य वाचा


  • Share

पेट्रोल दरवाढ- दारू न पिणार्‍यांना नाहक भुर्दंड

संगमनेर (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाच्या एक आदेशाने संपूर्ण देशातील राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या 500 मीटर अंतरावरील दारू विक्री बंद झाली. या दारू बंदीमुळे सर्व राज्यांचा महसूलात मोठ्या प्रमाणावर घट झाली मात्र महाराष्ट्र शासनाने ही घट भरून काढण्यासाठी नामी शक्कल लढवत पेट्रोलवर 3 रू. व्हॅट आकारत पेट्रोल महाग केले. मात्र या दरवाढीमुळे दारू न पिणार्‍यांना मात्र नाहक भुर्दंड सोसावा लागत आहेे तर दारू बंदीमुळे सध्या दारू काळ्याबाजारातून जास्त दरात विकत घ्यावी लागते व ती शोधण्यासाठी गाडीवर मोठी भटकंती करावी लागते त्यामुळे या दारू पिणार्‍या वर्गाला तर डबल भुर्दंड सोसण्याची वेळ आली आहे त्यामुळे राज्य सरकारच्या या दरवाढीवर सर्वत्र नाराजीचा सुर उमटत आहे. दारू, मटका, जुगार, गुटखा, गांजा, डान्सबार या व्यवसायातून सरकारला मोठा महसूल मिळत असतो. मात्र जनहितासाठी व नागरीकांच्या आरोग्यासाठी व भविष्यासाठी राज्य सरकारने यातील अनेक गोरख धंद्याला कायदेशीर बंदी घातली व यातून मिळणार्‍या महसूलावरही पाणी सोडले तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील जवळपास 80 टक्के पेक्षा जास्त दारू दुकाने बंद झाली. पर्यायाने राज्य सरकारचे कोट्यावधी रूपयांचे महसूल बुडाले हे बुडालेले महसूल कोठून भरून काढायचा असा प्रश्‍न सरकारपुढे असतांना सरकारने नेहमीप्रमाणे पेट्रोलवर अधिभार वाढविला. पेट्रोलवर तब्बल तीन रूपये अधिभार लावल्याने राज्यात पेट्रोलचे दर भडकले. या दरवाढीमुळे 73 रूपयांचे पेट्रोल आता 76 रूपयांवर जाऊन पोहचले. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी पेट्रोलच्या दरात मोठी कपात केली होती मात्र राज्य सरकारने त्यावर कडी करून हे दर पुन्हा वाढविले. दारूच्या उत्पन्नाची घट या करातून वसूल करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. दरम्यान, जे लोक दारू पीत नाही त्यांच्याही माथी ही नाहक करवाढ झाली आहे त्यामुळे दारू न पिणार्‍यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आम्ही दारू पित नाही तर आम्ही या दारूच्या पर्यायी कराचा भार का उचलायचा असा सवाल ते उपस्थित करत आहे तर पिणारे मात्र त्यापेक्षाही अधिक संतप्त झाले आहे कारण दारू विक्री सुरू होती त्यावेळी किमान कायदेशीर दरात ती उपलब्ध होती व अगदी घराजवळ मिळत होती मात्र त्याच दारूसाठी जास्त पैसे मोजावे लागतात तसेच ती आणण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करावी लागते त्यामुळे पेट्रेालही जास्त खर्च करावे लागते एकूणच या दारूबंदीमुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडून गेले आहे.