अवश्य वाचा


  • Share

बिबट्यांच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार

घारगाव (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी शिवारातील वायाळवाडी याठिकाणी दोन बिबट्यांनी चार शेळ्यांवर हल्ला करुन या शेळ्या ठार केल्याची घटना बुधवार दि.19 एप्रिल रोजी रात्री 7.30 वाजता घडली. बिबट्यांच्या दहशतीमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, वायाळवाडी येथे भाऊसाहेब कोंडाजी मते हे शेतकरी राहत आहेत. नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या शेळ्या रानात चारण्यासाठी नेल्या होत्या. शेळ्या चारुन पुन्हा ते बुधवारी संध्याकाळी घराकडे येत होते. त्याच दरम्यान बाजूला दबा धरुन बसलेल्या दोन बिबट्यांनी या शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात चार शेळ्या ठार झाल्या आहेत. त्यामुळे मते यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती वनविभागाचे दिलीप बहिरट यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येवून शेळ्यांची पाहणी केली. साडे सात वाजताच बिबट्यांनी हल्ला करुन शेळ्या ठार केल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.