अवश्य वाचा


  • Share

पाण्यासाठी राजूर ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

अकोले (प्रतिनिधी) राजूरचीआदिवासी वस्ती असलेल्या देशमुखवाडीस महिन्यातून एकदा किंवा दोनदाच करण्यात येणारा पाणीपुरवठा नियमित करावा, या मागणीसाठी सोमवारी देशमुखवाडी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. सरपंच हेमलता पिचड ग्रामसेवक नेताजी भाबड अनुपस्थित राहिल्याने उपसरपंच गोकूळ कानकाटे यांनी आंदोलकांनी दिलेले निवेदन स्वीकारता तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, टाळे लावून टिकुरे मोर्चा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर समितीचे विस्तार अधिकारी श्रीयुत लावरे उपस्थित झाले. त्यांनी आंदोलकांना एप्रिल पर्यंत गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असे लेखी आश्‍वासन दिले. त्यानंतर तीन वाजता टाळे काढण्यात आले. याप्रसंगी जि. प. सदस्य डॉ. किरण लहामटे, सुनीता भांगरे, दत्ता देशमुख, संतोष मुर्तडक, विनय सावंत, महिला, ग्रामस्थ तसेच देशमुखवाडी येथील रहिवासी आणि राजूर विकास आघाडीचे पाच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. राजूर ग्रामपंचायत भरमसाठ पाणीपट्टी आकारूनदेखील देशमुखवाडीस नळपाणी पुरवठा योजनेचे महिन्यातून एकदा किंवा दोनदा पाणी पुरवठा करते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरत भटकंती करावी लागते आहे. तक्रारी करूनही काही उपयोग होत नसल्याने नागरिकांनी सोमवारी सकाळी आंदोलन सुरू केले. आठवडे बाजार असूनही पूर्वसूचना देऊनही सरपंच हेमलता पिचड ग्रामसेवक नेताजी भाबड अनुपस्थित राहिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. उपसरपंच गोकूळ कानकाटे यांना आंदोलकांना सामोरे जावे लागले. आंदोलकांनी कानकाटे यांच्याकडे लेखी आश्‍वासनाची मागणी केली. पण त्यास कानकाटे यांनी नकार दिल्याने विनय सावंत त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. राजूर गटातील जि. प. सदस्य सुनीता भांगरे यांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा निर्णय घेत निषेध केला.