अवश्य वाचा


  • Share

काकडवाडीच्या तरूणाची यशची गगणभरारी

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील काकडवाडी सारख्या अगदी छोट्याशा खेड्यात राहणार्‍या, चरितार्थासाठी दुसर्‍याच्या ट्रॅक्टरवर चालकाची नोकरी करणार्‍या सुखदेव तात्याभाऊ निर्मळ या 32 वर्षाच्या तरुण संशोधकाचा फ्री वाल्व्ह इंजिन टेक्निक या संशोधनासाठी झी टीव्हीच्या वतीने देण्यात येणार्‍या यंग इनोव्हेटर श्रेणीतील रँचो अ‍ॅवॉर्डने गुरुवार ( ता. 16 ) रोजी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र ़ङ्गडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. सुखदेव निर्मळ या सर्वसामान्य युवकाचा हा संशोधन प्रवास अगदी अद्भुत असा आहे. राजापूर (ता. संगमनेर) येथील महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या सुखदेवला आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, घरच्या कोरडवाहू शेतीत लक्ष घालावे लागले. मात्र लहानपणापासून त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या इंजिन बाबत प्रचंड आकर्षण होते. या छंदातून त्याने सर्व प्रकारची इंजिने अभ्यासली. त्यांच्या बाबत अधिकाधिक माहिती मिळवली, हाताळली. परिणामी त्यातील बारकावे माहीत झाल्याने इंजिनाची उपलब्ध असलेली कार्यक्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू झाले. ग्रामीण भागात राहत असल्याने, दुचाकीस्वारांना कच्च्या रस्त्याने वाहने चालवितांना येणार्‍या अडचणी, जास्त इंधनाचा खर्च कमी करता यावा यासाठी त्याने दुचाकीच्या इंजिनात काही फेरबदल करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू केले. आजवर कोणत्याही कँपनीने ग्रामीण भागातील कच्च्या रस्त्यांचा विचार केलेला नसल्याने, यावर त्याने लक्ष केंद्रीत केले. आजपर्यंत असणार्या इंजिनमध्ये अ‍ॅक्सलरेटर सोडल्यानंतर, इंजिनला 100 टक्के इंधन पुरवठा बंद करणारे तंत्रज्ञान अस्तित्वात नाही. जास्तीत जास्त मायलेज देण्याचा दावा करणार्‍या कँपन्यांनाही यावर उपाययोजना करता आल्या नाहीत. ’फ्री वाल्व्ह इंजिन टेक्निक ही संकल्पना ग्रामीण भागातील रस्त्यांचा विचार करून बनविण्यात आली आहे. यामुळे कच्च्या रस्त्यांवर जास्त मायलेज मिळते, सोबत वाहनाच्या दिव्यासाठी वीजपुरवठा चांगला मिळतो. फोर स्ट्रोक दुचाकीच्या इंजिनाचे कार्य इंधन हवा मिश्रीत होवून आत येणे, पिस्टन वर येणे, कॉम्प्रेस करणे, ब्लास्ट करुन निर्माण झालेला धुर बाहेर सोडणे या तत्वावर चालते. यातील एक क्रिया बंद पडली तरी इंजिन सुरु होत नाही. सुखदेव निर्मळ याने या तंत्रात अंतर्गत बदल करुन त्यात फ्री व्हॉल्व्ह बसविल्याने, अ‍ॅक्सलरेटर कमी केल्यानंतर इंधन इंजिनमध्ये येत नाही परिणामी इंधनाची बचत होते. यात रात्रीच्या प्रवासात अक्सिलेटर कमी झाल्यानंतर, हेड लाइट कमी होत नाही. फ्री वाल्व्ह इंजिन म्हणजेच इंजिनच्या चारही क्रिया काही काळ बंद करणे होय. उदा. इंजिन ताशी पन्नास किलोमिटरच्या वेगाने सुरू आहे, जर अ‍ॅक्सलरेटर एक टक्क्याने जरी कमी झाले, तर लगेच ’फ्री वाल्व्ह हा इंजिनच्या फोर स्ट्रोक क्रिया बंद करतो, परिणामी लगेच शंभर टक्के इंधन पुरवठा बंद होतो. तसेच अक्सिलेटर आहे त्याच्या एक टक्क्याने वाढले तरी इंधन पुरवठा शंभर टक्के सुरळीत होऊन फोर स्ट्रोक क्रिया चालू होतील, म्हणजेच इंजिन चालू होईल. या इंजिनमध्ये फोर स्ट्रोक सिस्टम बंद झाल्यामुळे इंजिनाचे तापमान कमी होण्यास मदत मिळते, त्यामुळे इंजिनाचे आयुष्य वाढते. आपल्या बदलामुळे होणारे परिणाम अनेकदा तपासून, पूर्ण खात्री झाल्यानंतर त्याने 2 मे 2016 रोजी या शोधाच्या स्वामित्व हक्कासाठी दावा केला आहे. त्याच्या या शोधाची माहिती समजल्यानंतर पत्रकार प्रशांत शर्मा यांनी त्याला यंग इनोव्हेटर अवॉर्ड साठी माहिती पाठविण्यास सांगितले. त्यांनी केलेल्या पडताळणीनंतर याच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेचे चित्रीकरण होवून, त्याची तरुणांच्या संशोधक वृत्तीला प्रोत्साहन देणार्‍या या अ‍ॅवॉर्डसाठी निवड झाली. गुरुवार (ता. 16) रोजी मुंबई विद्यापीठाच्या दिक्षांत सोहळा सभागृहात त्याच्या संशोधनाचा गौरव करण्यात आला. एका सर्वासामान्य कुटूंबातील तरुणाने संगमनेर तालुक्याचा झेंडा संशोधनाच्या प्रांतात फडकविला. या प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख, झी टीव्हीचे डॉ. उदय निरगुडकर आदी उपस्थित होते.