अवश्य वाचा


  • Share

गुटखा बंदीवर आणखी कडक कायदा

संगमनेर (प्रतिनिधी) राज्यसरकारने राज्यात गुटखा बंदीचा कायदा करूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे सरकारचा हेतू साध्य झाला नाही. उलट शेकडो रूपयांच्या महसूलालाही मुकावे लागले त्यामुळे राज्य शासनाने गुटखा बंदीविरोधी आणखी एक कडक कायदा केला असून त्याअंतर्गत ज्या ठिकाणी गुटखा साठविला जातो असे गोडावून, गुटख्यांची वाहतूक करणारे वाहने, दुकाने, पाणटपर्‍या जप्त करून त्या सील करण्यात येणार आहे. असे स्पष्ट आदेश अन्न व औषध सुरक्षा प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे यांनी काढले आहेत. शरीराला अपायकारक ठरणारा व युवा पिढी उध्वस्त करणारा गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू, सुपारी आदींवर राज्य शासनाने बंदी घातली मात्र शेजारील राज्यातून मोठ्या प्रमाणावर चोरट्या मार्गाने गुटखा राज्यात येतो व तो सर्‍हास विकला जातो. गुटखा बंदीच्या कायद्याच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाने आत्तापर्यंत अनेक ठिकाणी छापे मारले व करोडो रूपयांचा गुटखा जप्त केला मात्र याचा कुठलाही परिणाम या धंद्यावर झाला नाही. उलट गुटख्याच्या किमती दुप्पट तिप्पट वाढून तो खरेदी-विक्री केला जातो. अगोदर गुटखा विक्री करणार्‍या वाहनांवर कारवाई होत नाही तसेच गुटख्याच्या गोडावूनवरही कारवाई होत नव्हती त्यामुळे हा धंदा फोफावला होता. आता मात्र नव्या कायद्यामुळे वाहने, गोडावून, दुकाने, टपर्‍या व ज्या ठिकाणी गुटखा आढळून येईल असे सर्व ठिकाणे आता प्रशासनाकडून जप्त करण्यात येणार असून सील केले जाणार आहे त्यामुळे या गोरख धंद्याला निश्‍चितच आळा बसू शकेल असा सरकारला विश्‍वास आहे. दरम्यान, गुटखा बंदी कायदा केला व त्यात दंड तसेच शिक्षेचीही तरतूद केली. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे तो कायद्या फसला. आता गुटखा बंदीवर नवा कायदा आणला आहे मात्र त्याचीही अंमलबजावणी जर झाली नाही तर या धंद्याला आळा कसा बसणार असा प्रश्‍न आहे. राज्य शासनाने गुटखा बंदीचा निर्णय करून भावी पिढीला मोठा दिलासा मात्र प्रशासनाच्या वतीने या कायद्याचे कधीही निट अंमलबजावणी झाली नाही. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने या कायद्याकडे जाणीवपूर्वक अर्थपूर्ण लक्ष करण्यात आले. त्यामुळे बंदी असूनही राज्यभर गुटखा विक्री जोरात सुरू आहे. या धंद्यामध्ये अनेक उद्योगपती राजकीय नेते, पुढारी, कार्यकर्ते या समावेश असल्याने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष होत होते. मात्र आता गुटखा बंदी कायद्याची अंमलबजावणी आणखी कडक करण्याची दृष्टीने राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्यानुसार वाहने, गोडावून, दुकाने, टपर्‍या, गाड्या या जप्त करून सील करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे गुटखा बंदीची प्रभावी अंमलबजावणी होणार असल्याची आशा सरकारला आहे.